शेतीसाठी पूर्वीपासून सेंद्रिय खतांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. मात्र आधुनिक काळात अती लोकसंख्येमुळे उत्पादनाची वाढलेली मागणी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचणारा वेळ आणि रासायनिक खतांमुळे होणारे जास्त उत्पादन यामुळे सेंद्रिय पद्धतीने केली जाणारी शेती ही काळाच्या ओघात मागे पडत गेली. मात्र सध्या ग्राहक स्वतःच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत जागरुक झाले आहेत. त्यामुळे पुन्हा सेंद्रिय उत्पादनांचे महत्त्व सर्वांना पटू लागले आहे. ज्यामुळे आजकाल सेंद्रिय शेतीतून पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्याला चांगली मागणी आणि उत्पन्न पुन्हा मिळू लागले आहे. सेंद्रिय शेतीचे फायदे आणि या प्रकारच्या शेतीला का प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी ही माहिती अवश्य वाचा.
शेतीला कीड लागू नये आणि पिक मुबलक मिळावं यासाठी शेतावर रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा मारा केला जातो. मात्र त्यामुळे धान्याची गुणवत्ता आणि जमिनीची सुपिकता कमी होते. सेंद्रिय शेतीमध्ये मात्र रासायनिक खतांचा वापर न करता फक्त नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. सेंद्रिय शेती ही परंपरागत पद्धतीने केली जाणारी शेतीची एक पद्धत आहे. ज्यामध्ये धान्यावर मारल्या जाणाऱ्या खतांसाठी पिकांचे टाकाऊ भाग, गोमूत्र, शेण अशा नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या बियाणांवरही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. ज्यामुळे पिकांची गुणवत्ता राखली जाते.
चांगल्या गुणवत्तेचे धान्य हवे असेल तर जमिन तितकीच सुपीक असणे आवश्यक आहे. कीटकनाशके आणि रसायनांच्या अती माऱ्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होत जाते. हळू हळू अशा प्रकारे केलेल्या शेतीतून मिळणारे धान्य हे पोषक आणि चांगल्या दर्जाचे राहत नाही. यासाठी सेंद्रिय शेतीला सुरूवात करण्याआधी जमिन सुपिक करणं खूप गरजेचे आहे. अशा प्रकारे जमिनीचा सुपिकपणा वाढला तर कमी साधनसामुग्रीमध्ये आणि कमी पावसाच्या क्षेत्रातदेखील चांगली शेती करता येऊ शकते. यासाठीच जमिन कसताना रसायनांचा वापर कमी करून त्यासाठी गवत अथवा पिकांचे टाकाऊ अवशेष वापरात आणावे. सेंद्रिय आणि जैविक खतांमुळे जमिनीचा कस वाढत जातो.
सध्या आपण सतत ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द ऐकत आहोत. जागतिक पर्यावरणाचा तोल ढासळत आहे त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागत आहेत. जगावर ओढावणारे हे संकट नैसर्गिक नसून मानवी आहे. कारण निसर्गात माणसाने केलेल्या हस्तक्षेपामुळेच हे घडत आहे. सहाजिकच यावर उपायदेखील माणसालाच करावा लागणार. त्यामुळे जर पुन्हा एकदा आपण सेंद्रिय शेतीकडे वळलो तर ग्लोबल वॉर्मिंगचे होणारे दुष्परिणाम हळू हळू कमी होऊ लागतील. गेले काही महिने सक्तीच्या लॉकडाऊनमुळे निसर्गावर झालेला चांगला परिणाम आपण सर्वांनी अनुभवला असेलच. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी जाणिवपूर्वक सेंद्रिय उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करायला हवा.
जलसंवर्धनाचे महत्त्व नसल्यामुळे आजकाल पाण्याची नासाडी आणि प्रदूषण होताना आढळते. शेतीसाठी आणि घरासाठी पाण्याची बचत करण्यासाठी या काही सोप्या टिप्स नक्कीच फायदेशीर आहेत. शेतकामासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्स आणि रसायनांच्या निर्मितीसाठी पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. जर सर्वांनी अट्टाहासाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले तर पर्यायाने पाण्याचे प्रदूषण ही कमी होऊ शकते. सेंद्रिय शेतीमुळे पाण्याचे प्रदूषण तर होणार नाहीच शिवाय जलसंवर्धनाचे महत्त्वही लोकांना पटू लागेल. सेंद्रिय शेती निसर्गनियमांनुसार आणि जीवसृष्टीला अनुरूप असल्यामुळे तिच्यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी प्रमाणात होते.
मानवाच्या निसर्गातील अती हस्तक्षेपामुळे प्राणी, पक्षी, कीटक, जलचर यांच्या जीवनावर वाईट परिणाम झालेला आहे. हा परिणाम रोखण्याचा आणि निसर्गचक्र पुन्हा सुरळीत करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. कारण सेंद्रिय शेती फक्त माणसाच्या आरोग्यासाठीच नाही तर निसर्गातील प्रत्येक जीवजंतूच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. सेंद्रिय शेतीवर माणसाप्रमाणेच अनेक जीवजंतू, प्राणी पक्षी पोसले जातात. निसर्गाचे चक्र सुरळीत सुरू राहण्याची ही एक सुंदर व्यवस्था आहे. सेंद्रिय शेतीतून या निसर्गचक्राचा आदर राखला जाऊ शकतो.
आधीच सांगितल्याप्रमाणे शेतीवर जितके जीव पोसले जातील तितकी त्या शेतीची जमिन आणि पीक सुपीक असेल. थोडक्यात सेंद्रिय शेती नेहमीच जैवविविधतेला प्रोत्साहन देणारी असते. ज्यामुळे खराब वातावरण, आजार, कीड लागणे अशा समस्यांमधून शेतीचा बचाव होऊ शकतो. थोडक्यात जेवढी जैवविविधता राखली जाईल तितकं शेतीसाठी पूरक आणि पोषक वातावरण निर्माण होईल. माणसासाठी आणि विश्वासाठी ही एक हितकारक गोष्ट आहे.
जर तुम्ही नियमित अथवा लहाणपणापासून सेंद्रिय धान्य, भाज्यांचे सेवन करत असाल तर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच पटेल की सेंद्रिय धान्याची चव ही अप्रतिम असते. रासायनिक खतांचा वापर करून तयार केलेल्या धान्यात जमिनीची सुपिकता नसल्यामुळे मुळीच चव नसते. सेद्रिय धान्याची केवळ चवच छान असते असं नाही तर त्यांच्यामध्ये अॅंटि ऑक्सिडंटही जास्त प्रमाणात असतात. अनेक संशोधनात असे आढळून आलेलं आहे की सेंद्रिय धान्य, कडधान्य, भाज्या अथवा फळं आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात.
सेंद्रिय शेतीसाठी मनुष्यबळ जास्त प्रमाणात लागते. त्यामुळे या शेतीतून रोजगारदेखील मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतातील लोकांना शेतीतून खुप मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळू शकतो. जर योग्य पद्धतीने आणि जाणिवपूर्वक सेंद्रिय शेती केल्यास त्यातुन मिळणारे उत्तम इतर प्रकारच्या शेतीपेक्षा जास्त असू शकते. सेंद्रिय शेतीला चालना मिळाल्यास भारताच्या आर्थिक परिस्थितीवरही याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.
सेंद्रिय शेतीच्या फायद्यांबाबत करण्यात आलेल्या अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की या शेतीमुळे वातावरणात होणारे बदल स्वीकारणं सोपं जातं. केमिकल्स आणि इतर खतांचा अती वापर केल्यामुळे शेती करताना माती, पिक आणि वातावरण अशा अनेक गोष्टींवर वाईट परिणाम होत असतात. शिवाय अशी शेती नैसर्गिक बदलांना सामोरं जाण्यास सक्षम नसते. मात्र सेंद्रिय शेतीद्वारे पिकवलेली पिके वातावरणातील बदलांसोबत जुळवून घेतात. ज्यामुळे शेतीचे अती नुकसान होत नाही.
जगभरातील प्रत्येक व्यक्ती रंग, रूप, स्वभाव आणि संस्कृतीने वेगवेगळी असते. तरी प्रत्येकाला जगण्यासाठी अन्न हे लागतेच. अन्न पिकवण्याचा मुख्य स्त्रोत म्हणजे शेती. त्यामुळे मानवी जीवन हे शेतीवर अनेक बाबतीत अवलंबून आहे. भारत हा शेती प्रधान देश असल्यामुळे भारतात शेती अथवा कृषी संस्कृतीला फार महत्त्व आहे. शेतकरी धान्य पिकवतो म्हणून जगाचा रहाटगाडा सुरळीत सुरू असतो. या महान संस्कृतीला जतन करण्यासाठी आणि शेतीचा योग्य पद्धतीने विकास करण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धत अवलंबणे नक्कीच फायद्याचे आहे.
सेंद्रिय शेती केल्याने मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची बचत केली जाऊ शकते. कारण या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त खतांचा गरज लागत नाही. कीटकनाशके आणि रसायनयुक्त खतांची निर्मिती करण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. मात्र सेंद्रिय शेतीमध्ये या गोष्टींचा वापर केला जात नसल्यामुळे आपोआप ऊर्जेची बचत केली जाऊ शकते. थोडक्यात सेंद्रिय पद्धताने केल्या जाणाऱ्या शेतीसाठी आधुनिक साधनसामुग्री आणि ऊर्जा कमी प्रमाणात वापरली जाऊ शकते.
सेंद्रिय शेतीचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा की यासाठी गुंतवणूक खूप कमी प्रमाणात करावी लागते. पिंकाचे अवशेष, गोमूत्र, शेण, भाजीपाल्यातील टाकाऊ पदार्थ यातून सेंद्रिय खताची निर्मिती केली जात असते. ज्यामुळे यासाठी कीटकनाशके आणि खतांवर केला जाणारा भरमसाठ खर्च वाचतो. शेतीवर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या तुलनेत शेतीतून मिळणारे उत्पन्न नक्कीच जास्त असते. शिवाय यामधून शेतजमिनीचा कस राखला जात असल्यामुळे प्रत्येक वर्षी शेतीच्या उत्पन्नात कोणताही जास्त खर्च न करता वाढ होत जाते. जर सर्वांनीच या पद्धतीने शेती करण्यास सुरूवात केल्यास शेतीचे नुकसान टाळणे शक्य होऊ शकते.
सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घेताना महत्त्वाची गोष्ट ही जाणवते की या प्रकारच्या शेतीसाठी कोणत्याही रसायनयुक्त खतांची अथवा कीटकनाशकांची गरज लागत नाही. या खत आणि कीटकनाशक मधील हानिकारक रसायनांमुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होते. मात्र शेतजमिन आणि वातावरणावर याचा विपरित परिणाम होत असतो. सेंद्रिय शेतीची पद्धत अवलंबल्यास पर्यावरणाला पुरक आणि पोषक वातावरण नक्कीच निर्माण होऊ शकते.
आधी सांगितल्याप्रमाणे सेंद्रिय शेतीसाठी कोणत्याही केमिकलयुक्त खत, कीटकनाशके अथवा ऊर्जेचा अती वापर केला जात नाही. या गोष्टींमुळे जरी उत्पन्न वाढत असले तरी नकळत वायु आणि पाण्याचे प्रदूषण होत असते. सेंद्रिय शेती करून तुम्ही हे प्रदूषण नक्कीच रोखू शकता.
सेंद्रिय शेतीसाठी लागणारा खर्च कमी असला तरी यासाठी लागणारं मनुष्यबळ आणि बियाणांचा खर्च जास्त आहे. शिवाय या शेतीची पद्धत ही वेळखाऊ आहे त्यामुळे पुरेसं मनुष्यबळ नसणे ही यातील एक मोठी समस्या असू शकते.