कोर्ट मॅरेजही होईल खास, फॉलो करा या सोप्या टिप्स

कोर्ट मॅरेजही होईल खास, फॉलो करा या सोप्या टिप्स

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. मात्र कोरोनामुळे सध्या या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. मित्रमंडळी, नातेवाईकांच्या धुमधडाक्यात यंदा लग्न करणं जवळजवळ शक्यच नाही. त्यामुळे साधेपणाने आणि कोर्ट मॅरेज करण्याकडे अनेकांनी आपला मोर्चा वळवला आहे. लग्नावर खूप खर्च करण्यापेक्षा कोर्ट मॅरेज हा एक सर्वसामान्यांना परवडण्यासारखा प्रकार असल्यामुळेही अनेकजण लग्न रजिस्टर्ड पद्धतीने करणं पसंत करतात. मात्र तुम्ही तुमचं कोर्ट मॅरेजही मस्त एन्जॉय करू शकता. आयुष्यभर लक्षात राहील असं लग्न करायचं असेल तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याचा आहेत.

चांगल्या फोटोग्राफरची निवड करा -

लग्नाचे फोटो तुम्हाला या क्षणाची आयुष्यभर आठवण करण्यासाठी पुरेसे आहेत. यासाठीच जरी तुम्ही कोर्ट मॅरेज करत असला तरी तुमच्या अनमोल क्षणांचे फोटो एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफर कडूनच काढून घ्या. कारण तुम्ही कुठे आणि कसं लग्न करताय हे महत्वाचं नसून तुमच्या लग्नाचा क्षण फोटोमध्ये चांगल्या पद्धतीने साठवून ठेवणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला फार खर्च करायचा नसेल तर तुमच्या एखाद्या मित्राला ज्याला चांगले कॅंडिड शॉट क्लिक करता येतात त्याला फोटो काढण्याची विनंती करा. 

Giphy

तुमच्या दोघांचाही लुक आकर्षक असू द्या -

तुमचं लग्न हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत होत नसलं तरी हा  क्षण तुमच्या कायम लक्षात राहील असा असायला हवा. कारण तुम्ही या क्षणात लग्नाच्या बंधनात अडकणार आहात. त्यामुळे लग्नासाठी दोघांनीही खास तयार व्हा. लग्नाचे कपडे, दागदागिने, मेकअप खास असेल याची काळजी घ्या. कारण फोटोंमधून हा क्षण कायम तुमच्या डोळ्यात सामावून राहणार आहे. 

सोशल मीडियावर ग्रॅंड अनाऊंसमेंट करा -

कोर्ट मॅरेज आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांसोबत तुमचा आनंद वाटू शकणार नाही. जरी लग्नासाठी तुमच्या सर्व आवडत्या लोकांना तुम्हाला बोलावणं शक्य नसलं तरी  तुम्ही हटके आणि ग्रॅंड पद्धतीने हा क्षण सोशल मीडियावरून सर्वांसोबत शेअर करू शकता. लाईव्ह अथवा व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्ही तुमचा हा क्षण सर्वांसोबत शेअर करू शकता. जोडीदाराला किस, हग करताना, वेडिंग रिंग, हार आणि मंगळसूत्र घालतानाचा व्हिडिओ शेअर करून तुमचं लग्न सोशल मीडियावर जाहीर करा. 

Giphy

लग्नानंतर कुटुंब आणि जीवलग मित्रांना पार्टी द्या -

आनंद हा वाटण्यामुळेच वाढत असतो. त्यामुळे तुमचं कुटुंब, नातेवाईक आणि मित्रमंडळींना एखादी पार्टी देण्यास काहीच हरकत नाही. सध्या लॉकडाऊनमुळे तुम्हाला हॉटेल अथवा घरात जास्त मोठी पार्टी देणं शक्य नाही. मात्र सोशल डिस्टंस पाळत मोजक्या लोकांसोबत तुम्ही तुमचा आनंद जरूर शेअर करू शकता. सर्व नियमांचं पालन करा आणि लग्नाचा आनंद लुटा. 

गृहप्रवेशासाठी खास योजना आखा -

कोर्ट मॅरेज करताना तुम्हाला लग्नाचा शाही थाट नक्कीच अनुभवता येणार नाही. मात्र घरी गेल्यावर नवरा नवरीचा गृहप्रवेश, मधुचंद्राची रात्र, लग्नानंतरचे पूजाविधी यासाठी तुम्ही काहीतरी  खास आयोजन करू शकता. फुलांच्या वर्षावात गृहप्रवेश, फुलांनी पहिल्या रात्रीसाठी सजवलेली नवीन जोडप्याची खोली, पूजाविधींसाठी पारंपरिक आणि प्रसन्न सजावट यामुळे तुम्हाला तुमचे लग्न अगदी थाटामाटात झालं आहे असंच वाटू लागेल. शिवाय याचे फोटो आणि व्हिडिओ जरूर घ्या. ज्यामुळे हे क्षण तुमच्या कायम लक्षात राहतील.

Giphy