तान्ह्या बाळाला मालिश करण्याचे फायदे आणि पद्धत

तान्ह्या बाळाला मालिश करण्याचे फायदे आणि पद्धत

बाळाच्या आगमनामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होतं. बाळाच्या जन्मासोबतच नवजात पालकांची जबाबदारीही वाढते. बाळाचे संगोपन ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. तान्ह्या बाळाला सांभाळणं, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी प्रयत्न करणं हे खूप आव्हानात्मक असू शकतं. पूर्वीपासून बाळाच्या योग्य विकासासाठी बाळाला मालिश करण्याची पद्धत आहे. मात्र बाळाचं मालिश योग्य आणि अचूक पद्धतीने व्हायला हवं. शिवाय बाळाला मालिश करायचं की नाही हा प्रत्येक मातापित्याचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. पूर्वी तज्ञ आणि अनुभवी महिलांकडून बाळाला मालिश केलं जायचं. सध्या  कोरोनामुळे बाळाला मालिश आणि अंघोळ घालण्यासाठी मदतनीस अथवा अशी तज्ञ, अनुभवी व्यक्ती मिळणं कठीण आहे. यासाठी तुम्ही अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने तुमच्या तान्ह्याला स्वतःच मालिश करू शकता. यासाठी मालिश करण्याचे फायदे आणि पद्धत अवश्य जाणून घ्या.

मालिश करण्याचे फायदे -

बाळाला आराम मिळावा आणि त्याला शांत झोप लागावी यासाठी पूर्वीपासून बाळाला मालिश करण्याची पद्धत आहे. मालिश केल्यामुळे बाळाच्या स्नायू आणि हाडांचा योग्य विकास होतो. मालिशमुळे बाळाचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्याचे स्नायू मजबूत होतात. शिवाय मालिश करताना झालेल्या शारीरिक हालचालीमुळे बाळ थकते आणि शांत झोपी जाते. गाढ आणि निवांत झोप मिळाल्यामुळे बाळाची शारीरिक वाढ व्यवस्थित होते. आई, आजी अथवा घरातील अनुभवी व्यक्तीने बाळाला हळूवारपणे मालिश केल्यामुळे बाळाचे त्यांच्याशी अतूट नाते जुळण्यास मदत होते. बाळाला यातून स्पर्श, संवाद यांचे ज्ञान होते. तेलाने केलेल्या मालिशमुळे बाळाची त्वचा मुलायम होते आणि त्याच्या त्वचेवरील लव म्हणजेच केस कमी होण्यास मदत होते. बाळाला प्रेमाने मालिश केल्यामुळे त्याच्यात तुमच्याविषयी प्रेमळ भावना जागृत होतात. ते तुम्हाला लवकर ओळखू लागते. मालिश केल्यामुळे बाळाला सुरवातीच्या काळात होणाऱ्या पोटाच्या समस्या अथवा अपचनाचा त्रास कमी होतो. मज्जा संस्थेच्या विकासासाठी त्याच्या पाठीवर योग्य मसाज केल्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय योग्य पद्धतीने मालिश केल्यामुळे बाळ लवकर मान सावरणे, ढोपरावर उभे राहणे, रांगणे, चालणे अशा क्रिया करू लागते. 

https://www.instagram.com/p/CE7KyHeF9xL/

मालिश करण्याची पद्धत -

बाळाला मालिश करण्यास बसण्यापूर्वी मालिशसाठी लागणारे सर्व साहित्य जवळ ठेवा. कारण मालिश करताना सतत उठ बस केल्यामुळे, हाताला तेल लावण्यामुळे बाळाला हाताळणे कठीण होऊ शकते. बाळाच्या मालिशसाठी शुद्ध नारळाचे तेल अथवा बेबी ऑईलचा वापर करा. बाळाला तुम्ही डोके, चेहरा, हात, पाय, पाऊल, पोट, पाठ, ढुंगण यावर मालिश करू शकता. मालिश करताना हाताने बाळाला सहन होईल इतकाच त्याच्या शरीरावर दाब द्या. बाळाच्या डोक्यावर मालिश करताना त्याच्या टाळूची काळजी घ्या. कारण बाळाच्या टाळूचा विकास वर्षभर हळूहळू होत असतो. बाळाशी संवाद साधत हळूवार पणे मालिशचे स्ट्रोक्स देत राहा. ज्यामुळे बाळाला बरे वाटेल आणि ते तुम्हाला सहकार्य करेल. वर्तुळाकार आणि वरून खाली अशा पद्धतीने तुम्ही बाळाला बोटांनी मालिश करू शकता. मालिश करण्याची वेळ सतत बदलू नका. कारण सतत वेळ बदलली तर बाळ तुम्हाला मालिश करताना सहकार्य करणार नाही. त्याच्या झोपेच्या आधीची वेळ मालिशसाठी निवडा. ज्यामुळे मालिश केल्यावर त्याला आराम मिळेल आणि ते शांत झोपी जाईल. जर मालिश करण्याची वेळ काही कारणाने चुकली तर बाळाला उठवून मालिश करू नका. कारण असं केल्याने ते चिडचिड करेल आणि त्याला आराम मिळणार नाही. शिवाय बाळाला मालिश करताना त्याला व्यवस्थित हाताळा कारण अशावेळी तेलकट हातातून बाळ सटकण्याची शक्यता असते. बाळाला मालिश करण्यासाठी आई, सासू, बाळाचे वडील  यांची मदत घ्या. बाळाशी तुमचे बॉन्डिग वाढवण्यासाठी मालिश हा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे तुमच्या बाळाला तुम्ही स्वतःच मालिश करा. असंही बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागतात. त्यामुळे बाळाच्या मालिशचे तंत्र लवकरात लवकर आत्मसात करा. 

Lifestyle

Himalaya Baby Massage Oil

INR 267 AT Himalaya

Beauty

WIPEOUT BABY SAFETY WIPES

INR 299 AT MyGlamm