हिवाळा सुरू झाल्यानंतर चटपटीत आणि आंबट तिखट असं खावंसं वाटतच. विशेषतः जेवणात लोणचं असेल तर मजा येते. गरमागरम पराठ्यांसह ताजे ताजे लोणचे खाणे ही एक वेगळीच मजा आहे. अशावेळी बाजारातून आणलेल्या लोणच्यापेक्षा घरात तयार केलेले लोणचे अधिक स्वादिष्ट लागते. घरी तयार केलेल्या चटपटीत आणि तिखट लोणच्याची मजा आणि चव बाजारातील लोणच्याला नक्कीच येत नाही. तसंच आपण आपल्या घरातील माणसांच्या तब्बेतीची काळजी घेऊन अगदी प्रेमाने हे लोणचं बनवतो त्यामुळे काही तासातच घरातच मसाले तयार करून लसूण आणि हिरव्या मिरचीचे चटपटीत लोणचं कसं बनवायचं याची फक्कड रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. हो आणि हे लोणचं बनविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. त्यासाठी नक्की काय काय तयारी करायची ते आपण आधी जाणून घेऊया.
सर्वात आधी आपल्याला तीन मुख्य घटक तयार करावे लागतात. हिरवी मिरची आणि आलं व्यवस्थित धुवा आणि लसणीच्या पाकळ्या काढून घ्या. त्यानंतर तुम्हाला हव्या त्याप्रमाणे आकारात याचे तुकडे करा. मोठ्या आकाराचे तुकडे केले तर अधिक चांगले म्हणजे खाताना याची अप्रतिम चव लागते आणि यामध्ये मसालाही नीट मुरतो
धुतल्यावर कापून पेपर टॉवेलने पुसून घ्या जेणेकरून यामध्ये अजिबात पाणी राहू नये. त्यानंतर यामध्ये हळद पावडर मिक्स करा. लक्षात ठेवा की मीठ मिक्स करू नका. त्याआधी हळद पावडर मिक्स करा आणि हे साधारण दोन तास उन्हात नेऊन सुकवा. असं केल्याने आलं आणि मिरचीमधील मॉईस्चर पूर्ण निघून जाईल आणि लोणचं एकदम मस्त बनेल
हे उन्हात सुकेपर्यंत याचा मसाला तयार करून घ्या. यासाठी एका पॅनमध्ये तुम्ही मोहरी भाजा. त्यानंतर त्यावर जिरे, मेथी दाणे, धणे, काळी मिरी आणि बडीशेप हे सर्व थोडे थोडे घेऊन व्यवस्थित भाजा. साधारण दोन मिनिट्स मध्यम आचेवर भाजल्यावर गॅस बंद करा. या मसाल्याचा अप्रतिम सुगंध स्वयंपाकघरामध्ये येऊ लागतो. मसाल्याचा रंग बदलू देऊ नका हे लक्षात ठेवा
हे थंड झाल्यानंतर याची पावडर मिक्सरमधून वाटून घ्या. याचे टेक्स्चर कसे हवे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लक्षात घेऊन पावडर वाटा
आता एका कढईत तेल गरम करा. हे तेल मोहरीचे असेल तर अधिक चांगले पण जर तुम्हाला मोहरीचे तेल आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे नियमित तेल वापरा. नंतर हे तेल थंड करा
दुसऱ्या बाजला तुम्ही लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीमध्ये वरील तयार केलेला मसाला, तिखट पावडर, ओवा, आमचूर पावडर घालून मिक्स करा
सर्व मसाले घालून मिक्स केल्यावर वरून तेल घाला आणि नीट मिक्स करा. मसाले नीट मिक्स होत नाहीत तोपर्यंत मीठ घालू नका
हे सर्व नीट मिक्स करून मीठ घाला आणि हे मिश्रण बाजूला 3-4 तास ठेवा. त्यानंतर लोणचं तयार आहे आणि दोन दिवस हे लोणचं तुम्ही उन्हात ठेवा आणि मग खा. जास्त दिवस तुम्हाला हे लोणचं टिकवायचं असेल तर तुम्ही तेल गरम करून वरून यामध्ये घाला
गरमागरम पराठे अथवा दही भात, पोळी कशाहीबरोबर तुम्ही हे लसूण आणि हिरव्या मिरचीचे चटपटीत लोणचं खाऊ शकता
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक