अंडी की पनीर, कशातून मिळेल सर्वात जास्त प्रोटिन

अंडी की पनीर, कशातून मिळेल सर्वात जास्त प्रोटिन

मांसाहारी लोकांना अंडी आवडतात तर जे शाकाहारी असतात ते प्रोटिन्ससाठी पनीरची निवड करतात. अंडे हे देखील शाकाहारात गणले जात असले तरी प्रत्येक शाकाहारी व्यक्तीला ते आवडतेच असं नाही. काहींना मात्र अंडी खायला आवडतात आणि पनीरही. मात्र तुम्हाला हे माहीत असायला हवं की प्रोटिन्ससाठी जर या दोन्ही पदार्थांपैकी फक्त एकाचीच निवड तुम्हाला करावी लागली तर  कोणता पदार्थ सर्वात बेस्ट आहे. अंडे की पनीर कशातून तुम्हाला जास्त प्रोटिन्स मिळू शकतात ? वास्तविक पनीर आणि अंडी दोन्ही पदार्थ शरीरासाठी पोषक आहेत. कारण या दोन्ही पदार्थांमधून तुमच्या शरीराला पुरेसे प्रोटिन्स मिळू शकतात. यासाठीच आपण या दोन्ही पदार्थांचे फायदे जाणून घेऊया ज्यामुळे या पैकी कोणता पदार्थ सर्वात बेस्ट आहे हे तुम्हाला नक्कीच समजू शकेल.

प्रोटिन्सचे प्रमाण कशामध्ये आहे जास्त अंडे की पनीर

जेव्हा तुम्ही प्रोटिनयुक्त आहाराचा विचार करता तेव्हा मांसाहारी लोकांच्या मनात अंडे आणि शाकाहारी लोकांच्या मनात पनीर येते. पण या दोघांची तुलना करायची झाल्यास कशात प्रोटिन्स जास्त आहे हे माहीत असायला हवे.कारण संपूर्ण शरीराच्या वाढ आणि विकासासाठी, स्नायूंच्या आरोग्यासाठी शरीराला प्रोटिन्स गरजेचे असतात.

अंडे -

अंडे हा प्रोटिन्सचे प्रमाण मुबलक असलेला आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा पदार्थ आहे. शिवाय अंड्यामुळे वजन कमी होत असल्यामुळे अनेकांच्या आहारात अंड्याचा समावेश असलेल्या दिसून येतो. अंड्यामध्ये असलेल्या विविध घडकांमुळे ते सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते. एवढंच नाही तर अंड्यावरून बॉलीवूडमध्ये अंडे का फंडा हे एक पॉप्युलर गाणं ही तयार करण्यात आलं आहे. 

एका अंड्यामधून 5.5 ग्रॅम प्रोटिन तुम्हाला मिळू शकते. एवढंच नाही तर त्यात एकूण 4.2 ग्रॅम फॅट्स, 24.6 मिग्रॅ कॅल्शिअम 0.8 मिग्रॅ लोह आणि 5.3 मिग्रॅ मॅग्नेशिअमदेखील असतं.

Shutterstock

पनीर -

पनीर आणि कॉटेज चीझ हे लोकप्रिय दूधाचे पदार्थ आहेत. मात्र अंड्याप्रमाणे दररोज पनीर खाणं सर्वसामान्यांना परवडणारे असेलच असं नाही. पनीरचा आहारात निरनिराळ्या प्रकारे समावेश करता येऊ शकतो. तुम्ही पनीरची चविष्ट भाजी, भजी, बिर्याणी, सॅंडविज करू शकता.

चाळीस ग्रॅम लो फॅट पनीरमध्ये 7.54 ग्रॅम प्रोटिन्स असतात. याशिवाय यातून तुम्हाला 5.88 ग्रॅम फॅट्स, 4. 96 ग्रॅम कार्ब्स, 37.32 मायक्रोग्रॅम फॉलेट आणि 190. 4 मिग्रॅ कॅल्शिअम देखील मिळते. 

Shutterstock

मग प्रोटिन्ससाठी नेमकं अंडे खावं की पनीर

थोडक्यात प्रमाणाचा विचार केल्यास अंडे असो वा पनीर दोन्हीमधून तुम्हाला समान प्रोटिन्स मिळतात. शिवाय प्रोटिन्सप्रमाणेच या दोन्ही पदार्थांमधून  तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 , लोह, कॅल्शिअम आणि अनेक महत्वाचे पोषक घटकदेखील मिळतात. ज्यामुळे तुमच्या शरीराचे  कार्य सुरळीत होते आणि तुमचे वजनही कमी होऊ शकते. शारीरिक वाढ आणि स्नायू बळकट करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ शरीराला तितकेच आवश्यक आहेत. कारण प्रत्येक पदार्थांचे फायदे हे निरनिराळे असतात. सहाजिकच तुम्ही तुमच्या आहारात या दोन्ही पदार्थांचा समावेश करायलाच हवा. ज्या लोकांना हाडांचे विकार आहेत अशा लोकांनी आहारात या दोन्ही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. जे लोक नियमित अंडे आणि पनीर खातात त्यांना हाडांचे विकार होण्याचा धोका कमी होतो. यासाठी दोन्ही पदार्थ खा आणि निरोगी राहा.