हिवाळ्यात वातावरणात कोरडेपणा वाढल्यामुळे त्वचा निस्तेज आणि ड्राय होते. ड्राय त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी आपण त्वचेवर बॉडीलोशन, पेट्रोलियम जेली अथवा मॉईस्चराईझिंग क्रिम लावण्यास सुरूवात करतो. काही लोकांची त्वचा मुळातच कोरडी असते अशावेळी मॉईस्चराईझर लावूनही ती लगेच पुन्हा कोरडी दिसू लागते. शिवाय कोरडेपणामुळे त्वचेवर डेड स्किन, धुळ, माती, प्रदूषणाचा जाड थर निर्माण होतो. त्वचेला मॉईस्चराईझ करण्यासाठी मग त्वचेवर सतत आणि अतीप्रमाणात मॉईस्चराईझर लावलं जातं. असं अती प्रमाणात मॉईस्चराईझर लावण्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठीच जाणून घ्या याचे दुष्परिणाम त्याचप्रमाणे थंडीत त्वचेला किती प्रमाणात आणि कसं मॉईस्चराईझर लावावं.
त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यासाठी त्वचेला मॉईस्चराईझिंग क्रिम अथवा लोशन लावण्याची गरज असते. हिवाळा असो वा कोणताही ऋतू त्वचेला नियमित मॉईस्चराईझिंग क्रिम लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होतात. मात्र असं असलं तरी नेहमी त्वचेवर सकाळी आणि रात्री असं फक्त दोन वेळ मॉईस्चराईझिंग क्रिम लावायला हवं. याचं कारण असं की, अती प्रमाणात क्रिम त्वचेवर लावण्यामुळे तु्मच्या त्वचेचे रोमछिद्र अथवा पोअर्स बंद होतात. त्याचप्रमाणे अती मॉईस्चराईझिंग क्रिममुळे तुमचा चेहरा सतत चिकट आणि तेलकट दिसू लागतो. एवढंच नाही तर असं सतत त्वचेवर तेलाचा थर निर्माण झाल्यामुळे एक्नेची समस्या निर्माण होते. एकतर कोणतंही बॉडीलोशन अथवा मॉईस्चराईझर हे क्रिम, जेल अथवा लोशनबेस असतं. या क्रिमचा फॉर्म्युला हा जाडसर असल्यामुळे फक्त योग्य प्रमाणातच त्याचा वापर करावा. तरंच तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट राहू शकते. कोणत्याही क्रिमचा अती प्रमाणात वापर झाला तर त्वचा तेलकट आणि डल दिसण्यास सुरूवात होते. शिवाय अशा तेलकट झालेल्या त्वचेवर धुळ, माती, प्रदूषणाचा संपर्क होऊन त्वचेला सतत इनफेक्शनचा धोका निर्माण होतो.
मॉईस्चराईझर कधी आणि कितीवेळा लावावं याचप्रमाणे ते कसं लावावं हेही खूप महत्त्वाचं आहे. यासाठी फॉलो करा या स्टेप्स -
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉईस्चराईझरची निवड करा. त्याचप्रमाणे जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही इतरवेळीदेखील त्वचेवर मॉईस्चराईझर लावू शकता मात्र तेव्हा त्वचा स्वच्छ धुवून घ्या आणि मगच मॉईस्चराईझरचा वापर करा. आठवड्यातून कमीत कमी एकदा तुमची त्वचा एखाद्या चांगल्या स्क्रबरने एक्सफोलिएट करा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरची डेड स्किन निघून जाईल.डेड स्किन निघून गेल्यावर त्वचेचे पोअर्स योग्य पद्धतीने मोकळे होतात आणि मॉईस्चराईझर त्वचेत मुरण्यास सोपे जातं.