सौंदर्य वाढवण्यासाठी आवश्यक आहेत हे व्हिटॅमिन्स

सौंदर्य वाढवण्यासाठी आवश्यक आहेत हे व्हिटॅमिन्स

निरोगी आरोग्य आणि सुदृढ शरीरासाठी आहारात विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असणं खूप गरजेचं आहे. मात्र व्हिटॅमिन्सचा आरोग्यप्रमाणेच सौंदर्यावरही चांगला परिणाम होतो. पण जेव्हा सौंदर्याचा विषय येतो तेव्हा  तुम्हाला फक्त व्हिटॅमिन सी आणि ईचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र असं मुळीच नाही कारण त्वचा आणि केसांसाठी इतर व्हिटॅमिन्सदेखील तितकीच आवश्यक असतात. सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्समुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येतो आणि केस चमकदार होतात. यासाठी कोणकोणती व्हिटॅमिन्स तुमच्या आहारात असायला हवी ते अवश्य जाणून घ्या.

व्हिटॅमिन ए -

त्वचेच्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन ए असायलाच हवं. कारण व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या, डोळ्यांच्या खाली येणारी काळी वर्तुळं, सनटॅन आणि सनबर्न कमी होण्यास मदत होते व्हिटॅमिन ए तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं, डोळे चेहऱ्याच्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतात. डोळे आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धओका व्हिटॅमिन ए मुळे रोखला जातो. व्हिटॅमिन एमध्ये अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या लवकर बऱ्या होतात. बटाटा, पालक, गाजर , आंबा या फळ आणि भाज्यांमधून तुमच्या शरीराला व्हिटॅमिन एचा पूरवठा होतो.

व्हिटॅमिन सी -

आहारात पुरेसं व्हिटॅमिन सी असल्यास त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो. त्याचप्रमाणे त्वचेच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाचं आहे. आंबट फळं जसं की संत्री, स्टॉबेरी, टोमॅटो, लिंबू, मोसंबी त्याचप्रमाणे मिरची, कडधान्य यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. 

व्हिटॅमिन बी 5 -

शरीराला सर्व कामे सुरळीत करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. पाण्याची कमतरता भासल्यास त्वचा हायड्रेट होते. अशावेळी शरीराला व्हिटॅमिन बी 5 ची गरज लागू शकते. कारण पाण्याच्या अभावामुळे होणारं त्वचेचं नुकसान यामुळे रोखता येतं. व्हिटॅमिन बी 5 त्वचेला कोरडे पडण्यापासून वाचवतं. तृणधान्य,अॅवोकॅडो, चिकन यामधून शरीराला पुरसं व्हिटॅमिन बी 5 मिळतं.

व्हिटॅमिन के -

त्वचेवर असलेल्या जुनाट जखमा, व्रण तसेच राहील्यास त्वचेवर काळे डाग पडतात. ज्यामुळे त्वचा काळंवडते आणि सौंदर्य खराब होतं. मात्र जर तुमच्या आहारात व्हिटॅमिन के असेल तर जखमा लवकर भरतात आणि काळेडाग पडत नाहीत. व्हिटॅमिन के तुम्हाला कोबी, केळं, दूध याधून भरपूर प्रमाणात मिळू शकतं.

व्हिटॅमिन बी 3 -

व्हिटॅमिन बी 3 त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. कारण  यामुळे तुमच्या मेंदूतील रक्तपेशी निरोगी राहतात. याचा परिणाम असा होतो की तुमचे दैनंदिन ताणतणावापासून रक्षण होते. ताणतणाव नियंत्रणात आणणं सोपं जातं. ताणतणावामुळे त्वचेवर एजिंगच्या खुणा लवकर दिसू लागतात. मात्र या व्हिटॅमिनमुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक राहते आणि तुम्ही लवकर वयस्कर दिसत नाही.

व्हिटॅमिन ई -

त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी व्हिटॅमिन ई हे खूप महत्त्वाचे आहे. अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे आहाराप्रमाणेच कॅप्सुल्सच्या माध्यमातून हे व्हिटॅमिन त्वचेवर थेट लावलं जातं. व्हिटॅमिन ईचा मसाज चेहऱ्यावर केल्यामुळे त्वचेच्या समस्या मुळापासून कमी होतात. त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी हे व्हिटॅमिन खूपच उपयुक्त आहे. त्वचा, केस आणि ओठ मऊ ठेवण्यासाठी तुम्ही  या तेलाचा वापर करू शकता.