मराठी भाषा दिन माहिती (Marathi Bhasha Din Kavita & Information)

Marathi Bhasha Din Kavita

मराठी भाषा दिन म्हणजेच जागतिक मराठी भाषा दिवस (marathi bhasha din) हा जगभरामध्ये मराठी भाषिक आणि मराठीप्रेमी भाषकांकडून 27 फेब्रुवारीला साजरा करण्यात  येतो. मराठीतील प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात सर्वांचे आवडते कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ (marathi language day) अर्थात मराठी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बऱ्याच जणांना याची माहिती नसते. मराठी भाषा दिन माहिती आम्ही तुम्हाला या मराठी भाषा दिनानिमित्त देणार आहोत. मराठी भाषा दिन नक्की का साजरा केला जातो याची काही जणांना अजूनही माहिती नाही. नव्या पिढीला तर धड मराठी बोलतानाही येत नाही आणि लिहिण्याचे तर काही न बोलले तरच बरे. पण प्रत्येक मराठी भाषा असणाऱ्या व्यक्तीला मराठीचा सार्थ अभिमान असतो आणि असा मराठी भाषा दिन विशेष साजरा करण्यासाठी अर्थात आपला मराठी दिवस साजरा करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. मराठी भाषा दिनाचे संदेशही आजकाल खूप प्रसिद्ध होत आहेत. मराठी भाषा गौरव दिन असंही याला म्हणतात. मराठी भाषा दिनाचे महत्व काय आहे हे आपण आधी जाणून घेऊया आणि मगच आपण इतर माहिती जाणून घेऊ. 

मराठी भाषा दिनाचे महत्व (Marathi Bhasha Din Information & Importance)

Freepik.com

मराठी भाषा दिन हा कुसुमाग्रजांच्या जन्माच्या दिवशी साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी समस्त मराठीजनांची मागणी आहे. माय मराठीचा प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ सुरेश भटांच्या या ओळी आपल्याला मराठीचा अधिक अभिमान जागृत करण्यासाठी नक्कीच स्फुरतात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. खरं तर मराठी भाषेचा उगम हा उत्तरेकडे झाला असून मराठी भाषा ही मूळ आर्यांची भाषा आहे. साधारण 1500 वर्षांची इतिहास जपणारी ही भाषा आहे. प्रामुख्याने ही भाषा भारताच्या दक्षिण भागामध्ये विकसित झाली. मराठी भाषेचा पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश असा उत्क्रांत होत आता मराठी भाषा एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोहचली आहे. काळाप्रमाणे मराठी भाषा ही स्थळानुसारही बदलत गेली. मराठी बोलीभाषा आणि मराठी  प्रमाणभाषा असेही याचे भाग दिसून येतात. पण काहीही असलं तरीही मराठी भाषा ही प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे. कवी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून गौरविण्याचा आणि साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला आणि तेव्हापासूनच हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

मराठी भाषा दिन कविता (Marathi Bhasha Din Kavita)

Canva

मराठी भाषा ही समृद्ध भाषा समजण्यात येते. मराठी भाषा म्हटलं की इथे प्रत्येक गोष्टीवर अगदी प्रत्येक भावनेवर शब्दात गुंफलेल्या अप्रतिम कविता आपल्याला वाचायला मिळतात. कवी कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांनी आपल्या मनावर कायम राज्य केले आहे. अगदी नव्या पिढीलाही कुसुमाग्रज आपलेसे वाटतात. मराठी भाषा दिन कविताही तितक्यात आपल्याशा वाटतात. यातील शब्द मराठी माणसाच्या मनात नक्कीच मराठी भाषेबद्दल प्रेम आणि स्फुरण जागवतात. अशाच काही मराठी भाषा दिन कविता आपण या लेखातून जाणून घेऊया. 

1. माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे
माझी धुळीतील चित्रे
तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे
माझ्या जहाजाचे पंख
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनार्‍यास दिवा
कधी लावशील का रे
माझा रांगडा अंधार
मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या कानी
कधी टिपशील का रे

2. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, 
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा

3. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

4. माय मराठी ! तुझिया पायी तन मन धन मी वाहियले, 
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.  
कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मज आई, 
मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई. 
तुझे झरे अन् तुझी पाखरे,वास तुझा जनलोक तुझा,  
हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा. 
माय मराठी ! तुझिया अंकी लोळण येते, बागडते, 
तसेच अलगद तव आभाळी भरारणे मज आवडते. 
तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी, 
जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. 
तुझीयासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,
अर्थ साजरा,गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची. 
माय मराठी ! तुझियासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरुपा मिळते मी.
- संजीवनी मराठे

5. माझा मराठीचा बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिका मेळवीन ||१||

जिये कोवळिकेचिन पाडे |
दिसती नादींचे रंग थोड़े |
वेधे परीमळाचे बीक मोड़े | जयाचेनी ||२||

एका रसाळपणाचिया लोभा |
की श्रवाणींचे होति जीभा |
बोले इंद्रिय लगे कळंभा | एकमेकां ||३||

सहजे शब्दे तरी विषो श्रवणाचा |
परि रसना म्हणे रसु हा आमुचा |
घ्रानासी भावो जाय परीमळाचा | हा तोचि होईल ||४||

नवल बोलतीये रेखेचे वाहणी |
देखता डोळ्यांही पुरो लागे धणी |
ते म्हणती उघडली खाणी | रुपाची हे ||५||

जेथे संपुर्ण पद उभारे |
तेथे मनची धावे बाहिरे |
बोलू भुजाही अविष्कारे | आलिंगावया ||६||

ऐशी इंद्रिये आपुलालिया भावी |
झोंबती परि तो सरीसेपणेचि बुझावी |
जैसा एकला जग चेववी | सहस्त्रकरू ||७||

तैसे शब्दांचे व्यापकपण |
देखिजे असाधारण |
पाहातया भावाज्ञां फावती गुण | चिंतामणीचे ||८||
- संत ज्ञानेश्वर

6. माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवीत
ज्ञानोबांची-तुक्यांची
मुक्तेशाची-जनाईची 
माझी मराठी चोखडी
रामदास-शिवाजीची
‘या रे या रे अवघेजण
हाक माय मराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची!
डफ-तुणतुणें घेऊन 
उभी शाहीर मंडळी
मुजऱ्याची मानकरी
वीरांची ही मायबोली
नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर!
नव्या प्राणाची ‘तुतारी’ 
कुणी ऐकवी उठून
‘मधुघट’ अर्पी कुणी
कुणी ‘माला’ दे बांधुन!
लेक लाडका एखादा
गळां घाली ‘वैजयंती’
मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा
कुणी नजराणा देती
हिचें स्वरूप देखणें
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्रीं प्रभा दाटे
सात्विकाची-कांचनाची!
कृष्णा-गोदा-सिंधुजळ
हिची वाढविती कांती
आचार्यांचे आशीर्वाद
हिच्या मुखीं वेद होती
माझ्या मराठीची थोरी
नित्य नवें रूप दावी
अवनत होई माथा
मुखीं उमटते ओवी!
- वि. म. कुळकर्णी

मराठी भाषा दिन घोषवाक्य (Marathi Bhasha Din Slogan In Marathi)

Canva

मराठी भाषा दिनाचे महत्व तर आपण जाणून घेतलं. मराठी भाषा अशीच पुढे जात राहावी यासाठी आपण काही घोषवाक्यही नेहमी ऐकत असतो आणि त्याचा वापरही करत असतो.  ज्यांना ही घोषवाक्य माहीत नसतील त्यांच्यासाठी खास ही घोषवाक्य. ही घोषवाक्य ऐकल्यानंतर अथवा म्हटल्यानंतर स्फुरण  चढणार नाही असं अजिबातच होत नाही. जाणून घेऊया कोणती आहेत अशी स्फुर्तीदायक घोषवाक्य - 

 • लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी!
 • आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा!!!
 • माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन
 • माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
 • घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला
 • रूजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी 
 • मान आहेत मराठी भाषेचा आपल्या मनी, शुभेच्छा तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनी
 • आपणच आपणास तारी, मराठीची किमया लय भारी
 • बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, लिहावे शुद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध
 • आपणच आपल्या उद्धारासाठी चला बोलूया मराठी 
 • जिच्यासाठी  केला होता अट्टाहास, थांबवूया आता मराठीचा ऱ्हास
 • आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे मराठी मातीश

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक