तुम्हाला दारू पिण्याचे भयंकर व्यसन जडलं असेल आणि त्याचे दुष्परिणाम पाहून तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात. दारू सोडणं ही एक महाकठीण गोष्ट आहे. कारण पहिल्यांदा माणूस जाणिवपूर्वक दारूला जवळ करतो आणि नंतर दारू माणसाला काही केल्या सोडत नाही. यासाठीच योग्य वेळीच प्रयत्नपूर्वक दारू सोडण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. दारू सोडण्यासाठी प्रत्येकवेळी व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याची आवश्यक्ता नाही. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही कुटुंबाच्या मदतीने स्वतःच दारूचे व्यसन सोडू शकता. यासाठी जाणून घ्या दारू सोडण्याचे घरगुती उपाय
आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्याचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. दारू सोडणे हा देखील एक खूप मोठा टास्कच आहे. यासाठी आधी याबाबत शांतपणे विचार करून, रिसर्च करून एक परफेक्ट प्लॅन तयार करा. दारी सोडण्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. कारण तुमच्या सवयी तुम्हाला नीट माहीत असतात. यासाठीच छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून प्लॅन तयार करा. जसं की तुम्ही दारू पिण्याची इच्छा नेमकी कधी होते, तुम्ही दारू सोडण्यासाठी कोणाची मदत घेऊ शकता, दारू सोडण्यासाठी तुम्हाला कोणापासून दूर राहण्याची गरज आहे, दारूची इच्छा झाली तर ती दूर सारण्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट मदत करू शकते अशा गोष्टींवर बारकाईने विचार करा. असा परफेक्ट प्लॅन करून मगच दारू सोडण्याचे घरगुती उपाय करण्यास सुरुवात करा.
जर तुम्हाला नुकतंच दारूचं व्यसन लागलं असेल तर ते सोडण्यासाठी हा उपाय बेस्ट आहे. कारण दारू पिण्याचा मोह होईल अशा गोष्टी टाळल्या तर तुमचे व्यसन सहज सुटू शकते. जसं की विकऐंडला मित्रांसोबत बाहेर गेल्यावर अथवा पार्टी, पबमध्ये गेल्यावरच तुम्ही दारू पित असाल. तर अशा ठिकाणी जाणं टाळा ज्यामुळे तुम्हाला दारूचा मोह होणार नाही. थोडक्यात तुम्हाला दारू पिण्याचा मोह नेमका कधी होतो हे शोधा. ज्यामुळे त्या गोष्टी टाळता आल्या तर तुम्हाला दारूपासून दूर राहणं नक्कीच जमेल. मद्यपान केल्याने बरेच दुष्परिणाम होतात.
दारू पिणे शरीरासाठी मुळीच चांगलं नाही. पण जर तुम्हाला नेहमी आणि अती प्रमाणात दारू पिण्याची सवय लागली असेल. तर ती अशी पटकन सोडणं नक्कीच शक्य नाही. उलट असा प्रयत्न केला तर तुम्ही कधीच दारू सोडवू शकणार नाही अशी तुमची धारणा होईल. यासाठीच हळूहळू तुमचे दारू पिणे कमी करा. शरीराला कोणतीही सवय मोडण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. शिवाय दारू पिण्याचे व्यसन तुमच्या शरीराप्रमाणे मनालाही जडले आहे. आणि मनाची सवय मोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मानसशास्त्र असं सांगतं की, एखादी गोष्ट तुम्ही सलग एकविस दिवस लागोपाठ आणि सातत्याने केली तर बाविसाव्या दिवशी तुम्ही ती न चुकता करता. म्हणजेच मनाला त्या गोष्टीची सवय लागते. यासाठीच या दिवसांमध्ये हळू हळू तुमचे दारू पिण्याचे प्रमाण कमी करा ज्यामुळे काहीच दिवसात तुम्हाला दारू सोडणं जमू लागेल.
कोणतीही गोष्ट जर तुम्ही तुमचे कुटुंब, मित्रमंडळी अथवा सहकाऱ्यांच्या मदतीने म्हणजेच एका मजबूत टीमच्या मदतीने केली तर ती तुम्ही लवकर साध्य करू शकता. म्हणूनच दारू सोडण्यासाठी तुमच्या हितचिंतकांची मदत घ्यायला विसरू नका. कारण ही मंडळी तुमच्यावर नीट देररेख करतील, जेव्हा तुम्हाला दारू पिण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा ही मंडळी तुम्हाला त्यापासून परावृत्त करण्यासाठी मदत करतील. दारूचं व्यसन जडलेल्या व्यक्तीला दारू पिण्याची इच्छा झाल्यावर कोणत्याच गोष्टींचे भान राहत नाही. मात्र अशावेळी तुम्ही जर तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत असाल तर ते तुम्हाला पुन्हा या गोष्टीची जाणिव करून देऊ शकतात. सतत विसरण्याची सवय असेल तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा हे उपाय
व्यसनमुक्ती केंद्रात दारू सोडवण्यासाठी काही औषधे देण्यात येतात. मात्र दारू सोडण्यासाठी औषधांचा वापर करण्याबाबत अजूनही जनजागृती केली जात नाही. खरंतर दारू सोडण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास दारू सोडण्यासाठी औषधे घेण्याचा पर्यायही खुला ठेवा. दारू सोडण्यासाठी तुम्हाला जे मानसिक युद्ध लढावे लागणार आहे त्यासाठी हा पर्याय तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरू शकेल.
दारू सोडवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे ही गोष्ट तुमच्या लिस्टमध्ये सर्वात वर ठेवा. कारण दारू सोडणं ही गोष्ट शक्य असली तरी जर तुम्हाला अती दारू पिण्याचे व्यसन जडले असेल तर त्याचे काही साईड इफेक्टही तुम्हाला काही दिवस भोगावे लागतात. मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे डॉक्टर योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये दारू सोडण्याचे परिणाम थेट शरीरप्रकृतीवर जाणवतात. यासाठीच या काळात तुम्ही योग्य डॉक्टरांच्या संपर्कात असणं आवश्यक आहे.
दारू सोडण्यासाठी कोणती गोष्ट तुमच्या फायद्याची आहे यावर लक्ष द्या. कारण याबाबत प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात मेडिटेशनने करून बरं वाटत असेल तर तसं करा किंवा स्वतःला स्वयंसूचना द्या, चालणे, धावणे, योगासने करणे असे मार्ग निवडा. तुमच्या स्वभाव आणि आवडीनिवडीनुसार तुमची रणनिती अथवा स्ट्रॅटेजी तुम्हीच ठरवा. ज्यामुळे ती फॉलो करणं तुम्हाला सोपं जाईल. सकारात्मक विचार करण्यासाठी हे उपाय आहेत फायदेशीर
दारू सोडण्यासाठी अनेक पर्याय तुमच्यासमोर आहेत. त्यातील कोणती अॅक्टिव्हिटी तुम्ही दारू पिण्याऐवजी करू शकता हे तुम्हीच ठरवा. जसं की तुम्ही जीम मध्ये व्यायाम करायला आवडतं, स्वंयपाकाची आणि इतरांना खाऊ घालायला आवडतं, गाणं गायला आवडतं, चित्र काढण्यामध्ये तुमचं मन अधिक रमतं की खेळ खेळायला आवडतात. हे सर्वस्वी तुमच्या आवडीनिवडींवर अवलंबून आहे. मात्र असे छंद तुम्हाला दारूच्या व्यसनापासून नक्कीच दूर ठेवतील. तेव्हा तुमच्या आवडीच्या छंद अथवा अॅक्टिव्हिटीमध्ये मन रमवा आणि व्यसनमुक्त व्हा.
दारू सोडण्यामागचं तुमचं नेमकं कारण काय ते शोधा आणि त्या मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जसं की जोडीदाराला आनंदी ठेवायचं आहे, आई-बाबा व्हायचं आहे, करिअरवर फोकस करायचं आहे, आरोग्य हवं आहे. अशा मोठया ध्येयाकडे लक्ष दिलं तर दारूचं व्यसन सोडण्यासाठी तुम्हाला चांगले प्रोत्साहन मिळेल. दारू सोडण्याचा निर्णय घेतल्यावर तुमचे ध्येय एका डायरीत अथवा कागदावर लिहून ते सतत तुमच्या डोळ्यासमोर राहील याची काळजी घ्या. जसं जसं तुम्ही या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू लागाल आणि दारू पासून दूर जाऊ लागाल तसं तसं तुमच्या यशाचा आनंद साजरा करा. ज्यामुळे तुमच्या मनाला याची खात्री पटू लागेल आणि ते तुम्हाला दारूपासून दूर ठेवेल.
दारू सोडणे ही अनेकांसाठी अतिशय कठीण आणि मोठी प्रक्रिया ठरते. शिवाय दारू सोडण्याच्या मार्गात येणारे अ्डथळे प्रत्येकाला सहन करावेच लागतात. या सर्व कठीण परिस्थितीला तोंड देत दारू सोडण्याचं ध्येय गाठणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी मनाची भक्कम तयारी असावी लागते. यासाठीच जर काही अडचणी आल्या तर घाबरून दारू सोडण्याचे प्रयत्म थांबवू नका. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला सुरूवातीलाच यात हवा तसा परिणाम मिळेल असं नाही. शिवाय प्रयत्न केल्यामुळेच तुम्हाला भविष्यात दारू सोडणे शक्य होणार आहे. यासाठी न थांबता आणि घाबरता प्रयत्न करत राहा.
जर तुम्हाला दररोज दारू पिणं गरजेचं वाटत असेल, दारू नाही प्यायली तर तुमचा संताप होत असेल, तुम्ही हळू हळू गोष्टी विसरू लागला असाल, दारूमुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडत असेल, दारू पिण्यामुळे तुमची शुद्ध जात असेल तर तुम्ही पूर्ण पणे दारूच्या आहारी गेलेला आहात.
होय, दारू सोडवण्यासाठी अॅप आहेत. ज्यामुळे तुमचा दारू पिण्याचा ट्रॅक नोंद केल्यावर त्यातून तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकते. मात्र अॅपमुळे तुमची दारू सुटणार नसून तुमच्या मनाच्या तयारी मुळे दारू सोडणं तुम्हाला शक्य होणार आहे. तेव्हा यासाठी मनाची तयारी करा आणि ट्रॅक ठेवण्यासाठी अशा अॅपची मदत घ्या.
दारूमुळे तुमच्या शरीरात कॅलरिज निर्माण होतात आणि तुमचे वजन वाढते, मात्र दारू सोडण्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी होतात आणि तुमचे वजन कमी होते. दारू सोडण्यामुळे महिनाभरात तुमचे एक ते चार किलो वजन कमी होऊ शकते.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक आणि पिक्सेल्स