लग्न हा दोन व्यक्ती, दोन कुटुंब एकत्र आणणारा एक मंगल सोहळा आहे. मात्र आजकाल भपकेबाज आणि शाही थाटामाट, बिग बजेट वेडिंग, डेस्टिनेशन वेडिंग, आठवडाभर लग्नविधी करणे अशा पद्धतीने लग्नसोहळे केले जातात. सहाजिकच त्यामुळे लग्न सोहळ्यावर भरमसाठ खर्च करण्याची पद्धत रूढ झाली आहे. मात्र लग्नसोहळा झाल्यानंतर अगदी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना बऱ्याचजणांच्या लक्षात येतं की, तेव्हा आपण नको त्या गोष्टींवर उगाचच पैसे खर्च केले. म्हणूनच जर तुम्हाला हा वायफळ खर्च वाचवायचा असेल किंवा कमी पैशांमध्ये लग्न करण्याची इच्छा असेल अथवा तुमच्या लग्नसोहळ्याचं बजेटच कमी असेल तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील.
शिवाय सध्या कोरोनामुळे लग्नसोहळे साध्या पद्धतीने, कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि कमी खर्चातच केले जात आहेत. या काळात जर तुम्ही तुमचा विवाहसोहळा आयोजित केला तर तुमचा लग्नावरचा वायफळ खर्च नक्कीच वाचू शकेल. जाणून घ्या कसा
लग्न साधेपणाने करायचं याचा अर्थ ते शॉर्टकट पद्धतीने करायचं असं मुळीच नाही. तुम्हाला कशा पद्धतीने लग्न करायचं आहे आणि तुम्ही त्यासाठी किती खर्च करू शकता हे आधीच ठरवलं तर तुमचा लग्नावरचा वायफळ खर्च नक्कीच वाचू शकतो. लग्नाआधी बर्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. कारण कमी खर्चातही शानदार अथवा थाटमाटातही लग्न करता येऊ शकतं. मात्र त्यासाठी तुम्ही काही गोष्टी आधीपासून ठरवल्या पाहिजेत. ज्यामुळे ऐनवेळी तुमचे लग्नाचे बजेट वाढणार नाही.
लग्नामध्ये फक्त निवडक आणि जवळच्याच लोकांना आमंत्रित केलं तर तुमचा लग्नाचा खर्च आपोआप कमी होईल. कधी कधी फक्त थाटमाट दाखवण्यासाठी ओळखीतील सर्वांनाच लग्नाचे आमंत्रण दिले जाते. वास्तविक आपण ज्या लोकांना आमंत्रित करणार आहोत त्यांचा पाहुणचार करण्यासाठी पुरेसा वेळ आणि पैसे दोन्ही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणूनच अगदी जवळच्या आणि मोजक्याच लोकांमध्ये तुम्ही अगदी थाटामाटात तुमचा विवाह करू शकता. कारण पाहुण्यांची यादी छोटी असेल तुमचा लग्नावर अती खर्च नक्कीच होणार नाही.
लग्न पत्रिका हा सध्या एक मोठा व्यवसायच आहे. कारण अगदी दहा रूपयांपासून ते लाखभर किंमतीच्या लग्नपत्रिका तुम्हाला बाजारात सहज मिळतात. त्यामुळे लग्न पत्रिका जितकी महाग तितका लग्नाचा थाट जास्त अशी समाजात समजूत झाली आहे. मात्र तुम्ही स्वतःच्या हाताने लग्नपत्रिका तयार करून हा खर्च वाचवू शकता. शिवाय पेपरलेस व्यवहार करण्यासाठी सरळ व्हॉटसअॅप अथवा मेलवर पत्रिका पाठवणं नक्कीच सोयीचं ठरू शकतं. घरी जाऊन आग्रहाचे निमंत्रण देणं कितीही चांगलं असलं तरी ते खर्चाच्या दृष्टीने तुम्हाला महागच पडतं. शिवाय जर तुमच्याकडे कलेचं उत्तम ज्ञान असेल तर स्वतःची पत्रिका स्वतः तयार करून तुम्हाला आमंत्रितांची प्रशंसाही मिळवता येईल. तुम्ही अशा स्वतः तयार केलेल्या आमंत्रण पत्रिका पोस्ट अथवा कुरिअर करू शकता.
आजकाल लग्नसोहळे आयोजित करण्यासाठी मॅरेज को-ऑर्डिनेटर अथवा आयोजक सहज मिळतात. तुमच्या लग्नाचे बजेट एकदा ठरले की तेवढ्याच खर्चात तुम्हाला लग्नसोहळा कसा करायचा याचे मार्गदर्शन या लोकांकडून मिळू शकते. जर प्रोफेशनल आयोजकांवर खर्च करायचा नसेल तर तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची अथवा मित्राची मदत घ्या. ज्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही व्यक्ती तुम्हाला सतत सावध करेल.
लग्नसोहळ्याचा खर्च वाचवण्याचा सोपा मार्ग म्हणजे घरातच साधेपणाने लग्न करणं. आता कोरोनाच्या काळात संक्रमण टाळण्यासाठी अनेकांनी हा पर्याय निवडला आहे. कारण यामुळे तुमचा लग्नाचे स्थळ, कॅटरिंग अशा गोष्टींवरील खर्च वाचवणं सोपं जाईल. डेस्टिनेशन थीम वेडिंग करणे टाळा. जर तुमचे घर प्रशस्त असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही लग्नासाठी आमंत्रित करू शकता. गावाकडील भागांमध्ये घरासमोर शाही मंडप टाकून लग्न सोहळा दिमाखात करता येऊ शकतो. ज्यामुळे लग्न थाटामाटात आणि कमी खर्चात करता येईल.
लग्नात जास्त खर्च हा कॅटरिंग आणि जेवणावर केला जातो. असं म्हणतात की लग्नातील जेवण लोक नेहमी लक्षात ठेवतात. अगदी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतानाही लोकं मेन्यूची आठवण काढतात. यासाठी बऱ्याचदा लग्नात विविध प्रकारचे मेन्यू ठेवले जातात. लग्नानंतर हे अन्न बऱ्याच प्रमाणात उरते आणि वाया जाते. पैशांची अशी नासधूस स्वतःसाठी आणि राष्ट्रासाठी हानिकारकच आहे. आपल्या लग्नाच्या मेनूची आखणी करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. त्यामुळे लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी लग्नात अगदी साधा मेन्यू ठेवा. साधा मेन्यू असला तरी त्याची क्वालिटी मात्र बेस्टच राहील याची काळजी घ्या. ज्यामुळे पाहुण्यांना तुमचा पाहुणाचारही आवडेल आणि खर्चही वाढणार नाही.
लग्नात वधुवरांच्या पेहरावावर भरमसाठ खर्च केला जातो. जर तुम्हाला लग्नाचा खर्च वाचवायचा असेल तर या गोष्टींवर लक्ष द्या. कारण हे कपडे इतके हेव्ही असतात की ते पुन्हा तुम्ही इच्छा असूनही वापरू शकत नाही. त्यामुळे एकच दिवस वापरल्या जाणाऱ्या या कपड्यांवर हजारो रूपये खर्च करणं नक्कीच फायद्याचं नाही. त्यापेक्षा हे कपडे तुम्ही सेलमधून घ्या. कारण सेल सुरू' असताना तुम्हाला त्याच कपड्यांवर चांगली आणि घसघशीत सूट मिळू शकते. सेल मध्ये घेतलेल्याया स्वस्तातील कपड्यांमुळे तुमची लग्नात सुंदर दिसण्याची हौसही भागेल आणि खर्चही वाचेल.
लग्नसोहळ्यात अर्धाअधिक खर्च दागिन्यांवरच होत असतो. सोनं आणि हिऱ्याच्या दागिन्यांची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे. तुम्हाला तुमचे लग्न महत्वाचे आहे की लग्नात काय दागिने घालायचे हे महत्वाचे आहे हे तुम्हीच ठरवा. जर तुमचं बजेट कमी असेल तर कमी दागिन्यांची निवड करूनही लग्नात तुम्ही आनंदी दिसू शकता. तुमच्या आयुष्याचा जोडीदार आणि त्याच्यासोबत आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन हे या सोहळ्यात महत्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळणार असेल तर दागदागिने काय नंतर कधीही घेता येतील.
बऱ्याचदा ऐपत नसतानाही इतरांनी केलं म्हणून, वरपक्षाची मागणी म्हणून अथवा लोक काय म्हणतील या भितीने लग्न थाटामाटात केलं जातं. असं करणं म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे. कारण कर्ज काढून लग्न केल्यामुळे शेवटी तुमच्याच पैशांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे असं न करता आपल्या बजेटप्रमाणे साध्या पद्धतीने लग्नसोहळा करण्याचा प्रयत्न करा. कुणालाही दाखवण्यासाठी तुम्हाला असं करण्याची गरज नाही. यासाठी आधीच दोन्हीकडील पक्षांना लग्नासाठी किती खर्च करणं शक्य आहे याबाबत मोकळेपणाने बोलून घ्या.
लग्नाचे स्थळ आणि सजावट यावरही आजकाल भरपूर खर्च केला जातो. मात्र साध्या सजावटीमध्येही सुंदर लग्नसोहळा करता येऊ शकतो. त्यामुळे कमी खर्च होईल अशी आणि सुंदर दिसेल अशी सजावट निवडा. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला डेकोरेशनचे प्रकार बाजारात मिळतात. शक्य असेल तर ही सजावट इको फ्रेंडली आणि पर्यावरणाला पूरक असेल याची काळजी घ्या.
सकाळच्या विधींसाठी उपलब्ध असलेल्या लग्नाचे हॉल अथवा बॅन्क्वेटवर हॉल कमी बजेटमध्ये मिळतात. कारण लग्नसोहळे संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. त्यामुळे सकाळच्या स्लॉटसाठी तुम्हाला कमी पैसे मोजावे लागतात. त्यामुळे विकडेजला आणि सकाळी जर तुम्ही हॉल बूक केला तर तुमचा खर्च कमी होऊ शकतो. अशा पद्धतीने चांगल्या ठिकाणी कमी खर्चात विवाह केल्याचा आनंदही तुम्हाला मिळू शकतो.
लग्नानंतर हनिमुनचे तुमचे खास प्लॅन नक्कीच असतील. मात्र हनिमुन हा प्रवास आणि भटकंतीसाठी करायचा नसुन लग्नानंतर तुम्हाला एकांत मिळवण्यासाठी करायचा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे इतर कुणीतरी जात आहे म्हणून महागड्या आणि बिग बजेट पर्यटन स्थळांना भेट देणं टाळा. हनिमुनसाठी निसर्गरम्य, शांत, जवळचे आणि कमी खर्च होईल असे स्थळ निवडले तर तुमचा खर्च नक्कीच वाचू शकतो. कमी बजेटमध्ये तुम्हाला अशी अनेक पर्यटन स्थळं निवडता येतील. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत पूर्ण वेळ निवांतपणे घालवता येईल.