लग्नसमारंभ सध्या धूमधडाक्यात पार पडत आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळत लग्नसोहळे मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात आहेत. खंरतर कोरोनामुळे अनेक विवाह खूप दिवसांपासून रखडले होते. मात्र सर्व काही पूर्वपदावर येत असताना अनेकांना जवळच्या नात्यातील लग्नसमारंभात सहभागी होता येत आहे. लग्न सोहळा म्हटला की शाही पक्वान्नाचा थाटमाट हा ओघाने आलाच. शिवाय असं अचानक समोर आलेले शाही पदार्थ पाहून तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं. वास्तविक कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून सर्वांची जीवनशैली बदलली आहे. सहाजिकच आता फक्त घरचं साधं अन्नच खाण्याची आपल्या पोटाला सवय झाली आहे. त्यामुळे लग्नातील अशा चमचमीत आणि तिखट पदार्थांमुळे पोट बिघडण्याची शक्यता वाढत आहे. अशा सोहळ्यावरून घरी आल्यावर सध्या अनेकांना फूड इनफेक्शनचा त्रास जाणवत आहे. एखाद्या लग्नात जेवल्यामुळे जर तुम्हाला फूड इनफेक्शन झालं असेल तर हे उपाय घरच्या घरी करा. ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल.
लग्नातील जेवणामध्ये बऱ्याचदा सोड्याचा वापर जास्त केला जातो. ज्यामुळे असं जेवण जेवल्यानंतर पोटात दुखणे, गॅस होणे अशा समस्या जाणवतात. जर लग्नातील जेवणामुळे पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर घरी आल्यावर लगेच इनो, पुदिन हरा अथवा सोडा प्या. ज्यामुळे तुमच्या पोटातील गॅस ताबडतोब बाहेर पडेल. असं न केल्यास पोटात गॅस अडकून पडल्यामुळे तुम्हाला पोटातून तीव्र वेदना जाणवू शकतात. त्यामुळे पोट हलकं करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
भारतीय खाद्यसंस्कृतीत आल्याचा वापर आवर्जून केला जातो. कारण आलं हे पाचक आहे. जर एखादं जेवण जेवल्यामुळे तुमचं पोट जड झालं असेल तर पोटाला आराम देण्यासाठी आल्याचा रस वरदान ठरू शकतो. फूड इनफेक्शनमुळे बिघडलेल्या पोटावर उपचार करण्यासाठी आल्याची पावडर म्हणजेच सुंठ पावडर पाण्यात टाकून प्या. अथवा मधासोबत सुंठाचे चाटण घ्या. ज्यामुळे तुमच्या पोटाला त्वरीत आराम मिळेल.
पोटाचं इनफेक्शन कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीची पानं चघळू शकता. कारण यामुळेही तुमच्या पोटाला चांगला आराम मिळेल. पोट दुखू लागताच अंगणातील तुळशीची काही पानं घ्या आणि त्याचा रस काढा. मधासोबत हा रस पोटातून घ्या. ज्यामुळे तुम्हाला काही तासांमध्येच आराम मिळेल आणि पोट दुखी कमी होईल.
लग्नाचे जेवण घेतल्यानंतर रात्री बेरात्री जर तुमच्या पोटात दुखू लागले तर उपचारांसाठी डॉक्टरकडे जाणं अथवा त्यांना फोन करणे शक्य होत नाही. अशा वेळी घरातील हिंग तुमची मदत करू शकते. यासाठी रात्री पोटात दुखू लागल्यावर कपभर कोमट पाण्यात चिमूटभर हिंग मिसळा आणि प्या. पोटाला त्वरीत आराम मिळण्यासाठी आणि गॅस बाहेर पडण्यासाठी तुम्ही पोटावर हिंगाचे पाणी लावू शकता. हा उपाय केल्यावर गरम पाण्याच्या बॅगने पोट शेकवा. ज्यामुळे पोटाला आराम मिळेल आणि तुम्हाला शांत झोपही लागेल.
जड जेवणानंतर बिघडलेलं पोट बरं करण्यासाठी घरातील ओवा फायदेशीर आहे. यासाठी पोट दुखू लागतात चिमूटभर ओवा चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या. ओवा हा एक पाचक मसाल्याचा पदार्थ आहे. अन्नपदार्थ पचण्यासाठी ओव्याचा वापर स्वयंपाकात केला जातो. ओवा खाण्यामुळे तुम्हाला थोड्यावेळाने हलके वाटू लागेल. शिवाय खाल्लेले अन्न लवकर पचण्यास मदत होईल. मात्र लक्षात ठेवा पोट दुखतंय म्हणून जास्त ओवा खाऊ नका. कारण हा पदार्थ उष्ण आहे त्यामुळे तुमच्या तोंडात फोड येणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
अधिक वाचा -
लग्नात असा सेट करा सोपा आणि साधा मेन्यू