तुमची त्वचा ड्राय असो वा डिहायड्रेटेड असो हिवाळ्यात तुमच्या त्वचेचं नुकसान होत असतं. जर तुम्हाला तुमच्या त्वचेमधला हा मुख्य फरक समजला नाही तर तु्म्ही दोन्ही प्रकारच्या त्वचेवर एकसारखेच उपाय करता. मात्र ड्राय म्हणजे कोरडी त्वचा असणं आणि हिहायड्रेटेड असणं यात खूप फरक आहे. यासाठीच जाणून घ्या या दोन्ही प्रकारांमध्ये काय फरक आहे.
ब्युटी तज्ञ्जांच्या मते डिहायड्रेटेड त्वचा अगदी कोरड्या त्वचेसारखी म्हणजे ड्राय त्वचेसारखीच दिसते. यामधील काही छोटे छोटे फरक पाहून तुम्हाला तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे ओळखावं लागेल.
ड्राय म्हणजेच कोरड्या त्वचेवर सुरकुत्या असतात. अशा त्वचेचे पापुद्रे सुटतात. त्वचा लवकर लाल होते आणि कोरडे पणामुळे त्वचेला खाज येते अथवा जळजळ जाणवते. काही लोकांची त्वचा जन्मतःच अशा कोरड्या प्रकारची असते. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणं, पोषक आणि संतुलित आहार घेणं, त्वचेला सतत मॉईस्चराईझ करणं हाच यावरील उपाय आहे.
जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाण्याचा अंश कमी असतो तेव्हा तुमची त्वचा निस्तेज आणि कोरडी होते अशा प्रकारच्या त्वचेला डिहायड्रेटेड त्वचा असं म्हणतात. बऱ्याचदा अशा त्वचेवर कमी अथवा जास्त प्रमाणात त्वचेमधील तेल जमा होतं. हिवाळा, उत्तेजित पेयांचे अती सेवन, सतत युरिनला होणं, अती व्यायाम, पाणी कमी पिणं अशा अनेक कारणांमुळे त्वचा डिहायड्रेट होऊ शकते. ज्यामुळे त्वचेला सतत खाज येते, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात, डोळे खोलवर आत जातात, स्किन टोन बदलतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. ड्राय स्किन आणि डिहायड्रेटेड त्वचा यातील फरक लक्षात आल्यास डिहायड्रेटेड त्वचेवर योग्य उपचार करणं सोपं जातं.
कोरडी अथवा ड्राय स्किन हा त्वचेचा एक प्रकार आहे. मात्र डिहायड्रेटेड त्वचा हा जीवनशैलीमुळे झालेली एक समस्या असल्यामुळे या त्वचेवर वेळीच काही उपाय करणं गरजेचं आहे.
शरीराला सर्व कार्य सुरळीत करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. जेव्हा तुमच्या शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या आरोग्य आणि त्वचेवर दिसू लागतो. यासाठीच तज्ञ्ज सांगतात की कोणताही ऋतू असला तरी कमीत कमी आठ ग्लास पाणी दिवसभरात प्यायलाच हवं. तुम्ही तुमच्या शरीराची गरज, शारीरिक हालचाल, व्यायामाचे प्रमाण, कामाचे स्वरूप, वातावरण, वजन, वय यानुसार यापेक्षा जास्त पाणी पिऊ शकता. मात्र यापेक्षा कमी पाणी पिऊ नये. पुरेसं पाणी पिण्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि तजेलदार राहते.
जर तुमची त्वचा डिहायड्रेड असेल तर तुम्हाला यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. त्वचा डिहायड्रेट होण्यामागे अती मद्यपान अथवा धुम्रपान ही व्यसनं कारणीभूत असू शकतात. यासाठीच त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी अशा व्यसनांपासून दूर राहा.
रात्री झोपताना तुमच्या त्वचेला जास्त मॉईस्चराईझरची गरज असते. कारण या काळातच त्वचेला योग्य आराम आणि पोषण मिळत असते. यासाठी रात्री झोपताना चांगले मॉईस्चराईझर, नाईट सीरम अथवा स्लिपिंग मास्क त्वचेवर लावा. रात्री झोपताना त्वचेला नारळाचं तेल, बदामाचं तेल अशी नैसर्गिक तेल लावूनही मॉईस्चराईझ करता येऊ शकतं.
जर त्वचेवर तु्म्ही सतत स्क्रबचा वापर करत असाल तर त्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होऊन त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठीच कोणतेही खरखरीत पदार्थ, हार्श स्क्रब, चेहरा पुसण्यासाठी जाड टॉवेल यांचचा वापर करू नका. त्वचा स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक घटक असलेले आणि त्वचेवर सौम्य असतील अशा गोष्टींचा वापर करा.