सुखी आणि समाधानी जीवनासाठी असे घ्या आयुष्याबाबत निर्णय

सुखी आणि समाधानी जीवनासाठी असे घ्या आयुष्याबाबत निर्णय

जीवनात असे अनेक क्षण येतात जेव्हा भविष्यात सुखी आणि समाधानी राहण्यासाठी योग्य निर्णय ठामपणे आणि त्वरीत घ्यावे लागतात. अशा वेळी काय चुक आणि काय बरोबर हे अचूक पणे ओळखता यायला हवं. कारण त्या एका निर्णयावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. कधी कधी काही लोकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमताच कमी असते. त्यामुळे ते असे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मागे पुढे पाहत राहतात. जर तुमच्याही मनात असाच काहिसा गोंधळ सुरू असेल तर निर्णय घेताना या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. ज्यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल आणि भविष्य सुरक्षित होईल. 

सारासार विचार करा -

माणसामध्ये जन्मापासून म्हणजेच नैसर्गिकरित्याच सारासार विचार करण्याची शक्ती असते. फक्त त्या शक्ती वापर कधी करायचा ते माहीत असणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट चुकीची आहे की बरोबर हे नीट विचार केलं तर कुणालाही सहज समजू शकतं. जी माणसं स्वार्थापोटी सारासार विचार करत नाहीत त्यांना भविष्यात दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. यासाठी भविष्याचा विचार करताना फक्त स्वतःचाच विचार करू नका आपल्यासोबत जोडलेल्या सर्वांच्या भल्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्या.

अंर्तमनाला प्रश्न विचारा -

एखाद्या निर्णय घेताना परक्या व्यक्तीचा सल्ला घेण्यापूर्वी स्वतःच्या अंर्तमनाला काही प्रश्न विचारा. कारण तुमच्या अंर्तमनामध्ये तुम्हाला योग्य तो निर्णय देण्याची क्षमता नक्कीच आहे. या शक्तीचा वापर करण्यासाठी काही काळ शांतपणे ध्यानसाधना अथवा प्रार्थना करा आणि त्यानंतर ठराविक प्रश्न तुमच्या अंर्तमनाला विचारा. यासाठी कोणती प्रार्थना करावी अथवा कितीवेळ ध्यानसाधना करावी हे तुमच्यावर आहे. ज्यामुळे तुमचे मन शांत होईल असा कोणताही मार्ग तुम्ही यासाठी निवडू शकता. असं नियमित करत राहिल्यास काहीच दिवसांमध्ये तुम्हाला हव्या त्या प्रश्नाची उत्तरे देणारे संकेत अंर्तमन देऊ लागेल. ही युक्ती वापरून तुम्ही तुमचे निर्णय स्वतःच घेऊ शकता. कारण तुमचे अंतर्मन तुम्हाला नेहमी योग्य तोच संकेत देत असतं मात्र तुम्ही या गोष्टीकडे कधी जाणिवपूर्वक लक्ष देत नाही. 

आयुष्याचे ध्येय ठरवा -

यशस्वी जीवनाचे रहस्य फक्त एका गोष्टीत नसून तुमच्या आयुष्यभराच्या कारकिर्दीत दडलेले असते. त्यामुळे यशस्वीपणे निर्णय घेण्यासाठी फक्त एकाच पैलूवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. तुम्हाला तुमच्या संपूर्ण जीवनाचा विचार करावा लागेल. शिवाय यामध्ये तुमचे कुटुंब आणि तुमच्यासोबत जोडलेली अनेक माणसं परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे त्या गोष्टींचाही नीट विचार करा. तुम्हाला आयुष्यात नेमकं काय व्हायचं आहे किंवा आयुष्य कसं जगायचं आहे याचं ध्येय योग्य वेळी ठरवा. मोठ्या ध्येयामध्ये दडलेली अनेक छोटी छोटी ध्येय असतात. त्या छोट्या ध्येयांना पूर्ण करत आणि मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करत तुमच्या मोठ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. 

मनातल्या इच्छा डायरीत नोंद करा -

कोणताही निर्णय घेताना ही युक्ती नक्कीच कामी येते.नेहमी डायरी लिहीणं यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. किंवा जेव्हा तुम्ही संभ्रमावस्थेत असाल तेव्हा त्या निर्णयाशी निगडीत गोष्टी एका कागदावर लिहा. जसं की एखाद्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं आहे तर तुमच्यामधील गुण आणि अवगुण कागदावर लिहिल्याने तुम्हाला त्या क्षेत्रात जायचं की नाही हा निर्णय घेणं सोपं जाईल. समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी लग्न करायचं असेल तर त्या व्यक्तीबाबत आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या गोष्टी कागदावर लिहा. ज्यामुळे ती व्यक्ती तुमच्यासाठी परफेक्ट आहे की नाही हे तुमच्या सहज लक्षात येईल अशा पद्धतीने तुम्हाला आयुष्यातील कोणताही निर्णय सहज घेता येईल. 

अनुभवी लोकांचा सल्ला घ्या -

कोणताही निर्णय बिनधास्तपणे घेण्यासाठी ही युक्ती तुमच्या नक्कीच उपयोगाची आहे. तुम्ही ज्या गोष्टीबाबत निर्णय घेणार आहात त्याबाबत एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कारण त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला असल्यामुळे काय चांगले आणि काय वाईट हे ती व्यक्ती तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकते. सल्ला घेणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करणे असं मुळीच नाही. एखाद्याला आलेल्या अनुभवातून शहाणे होऊन सारासार विचार करून घेतलेला निर्णय भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे निर्णय स्वतःचा घ्या मात्र त्याआधी अनुभवी लोकांना त्यांचा अनुभव विचारा.