नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राज्य आहे. नाशिकची द्राक्षं जगभरात प्रसिद्ध आहेत. ज्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकला उत्तम दर्जाच्या दाक्षं आणि वाईनसाठी ओळखलं जातं. शिवाय नाशिक हे गोदावरीच्या कुशीत वसलेलं एक तिर्थक्षेत्रदेखील आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध मंदिरे नाशिकमध्ये आहेत. ज्यामुळे नाशिकला पर्यटक आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असते. नाशिकमधील गोदावरीचा घाट, त्र्यंबकेश्वर, पंचवटीचा घाट आणि द्राक्षांच्या बागा पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यंटक येत असतात. नाशिक हे शहर कुंभमेळ्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. कुंभमेळा हा भारतातील एक सर्वात मोठा धार्मिक उत्सव असतो. असं म्हणतात की, समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर पडला आणि देव आणि दानवांमध्ये या अमृतावरून युद्ध झाले. या युद्धात त्या अमृतकुंभातील काही थेंब पृथ्वीवर पडले. त्यातील एक हरिद्वार येथील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैनमधील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब प्रयागमधील गंगा, यमुना व सरस्वतीच्या संगमावर नदीत तर चौथा थेंब नाशिकमधील गोदावरी नदीत पडला होता. ज्यामुळे या ठिकानांना धार्मिक स्थळांची मान्यता मिळाली आणि आजही येथे कुंभमेळा भरवण्यात येतो. हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो. नाशिकमध्ये या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जगभरातून साधू, महंत आणि भाविक गोळा होतात. नाशिक फिरण्याचे ठिकाण तर आहेच पण इथे फिरता फिरता इथली संस्कृती, इतिहास बाजारपेठ, मंदीरे यांची ओळखही तुम्हाला होईल. यासाठीच जाणून घ्या ही नाशिक पर्यटन स्थळे (nashik paryatan sthal)
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. ज्यामुळे या ठिकाणी बारा वर्षांतून एकदा सिंहस्थ कुंभमेळा भरवण्यात येतो. त्र्यंबकेश्वर हे शहर नाशिकमधील ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी आणि गोदावरीच्या काठावर वसलेलं आहे. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी व भीमा नद्यांच्या उगमस्थळी बारा शिवमंदिरे बांधली. त्र्यंबकेश्वर मंदिर हे त्यापैकीच एक शिवालय आहे. ज्यामुळे त्यांना बारा ज्योर्तिलिंग म्हणून ओळखलं जातं. पुढे नानासाहेब पेशवे यांनी हेमांडपती स्थापत्यशैलीत या मंदिराची पुर्नबांधणी केली होती. या मंदिराच्या चारी बाजुंना कोट बांधलेला असून पूर्वेकडे मुख्य दरवाजा आहे. मंदिरावर अतिशय सुंदर कोरिवकाम करण्यात आलेलं आहे.
रामकुंड हे ठिकाण नाशिकमधील गोदावरीच्या पात्रात बांधण्यात आलेलं आहे. असं म्हणतात वनवासात असताना प्रभू रामचंद्र या ठिकाणी स्नान करत होते. ज्यामुळे रामकुंडाला पवित्र स्थळ मानलं जातं. पेशवेकालिन कालखंडात या कुंडाची पुर्नबांधणी करण्यात आली. या कुंडाजवळच अस्थिविलय तीर्थदेखील आहे. महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी,यशंवतराव चव्हाण अशा राजकीय नेत्यांच्या अस्थी रामकुंडात विसर्जित करण्यात आलेल्या आहेत.
नाशिक जिल्हात वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पौराणिक कथांमध्ये 108 शक्तिपीठांचा उल्लेख आहे. त्यातील साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. त्यापैकीच एक सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. नांदुरी गावाजवळील वणी गडावर वसलेली ही देवी अनेक घराण्यांची कुलदैवता आहे. सप्तश्रुंगी हे आदिशक्तीचे मुळ रूप मानले जाते. या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असून तिच्या गाभाऱ्याला शक्तिहार, सुर्यहार आणि चंद्रहार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाज्यांतून देवीचे दर्शन घडते.
नाशिमध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत. ज्यामुळे नाशिकमधील या भागाला पश्चिम भारताची काशी असं म्हणतात. नाशिक शहरात पंचवटी हे गोदावरीच्या डाव्या तीरावर वसलेलं एक ठिकाण आहे. नाशिकमध्ये प्रसिद्ध काळाराम मंदिर आहे. या मंदिराजवळ पाच वडाच्या झाडांपासून तयार झालेल्या या ठिकाणाला पंचवटी असं म्हणतात. या भागात पंचवटी आणि गोदावरीच्या परिसरात अनेक मंदिरे आहेत.
नाशिकमध्ये काळाराम मंदीर प्रसिद्ध आहे. भगवान रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्यास होते अशी आख्यायिका आहे. पुर्वी लाकडी बांधकाम असलेले मंदीर 1782 साली सरदार रंगराव ओढेकर यांनी पुन्हा काळ्या दगडात बांधले. ज्यासाठी बारा वर्षे दोन हजार कारागिर काम करत होते असं म्हटलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील रामाच्या अनेक सुंदर मंदीरांपैकी हे एक मंदीर आहे. या मंदिराची रचना आणि कोरीवकाम पाहण्यासारखे असून त्यात प्रभू रामचंद्र, सीता माता , लक्ष्मण यांच्या काळा पाषाणातील मुर्ती आहेत. यातील रामाची मुर्ती काळ्या पाषाणातील असल्यामुळे या मंदिला काळाराम मंदीर असं म्हटलं जातं. या तीनही मुर्ती स्वयंभू असून त्या गोदावरीच्या पात्रात जिथे सापडल्या तिथे रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड अशी नावे पडली. चैत्र महिन्यामध्ये या मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
नाशिकमधील पांडवलेणीदेखील पाहण्यासारखी आहेत. या लेण्यांना बौद्धलेणी, त्रिरश्मी लेणी असंही म्हणतात. एका मोठ्या टेकडीवर ही प्राचीन लेणी असून ती जवळजवळ दोन हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पाली भाषेतील एक शिलालेख सापडतो ज्यावरून ही लेणी दोन हजार पूर्वीची असल्याचा दाखला मिळतो. या लेण्यामध्ये मुख्य चोविस लेणी असून त्यामध्ये बुद्धस्तूप, भिक्षूंची निवासस्थाने अनेक देवदेवतांच्या मुर्ती आढळतात. सातवाहन आणि क्षत्रप राजवंशाने ही लेणी कोरण्यास मदत केल्याचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. ज्यावरून नाशिकवर पूर्वी सातवाहन राजाचे अधिराज्य असल्याचा पूरावा मिळतो. यातील काही मुर्ती आता खंडीत स्वरूपात शिल्लक असल्या तरी त्यातून शिल्पकलेचं अप्रतिम दर्शन तुम्हाला मिळू शकतं. पांडवलेणी पाहण्यासाठी काही प्रमाणात फी आकारली जाते. ही लेणी पाहण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून तिथपर्यंत पोहचण्यासाठी अर्धा तास चालत जावे लागते. नाशिकरोडवरून बौद्धलेणी पाहण्यासाठी बसेस मिळतात.
मुक्तीधाम हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ असलेलं एक भव्य दिव्य मंदीर आहे. या मंदीराचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या मकराणा संगमरवरी दगडांत केलेलं आहे. ज्यामुळे हे मंदीर स्वच्छता, पवित्रता आणि शांतीचे प्रतिक मानले जाते. कै. जयरामभाई बिटको यांनी हे मंदीर बांधलं असून ते खाजगी ट्रस्टद्वारे चालवण्यात येतं. या मंदीरातील बारा ज्योर्तिलिंगाचे देखावे प्रसिद्ध आहेत. शिवाय या मंदीराच्या भिंतीवर गीतेचे श्लोक कोरण्यात आलेले आहेत. या मंदीराला भेट दिल्यावर अनेक देवदेवतांचे दर्शन तुम्हाला घडू शकते.
नाशिकमधील सुला हे एक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं वाईन गार्डन आहे. नाशिक जिल्हा द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. ज्यामुळे नाशिकमध्ये अनेक लहानमोठ्या वाइनरी आहेत. मात्र या सर्वात सुला वायनरी मध्ये जाणं पर्यटकांना फार आवडतं. या ठिकाणी सर्वोत्कृष्ट वाईनचं उत्पादन केलं जातं. या वायनरीमध्ये एक वाईन टेस्टिंग रूमदेखील आहे. ज्या ठिकाणी पर्यटक वाईनची टेस्ट घेऊ शकतात. अत्यंत कमी खर्चात तुम्ही या वायनरीत फेरफटका आणि वाईनची टेस्ट चाखू शकता. या ठिकाणी तुम्हाला भव्य दिव्य द्राक्षांचे मळे फिरण्याची, उपहारगृहाची सोय मिळते. ज्यामुळे फिरण्यासाठी आणि मनसोक्त फोटोसेशन करण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे नाशिकमधील या बेस्ट वाईनयार्ड्सनां तुम्ही भेट देऊ शकता.
नाशिक जिल्हातील सह्याद्रीच्या पर्वतरांगानी घेरलेलं इगतपुरी हिलस्टेशन एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पर्वतरांगानी घेतलेलं हे हिलस्टेशन असल्यामुळे उन्हाळ्यात थंड ठिकाणी राहण्याचा अनुभव घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. इगतपुरीत प्राचीन मंदीरे, विपश्यना केंद्र, त्रिंगलवाडी किल्ला, धबधबे आणि जंगल सफारीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. पावसाळ्यात फिरायला येणं हा एक अद्भूत अनुभव असतो. शिवाय हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही बऱ्याचदा पर्यटक इथे ट्रेकिंगसाठी येतात. इगतपुरी एक छोटंसं डेस्टिनेशन असलं तरी इथे एकदा आलं तर इथुन पुन्हा घरी जावसं वाटत नाही असं हे पर्यटन स्थळ आहे.
नाशिकपासून अगदी एक तासाच्या अंतरावर म्हणजेच इगतपुरीत व्हॅलोनी वाईनयार्ड आहे. ही वाइनरी म्हणजे एक छोटी बुटीक वाइनरी असून एक कुटुंब ती चालवत आहे. शहरी वातावरण आणि धकाधकीच्या जीवनशैलीतून ब्रेक घेण्यासाठी या वाइनरीला जाणं नक्कीच फायद्याचं आहे. कारण इथे कोणत्याही प्रकारचा शहरी गजबजाट नसून निसर्गाच्या कुशीतील रम्य वातावरण तुम्हाला अनुभवता येतं. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या तेरा अप्रतिम वाईन्सची टेस्ट घेता येते. शिवाय राहण्यासाठी सुंदर रूम्सची या ठिकाणी व्यवस्था आहे. वाईन टेस्टसाठी चारशे रूपये आणि पाच ते सहा हजारात राहण्याची व्यवस्था इथे केली जाते.
नाशिकमधील हर्षवाडी या गावाजवळ असलेला हा किल्ला आहे. हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता पुढे शहाजीराजांनी तो त्र्यंबकगडासोबत जिंकून घेतला. पुढे मोगलांच्या ताब्यातून तो मोरोपंत पिंगळे यांनी जिंकून घेतला आणि स्वराज्यात आणखी एका किल्लाची भर पडली. मात्र पुढे मराठ्यांकडून इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला अशा प्रकारे अनेकांनी या किल्लावर अधिराज्य गाजवलं. हरिहर किल्ला त्रिकोणी आकाराच्या सुळक्याप्रमाणे आहे. हा किल्ला चढण्यासाठी गिर्यारोहक आदल्या दिवशी गावात येतात आणि भल्या पहाटे किल्ला चढण्यास सुरूवात करतात. कारण चढण्यासाठी हा किल्ला अतिशय कठीण आहे. मात्र वर चढून गेल्यावर तुम्ही जेव्हा नाशिकचं विगंहम दृश्य पाहता तेव्हा तुमचे सर्व श्रम विसरून जाता. हरिगर किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात फिरताना महाराष्ट्राची शान असलेले महाराष्ट्रातील किल्लेही अवश्य पाहा.
नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, जागतिक वन्यजीव निधी आणि महाराष्ट्र वनविभागाच्या प्रयत्नाने निर्माण झालेलं एक सुंदर पक्ष अभयारण्य आहे. यासाठी गोदावरी आणि कादवा नदीच्या प्रवाहावर एक छोटं धरण बांधण्यात आलं आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यात हे पक्षी अभयारण्य असून या ठिकाणी तुम्हाला विविध जातीचे पक्षी पाहायला मिळू शकतात. नांदूर मध्यमेश्वरमध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे जातीचे पक्षी आजवर आढळले आहेत. शिवाय निरनिराळ्या प्रकारचे मासे, जलचर आणि पाणवनस्पतीदेखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे जर तुम्ही निसर्गप्रेमी, प्रक्षी निरिक्षक असाल तर या ठिकाणा अवश्य भेट द्या. या ठिकाणी या पक्ष्यांचा मनमोहक अदा पाहत तुमचा वेळ कसा जाईल हे तुम्हाला समजणारही नाही. सप्टेंबर ते मार्च हा या ठिकाणी भेट देण्याचा एक उत्तम काळ आहे.
नाशिकमधील आकर्षणाची केंद्र आहेत या ठिकाणीची धरणे. यातील गंगापूर धरण खूपच प्रसिद्ध आहे. गोदावरीच्या पात्रावर बांधलेलं गंगापूर धरण पर्यटकांचे खास ठिकाण आहे. नाशिक शहरापासून ते जवळजवळ दहा किलोमीटरवर आहे. 1954 साली अगदी पारंपरिक पद्धतीने दगड, माती, चिखलाचा वापर करून ते बांधण्यात आलेलं आहे. या धरणाजवळ असलेलं गार्डन हे एक पिकनिकचं ठिकाण असून तिथे लोक त्यांच्या कुटुंब आणि मित्र परिवारासह मौजमजा करताना आढळतात. निसर्गाच्या कुशीत असल्याने विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला या ठिकाणी दिसतात.
नाशिकला फिरायला येणारा एक खास पर्यटक वर्ग आहे. कारण नाशिक विविध पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. त्यामुळे फक्त एकाच भेटीत अथवा एक ते दोन दिवसांत नाशिक पाहून होणार नाही. जर तुम्हाला नाशिक फिरण्यासाठी बराच वेळ असेल तर नाशिकच्या कॉईन म्युझिअम म्हणजेच नाणी संग्रहालयाला अवश्य भेट द्या. नाशिकमधील अंजेरी टेकडीवर हे संग्रहालय आहे. या संग्रहालयाची स्थापना 1980 साली झाली असून या ठिकाणी तुम्हाला भारतील सर्व नाणी आणि त्यांची माहिती मिळू शकते. या संग्रहायलात पर्यटकांसाठी निरनिराळ्या प्रकारची नाणी, नाण्यांचे साचे, प्रतिकृती, फोटो आणि त्याबद्दल माहिती पत्रके ठेवण्यात आली आहेत. आशिया खंडातील हे एक युनिक संग्रहालय असल्यामुळे या ठिकाणी अवश्य भेट द्या. नाशिकप्रमाणे मुंबईतील ही खास संग्रहालये तुम्ही पाहायलाच हवी.
नाशिकमधील दूधसागर धबधबाही खूप प्रसिद्ध आहे. ज्याला या ठिकाणी सोमेश्वर धबधबा या नावानेही ओळखलं जातं. नाशिक बस स्टेशनपासून हा धबधबा साधारणपणे नऊ किलोमीटरवर आहे. दहा मीटर उंच असलेला हा दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची चांगलीच गर्दी होते. पावसाळ्यात हा धबधबा पाहणं हा एक रोमांचक अनुभव असतो. कारण या काळात या ठिकाणी निसर्गाचे एक मनोहर दृश्य तुम्हाला पाहता येऊ शकते. हा धबधबा नाशिकमधील आंबेडकर नगरमध्ये वसलेला आहे. पावसाळ्यात कोणत्याही फी विना तुम्ही तो सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाहू शकता.
ब्रम्हगिरी म्हणजे भगवान ब्रम्हाचा पर्वत. प्राचीन आणि ऐतिहासिक कथांमुळे या पर्वताला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्र्यंबकेश्वरवरून तुम्ही या डोंगरावर जाऊ शकता. हा डोंगर चढण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असून तो चढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन ते चार तास लागतील. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर ब्रम्हगिरीला जाण्याची पद्धत आहे. डोंगरावरून त्र्यबंकश्वरचे विंहगम दृश्य दिसते. शिवाय डोंगरावर गंगेचा उगम पाहता येतो. या ठिकाणी भगवान शंकराने जटा आपटल्यामुळे गंगा प्रगट झाली अशी आख्यायिका आहे.
नाशिकमध्ये अनेक प्राचीन मंदीरे आहेत. नाशिक फिरण्याचे ठिकाण असल्यामुळे पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. त्याचप्रमाणे दर बारा वर्षांनी हिंदु धर्मात होणारा कुंभमेळा नाशिकमध्ये आयोजित केला जातो. द्राक्षं, मनुकांसाठी नाशिक प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे येवल्याची प्रसिद्ध पैठणी घेण्यासाठीही नाशिकला भेट दिली जाते.
नाशिकला मुंबईहून रोडमार्गे अथवा रेल्वेने जाता येते. ज्यामुळे मुंबई ते नाशिकला जाणाऱ्या अनेक ट्रेन आहेत शिवाय बस अथवा खाजगी वाहनाने तुम्ही अडीच ते तीन तासात मुंबईहून नाशिकला जाऊ शकता.
नाशिकमध्ये फिरणं हे खूपच बजेट फ्रेंडली आहे. तुम्ही किती दिवस नाशिकमध्ये राहता, कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट देता यावर तुमचा नाशिकमधील प्रवास, राहण्याचा आणि खाण्याचा खर्च अवलंबून आहे. मात्र अंदाजे दोन दिवस नाशिकमध्ये राहण्यासाठी आणि जेवणाचा दोन माणसांचा कमीत कमी खर्च पाच ते सहा हजार इतका असू शकतो.