घरातील तुळशीचं रोप नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

घरातील तुळशीचं रोप नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आहे. ज्यामुळे प्रत्येकाच्या घरी तुळशीचे रोप असतेच. मात्र काही कारणांमुळे अनेकांच्या घरी तुळशीचे रोप जास्त दिवस जगू शकत नाही. तुळशीचे रोप वारंवार सुकणं शुभ मानलं जात नाही. यासाठीच मग काही लोक तुळशीचं रोप घरात लावण्यास घाबरतात. मात्र लक्षात ठेवा तुळशीचं रोपाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्वदेखील आहे. त्यामुळे तुळशीचे रोप घरात लावण्यामुळे तुम्हाला आरोग्य लाभू शकतं. यासाठी जाणून घ्या तुळशीचं रोप वाढवताना काय काळजी घ्यावी.

कुंडीतील पाण्याचा योग्य निचरा -

तुम्ही तुळशीचं रोप माती लावताना काही विशिष्ठ गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचं रोप कधीच सुकणार नाही. लक्षात ठेवा तुळशीच्या रोपाला अतिप्रमाणात पाणी  देऊ नका. त्याचप्रमाणे रोप लावताना कुंडी भरून माती घेऊ नका. मोठी आणि  पसरट कुंडीत तुळस लावा. शिवाय रोप लावताना कुंडीत पंच्याहत्तर टक्के म्हणजे पाऊण भागच माती घ्या. कुंडीच्या तळाशी थोडी रेती अथवा खडे ठेवा आणि त्यावर माती टाका. ज्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यास मदत होईल आणि पाणी कुंडीत अडकून राहणार नाही. कारण तुळशीला जास्त पाणी सहन होत नाही. यासाठी माती आणि पाण्याबाबत योग्य काळजी घेतली तर घरात तुळस खूप दिवस टवटवीत राहते. पाणी घातलाना कुंडीतील माती ओली  होईल इतकंच पाणी कुंडीत ओता. हिवाळ्यात तर तुम्ही दोन ते तीन दिवसांतून एकदा तुळशीला पाणी घालू शकता.

मंजिरी खुडण्यास विसरू नका -

तुळस जरा मोठी झाली की तिला मंजिरी उगवतात. या मंजिरी झाडावर तशाच ठेवू नयेत त्या खुडून सुकवाव्यात  आणि दुसऱ्या कुंडीत रोवाव्या. ज्यामुळे रोपावर मंजिरी खुडलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन फांद्या फुटतात आणि रोपाची वाढ होते. झाडाच्या वाढीसाठी वेळच्या वेळी मंजिरी तोडणं खूप गरजेचं आहे.  सुकवलेल्या तुळशीच्या बिया दुसऱ्या ठिकाणी पेरल्यामुळे नवीन रोप उगवते त्यामुळे कुंडी सदैव तुळशीने भरलेली राहते. 

Instagram

रोपाची अशी घ्या काळजी -

तुळस ही आयुर्वेदिक वनस्पती असली तरी तिच्यावरही कीड पडते. तुळशीचे कीडीपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या रोपावर कडूलिंबाचे तेल स्प्रे करू शकता. हे तेल स्प्रे बॉटलमध्ये टाकून त्यात थोडं पाणी मिसळा आणि सकाळी आणि संध्याकाळी रोपावर स्प्रे करा. ज्यामुळे रोपाला कीड लागणार नाही.

मातीत मिसळा या गोष्टी -

कोणत्याही झाडाला पोषण मिळण्यासाठी कसदार मातीची गरज असते. म्हणूनच कुंडीतील मातीमध्ये शेणखत मिसळणं आवश्यक आहे. मात्र लक्षात ठेवा ओलं शेण कुंडीत टाकू नका नाहीतर तुळशीला बुरशी चढेल. शेण सुकवून ते पावडर स्वरूपात थोडं थोडं कुंडीतील मातीत मिसळा. ज्यामुळे रोपाला जीवदान मिळेल आणि तुम्हाला आरोग्य लाभेल. दर पंधरा दिवसांनी मातीमध्ये शेणखत मिसळा आणि मातीचा वरचा भार थोडा उकरून घ्या. ज्यामुळे मातीत हवा खेळती राहील आणि रोपाच्या मुळापर्यंत ऑक्सिजनचा पूरवठा होईल. 

Instagram