संक्रांतीला अगदी सगळ्यांच्या घरी हळदीकुंकू घातले जाते. या हळदी कुंकू समारंभाची तयारी ही महिलांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची असते. घरं मोठं असो वा लहान घरात महिलांना बोलावून त्यांचे आदरातिथ्य करणे प्रत्येकाला आवडते. काही जण अगदी लहानप्रमाणात हळदी कुंकू घालतात. तर काहींचा हाच सोहळा फार मोठा असतो. या काळात ठराविक दिवसासाठी हा सगळा सोहळा सुरुच राहतो. या संक्रातीला महिलांना बोलावून छान हळदीकुंकू घालण्याचा विचार तुम्ही केला असेल आणि त्याची झटपट तयारी तुम्हाला करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या ट्रिक्स काढल्या आहेत. अनेकांकडे हळदी कुंकवाला गेल्यानंतर नेमका काय गोंधळ उडतो त्यावरुन या काही ट्रिक्स शोधल्या आहेत. चला जाणून घेऊया.
हळदी कुंकू सारख्या मंगलमयी अशा सोहळ्यात अनेक जण घरात येतात. घरात लोकांचे येणं- जाणं असतं. अशावेळी घर आवरणं सगळ्यात जास्त गरजेचे आहे. अस्वस्छ आणि अस्ताव्यस्त असलेले घर कोणालाच आवडत नाही.त्यामुळे साधारण दोन दिवस आधीतरी तुम्ही घराची चांगली साफसफाई करुन घ्या. महिलांना घरात बोलावल्यानंतर कधी कधी एकाच वेळी घरात अनेक जण येतात. अशावेळी बसण्याची जागा कमी पडू शकते. म्हणून खुर्ची, बैठक अशी सोय करुन ठेवा. घर जितके मोकळे ठेवता येईल ठेवा. घरात सतत छान सुवास येऊ द्या. त्यामुळे घरातील वातावरण एकदम प्रसन्न वाटते. त्यामुळे सगळ्यात आधी जर तुम्हाला काही करायचे असेल तर हे नक्की करा.
संक्रांत म्हटली की, तिळाचे लाडू आलेच. तिळाचे लाडू आणि साखर फुटाणे देण्याची पद्धत आहे. पण लाडू आणि साखरफुटाणे दिल्यानंतर ते कागदात किंवा हातामध्ये घेऊन जाताना खूप त्रास होतो. इतक्या ठिकाणी हळदी कुंकू समारंभाला जाऊन आल्यानंतर लाडू- फुटाणे पटकन खाणे होत नाही. त्यामुळे तुम्ही आधीच लाडू- साखर फुटाण्यांचे पाकिट तयार करा. ते द्यायला आणि समोरच्याला घेऊन जायला ही खूप सोपे पडते. त्यामुळे हळदी कुंकू समारंभाच्या सकाळी हे सगळे करुन ठेवा. म्हणजे आयत्यावेळी फार घाई होणार नाही. तुम्ही बोलावलेल्यांची यादी वगळता किमान 20 पाकिटं अधिकची पॅक करा.
मकर संक्रांतीला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या हे खास उखाणे
सुवासिनी वस्तूमध्ये येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे फूल. या काळात अष्टरची इतकी फुलं येतात की त्यांचा काहीही उपयोग नसतो. फुलं कोणीही डोक्यात माळत नाही. त्यामुळे ती प्रत्येकाकडे वाया जातात. सुवासिक फुलांचा गजरा हा अनेकांच्या आवडीचा असतो. तो माळला नाही तरी देखील तो सुवासासाठी चांगला असतो. त्यामुळे तुम्ही फुलांना टाळून गजऱ्याची खरेदी करा. जी तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.
खूप जणांना वाणं काय घ्यायचे असा प्रश्न कायम पडतो. पण फार विचार करत बसण्यापेक्षा असे वाण निवडा जे सगळ्यांच्याच फायद्याचे ठरु शकते. जर तुम्हाला वाणं घ्यायचे कळत नसेल तर आम्ही काही आयडियाज शेअर केल्या आहेत. पण वाण जितके साधे आणि उपयोगाचे असेल तितके ते आवडीचे असते.
आता घरात माणसं येणार म्हणजे पाण्याची सोय आलीच. पाणी ही अशी गोष्ट आहे जी आदरतिथ्याचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही पाण्याची योग्य सोय करुन ठेवा. सतत ग्लास आणण्याचा कंटाळा असेल तर पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल आणून ठेवा किंवा फेकता येतील असे डिस्पोझेबल ग्लास ज्यामुळे तुम्हाला पाणी देणे एकदम सोपे जाईल.
आता हळदी कुंकू समारंभाची तयारी करण्याआधी या गोष्टीही विचारात घ्या.