My Story: ती छोटीशी परी आमच्या आयुष्यात आनंद देऊन गेली

My Story: ती छोटीशी परी आमच्या आयुष्यात आनंद देऊन गेली

लॉकडाऊनच्या या दिवसांनी अनेकांच्या मनात नकारात्मकता आणली आहे. आपल्याला कोरोना होईल या भीतीने अनेकांनी आपल्यावर इतक्या मर्यादा आणल्या की, माणसामाणसामध्ये असणारी माणुसकी संपून गेली. एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. पण या काळातही माणुसकीचे दर्शन झालेच. मोठ्यांकडून नाही तर अनेक लहान मुलांकडून….मुळातच लहान मुलं निरागस असतात. त्यांना भोवताली घडणाऱ्या गोष्टींपेक्षाही प्रेमाची आणि मायेची गरज असते. असेच आमच्यासोबत घडले. या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी केवळ भीतीने आपल्याच घरात राहणे पसंत केले तर दुसरीकडे एका छोट्याशा परीने मात्र जादूची कांडी फिरवत आमच्या कुटुंबामध्ये आनंद आणला.. जाणून घेऊया अशाच आमच्या आयुष्यात आलेल्या छोट्या परीची कथा.

सर्वसाधारणपणे गोबऱ्या गालाची, गोरीपान, सुंदर, सांगितलेलं ऐकणारी अशी लहान मुलं अनेकांच्या आवडीची असतात. पण आमच्या या छोट्या परीचा अंदाजच वेगळा काटक शरीर, कणखर आवाज, साधारण सात एक वर्षांची असल्यामुळे दाताचं बोळकं झालेल…. परीचे गुण असले तरी परीसारखी कधीही फ्रॉकमध्ये न दिसणारी.. म्हणजेच कायम ट्रॅक पँट आणि टी शर्ट असा तिचा समस्त लहान मुलींपेक्षा वेगळा अंदाज, केस वाढवायला आवडत नाही म्हणून केस फार मोठेही नाही. त्यामुळे एखाद्या लहान मुलीप्रमाणे तिला केस बांधायला किंवा त्याला रंगीबेरंगी क्लिप लावायला मुळीच आवडायचं नाही. घरात आली की, भिंगरीसारखी या खोलीतून त्या खोलीत….लिव्हिंग रुमच्या खिडकीतून बेडरुमच्या खिडकीत अशी ही भिंगरी घरभर फिरत राहणारी 


लॉकडाऊन जसे सुरु झाले तसे पहिले काही दिवस अनेकांनी घरात बसून काढले. घरी बसून ऑफिसचं काम करावं लागत होतं. त्यामुळे दिवसाचे साधारण 9 तास हे कामात जात होते. पण कालांतराने घरात बसून आणि तेच तेच करुन कंटाळा येऊ लागला. बाहेरुन आणलेल्या वस्तू धुवून घ्या, हात धुवा , अमुक करा- तमुक करा यामध्ये इतकी दमछाक होत होती की, हा कोरोनाला नकळत रोजच शिव्या द्यावा लागल्या. एक दिवस असचं खिडकीतून बाहेर पाहत असताना आमच्याच मजल्यावर राहणारी एक छोटी मुलगी मला तिच्या खिडकीत बसून खेळताना दिसली. तिची माझी ओळख होती. पण फार नाही. पूर्वी कधी ऑफिसमधून घरी येताना ही चिमुरडी आणि माझ्या शेजारी राहणारी एक मुलगी खाली खेळत असायच्या तेव्हा त्या दोघी येऊन मला पाहिल्यावर धावत यायच्या आणि मिठी मारायच्या. त्यावेळी जीव इतका कंटाळलेला असायचा की, मुलींनो हळू या मी खाली पडेन असे सांगावे लागायचे. पण तिची माझी तेवढीच काय ती ओळख…. 

खिडकीत तिला पाहिल्यावर तिने मला आवाज दिला. मी ही तिला विचारलं काय करते… मुळातच बोलका स्वभाव असल्यामुळे ती  माझ्याशी बोलू लागली. खिडकीत बसून बोलण्याचा आमचा रोजचा दिनक्रम बनला. ती मला घरी काय मेन्यू केला याबद्दल छान रंगवून सांगायची. कोरोनाचा तो काळ असा  होता की, कोणीही एकमेंकाकडे अजिबात जात नव्हतं. एकमेकांच्या घरचे पदार्थ खात नव्हतं. पण या छोट्याशा मुलीने मला, ताई तू आज काय बनवणार आहेस? पासून सुरुवात करत आज तू माझ्यासाठी हे बनवं  इतकी ती माझ्या जवळची झाली. मग काय रोज आम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू लागलो. कधी सँडवीज, कधी केक… पास्ता असे मस्त मस्त पदार्थ मी बनवून तिच्या घरी पाठवू लागले. ते खाऊन झालं की, खिडकीत येऊन मी बनवलेला पदार्थ कसा बनला याचं रसभरीत वर्णन ती करुन सांगायची… मलाही मज्जा येत होती. कधीही कुकिंग न करणारी मी केवळ तिच्यासाठी आणि तिला खूश करण्यासाठी बरचं काही युट्युब पाहून बनवू लागले. (खरं सांगू तर काही पदार्थ खरेच खूप छान व्हायचे. त्यामुळेच ते तिला आवडायचे) कोरोनाच्या काळात अशा पद्धतीने आम्ही एकमेकांना देतो हे माझ्या आईला थोडं भीतीदायक वाटायचं. रोजच्या बातम्या, कोरोनाचा वाढता आकडा, टीव्ही चॅनेल्सच्या स्पर्धेत दाखवली जाणारी कोरोना हॉस्पिटलमधील परिस्थिती या सगळ्यांनी तिच्या मनावर कधीन खोलवर परिणाम केला हे आम्हालाही कळले नाही. पण योग्यवेळी डॉक्टरांची मदत घेऊन आम्ही तिच्यावर उपचार सुरु केले. 

आईचे उपचार सुरु होते आणि त्या छोट्या परीचे मला रोज खिडकीत बोलावणे… तासनतास गप्पा मारणे सुरु होते. पण खिडकीतून थेट माझ्या घरी येऊन खेळण्याचा तिने निर्णय घेतला. मुळातच तिचे पालकही नोकरी करणारे असल्यामुळे तेही थोड्या मोकळ्या मनाचे होते. मनात कितीही भीती असली तरी देखील त्यांनी तिला माझ्याकडे बिनधास्त पाठवायला सुरुवात केली. पहिले काही दिवस अगदी तासभर, मग अर्धा दिवस, मग पूर्ण दिवसच ती आमच्याकडे राहू लागली. जेवू  लागली. आमच्यासोबत तिला जेवणाचा आनंद वेगळाच असायचा. तिला घरी तिचे आई-बाबा काय करत असतील याची काळजी नसायची. ती घरी जे बनलं आहे ते खायची. तिच्या बोअरडमचा आम्हालाही अंदाज येत होता. कोरोना सुरु झाल्यापासून मैदान काय साधं इमारतीच्या खालीही ती उतरली नव्हती. त्यामुळे आमचं घर तिच्यासाठी प्ले ग्राऊंड होतं. माझी आई पूर्वी तिच्यापासून थोडी दूर राहायची. कारण काय तर मला काही झालं असेल तर तिला होऊ नये. पण म्हटलं ना, आमची छोटी परी फारच वेगळी होती. आईला ती सतत सांगायची… ‘ घरी, कोरोना नसतो. तो खाली असतो’  आई तिला सोशल डिस्टसिंग पाळ असं म्हटलं की, ती तिला सतत हेच ऐकून दाखवायची..

My story: लॉकडाऊनमुळे मिळाली गुडन्यूज


तिच्या रोज घरी येण्याची आम्हाला सवय झाली होती. रोज घरी येऊन ती तिचे खेळ खेळत राहायची. हे करता करता तिने माझ्या आईला कधी आई-बाबा केलं आम्हालाच कळलं नाही. तू जशी आई-बाबांची मुलगी आहे तसे हे माझे आई-बाबा म्हणत आमच्या घरी आल्यानंतर ती काय नाव लावणार हेही तिने ठरवून टाकलं. 


माझ्या आईच्या भीतीवर ती रोज तिच्या या गोड आणि सामंजस बोलण्याने मलम लावत होती. तिला सतत वाटणारी भीती आणि एकटेपणा तिने दूर हळुहळू दूर केला होता. रोज सकाळी झाली तिची आंघोळ आटोपली की, खिडकीतून मला गोड आवाज देत मी येऊ का ? असं विचारायची.. कसं नाही म्हणणार तिला.. मस्ती केली तरी ती आजुबाजूला आम्हाला हवी असायची. या तीन - चार महिन्यात ती आमच्या कुटुंबाचा भाग बनून गेली होती. बाबांच्या शेजारी बसून मालिका पाहणं… आई काय करते? हे किचनमध्ये जाऊन पाहणं मला सांगणं तिचं सुरुच असायचं. आईने आजारी असल्यासारखे तोंड केले की, आई……… काय तू? स्ट्राँग हो.. आधी तू स्ट्राँग हो म्हणत आईचा हात पकडून तिला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची…. तिच्यामुळे घरात एक आनंद आला होता. तिचं घरभर विखुरलेलं सामानही आम्हाला हवंहवंस वाटायचंय. पण या लॉकडाऊननंतर ती दुसरीकडे राहायला जाणार हा विचारच आम्हाला अस्वस्थ करत होता. ती गेल्यानंतर आमचं काय? 

आणि तो दिवस आलाच.. गणपतीसाठी ती तिच्या आजीच्या घरी जाणार होती. तिला तिथेच ठेवून हे घरातील सामान शिफ्ट करणार होते. त्यामुळे तिचा या घरी शेवटचा दिवस होता. जाण्याच्या आदल्या दिवशी रात्री 12 पर्यंत आमच्याकडे होती. मी इथेच झोपते.. मी लोळत नाही. रडत नाही… सांगत राहिली. पण घरी गेली ती केवळ तिच्या पप्पांच्या सांगण्यावरुन त्याने तिला तुला सकाळी पाठवतो , असे म्हटल्यावर तिला आणि आम्हाला आणखी काही तास तिच्यासोबत घालवण्याचा आनंद झाला. दुसरा दिवस उजाडला ती घरी आली…तिला काय करु आणि काय नको असे झाले होते. सतत आईला, मला मिठी मारत होती. नेमके बाबा बाहेर गेल्यामुळे त्यांची आतुरतेने वाट पाहात होती. ते आले तेव्हा तिने त्यांना घट्ट मिठी मारली...बाबांना मी भावुक होताना पाहिले आहे. पण ते तिच्या जाण्याने खूप दु:खी झाले. ती गाडीत बसेपर्यंत आणि बिल्डींगबाहेर जाईपर्यंतचा तो काळ आम्हाला नकोसा झाला होता. 

सासू- सुनेत दुरावा आणतात या गोष्टी


आमची छोटी परी इथून गेली होती….तिच्या आठवणीत आम्ही आता पुढचे दिवस घालवायचे ठरवले…. पण सांगायला इतका आनंद होतो की, ती दररोज व्हिडिओ कॉल करते. आई कुठे ? बाबा कुठे? याची चौकशी करते…. घर दाखव असं म्हणते. अगदी ज्यावेळी आठवण येईल तसा फोन करते. त्यामुळे ती जिथे कुठे असेल ती आमचीच असेल असा आम्हा सगळ्यांचा विश्वास आहे…. 


या छोट्या परीचं नाव चार्वी… चार्वी म्हणजेच सुंदर…. सुंदर चेहऱ्यापलीकडे जाऊन तिचं मनं सुंदर होतं आणि तेच आम्हाला सगळ्यांना कायमचा लळा लावून गेलं….

 

तुमचा जोडीदार असेल रागीट तर कसे टिकवाल तुमचे नाते