सांदण दरी (Sandan Valley) एक थरारक अनुभव

सांदण दरी (Sandan Valley) एक थरारक अनुभव


ट्रेक करायला आवडत असेल आणि या नव्या वर्षी ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल तर नगर जिल्ह्यातील ‘सांदण दरी’ तुमच्यासाठी आहे बेस्ट ठिकाणं. ट्रेकच्या दृष्टिकोनातून याची पातळी थोडी कठीण असली तरी देखील अशक्य मुळीच नाही. अफलातून निसर्गाचे वरदान या व्हॅलीला लाभले आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रेक केला नाही तर तुम्ही आयुष्यात एक अॅडव्हेंचर मिस केला असे तुम्हाला कायम वाटेल. सांदण दरीला भेट प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आणि मोबाईल सोशल मीडियापासून साधारण दोन दिवस दूर गेल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती या ठिकाणी मिळाली. आयुष्य हे सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करण्यासाठी एकदा तरी सांदण व्हॅली करायलाच हवी असे मला वाटते. जर तुम्ही या ट्रेकला जाण्याचा विचार करत असाल तर वाचा हा माझा थरारक अनुभव

गुलाबी शहर जयपूरचा फेरफटका, शॉपिंग आणि बरेच काही...मग तुम्ही कधी जाताय?

सम्राड गावापासून सुरुवात

व्हॅलीतील उंच कड्यावरुन काढलेला फोटो

 सांदण व्हॅली ही अहमदनगरच्या सम्राड गावात आहे. त्यासाठी आम्ही मुंबईहून शुक्रवारी रात्री बसने निघालो. अहमदनगरला पोहोचायला साधारण 5 तास लागतात. हा ट्रेक भल्या पहाटेच सुरु केला जातो. त्यानुसार सम्राड गावाला पोहोचण्यासाठी लवकर निघावे लागते. काही नियम असल्यामुळे या गावात जाण्याची एंट्री ही सकाळी 5 वाजता मिळते. त्यानंतर येथील गेट उघडले जाते. सम्राड गाव फार मोठे नाही आणि रात्रीच्या काळोखात तर कसालच अंदाज येत नाही. या ठिकाणी फ्रेश घेऊन आणि थोडासा आराम करुन साधारण .6.30 वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली. अगदी सुरुवातीच्या पॅचच्या वेळी मोठ मोठे दगड दिसू लागतात त्यांच्यावरुन चालताना थोडी गंमत वाटते. पण जसं जसा व्हॅलीमध्ये प्रवेश होतो.त्यानंतर फक्त व्हॅलीत मोठंमोठे दगड दिसू लागतात. साधारण 15 मिनिटं चालल्यानंतर पहिला पाण्याचा पॅच येतो. पाणी स्वच्छ असले तरी तळ फारसा दिसत नाही. खाली-वर दगड असल्याने काही ठिकाणी पाणी इतके खोल जाते की, पूर्ण बुडायला होते. पण या व्हॅलीत अनेक ट्रेकर्स ग्रुप आलेले असतात जे आपल्याला वेळोवेळी यातून जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. त्यामुळे इतरांचे ऐकणे या ठिकाणी फार महत्वाचे असते. हा वॉटर पॅच सुरुवातीला छान रिसोर्टमध्ये गेल्याचा अनुभव देतो. पण नंतर मात्र तो कठीण होत जातो आणि थोडी भिती वाटायला लागते. या ठिकाणी बॅग डोक्यावर घेतल्याशिवाय काहीही पर्याय नसतो. 


हा एक टप्पा पार झाला की, अशाच ओल्या कपड्यात पुढे जावे लागते.कारण कपडे बदलणे, वाळवणे असे इथे काहीही होऊ शकत नाही. थंडगार पाणी आणि ओले कपडे काही वेळासाठी थंडीचा अनुभव देतात. पण तुम्ही जसं चालतं राहता तसं तुम्हाला ते अगदी सवयीचं होऊन जातं. आता व्हॅली अर्थात दरी म्हणजे या दरीत उतरुन तुम्हाला पुढे जायचं असतं. ही दरी एखाद्या मृगजळाप्रमाणे वाटते.  कारण आता संपेल आता संपेल असे वाटत राहते. पण तसे मुळीच होत नाही. आम्हाला साधारण ही दरी पार करण्यासाठी 8 ते  9 तास लागले. या प्रवासात तीन पॅचमध्ये तुम्हाला रॅपलिंग (Rapling) करावे लागते. पहिली रॅपलिंग ही साधारण 30 फूट खोल आहे. त्यानंतर पुढे पुढे त्या कमी होत जातात. पण रॅपलिंगचा जर पहिला अनुभव असेल तर थोडा त्रास होतो. कारण शरीराचा संपूर्ण भार पायांवर झेलावा लागतो. जे करताना खूप दमछाक होते. 


 ही सगळी व्हॅली पार केल्यानंतर तुम्हाला लगेच गाव लागत नाही किंवा खाण्याची काहीही सोय नसते. त्यामुळे खाण्याच्या गोष्टी सोबत ठेवणे फारच गरजेचे आहे. पाण्याच्या बाटल्या, एनर्जी पावडर, केक, बिस्कीट अशा गोष्टी सोबत ठेवल्या तर त्याचा आधार मिळतो. दरी एका दमात पार करता येत नाही. त्यासाठी थोडा थोडा ब्रेक घ्यावाच लागतो. पण एकट्याने ही दरी उतरायला जाऊ नका. एखाद्या ग्रुपसोबत जाल तर जास्त फायदा होतो.


दरी उतरल्यानंतर छान तंबूत राहण्याचा अनुभव घेता येतो. झऱ्याचे पाणी पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी कायम उपलब्ध असते. येथील पाण्याची चव तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे या झऱ्यातील पाणी अगदी बिनधास्त प्या. त्या दिवसाची रात्र तंबूत घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा शहापूरच्या डेहाने गावाच्या दिशेने चालत प्रवास सुरु करता. हा प्रवासही काही कमी नाही . साधारण 3-4 तास चालत हे गाव लागते. तेथे बस किंवा गाडी येऊ शकते. त्यामुळे तिथून तुमचा ट्रेक संपतो. मध्ये तुम्हाला फोटो काढण्यासाठी अनेक चांगले स्पॉट मिळतील. पण दरीच फोटो काढताना थोडे जपून कारण काही भाग फोटोत चांगले दिसू शकतात. पण तुमच्या आयुष्यासाठी घातकही ठरु शकतात. त्यामुळे अतिशहाणपणा थोडासा बाजूला ठेवूनच हा ट्रेक करा. 

दुबईची टूर प्लॅन करताय,मग या ठिकाणांना अवश्य भेट द्या

कमीत कमी सामान

ट्रेक हे नेहमी कमीत कमी सामानात करणे गरजेचे असते. सांदण दरीत तुम्हाला याचा अनुभव चांगलाच येईल. खडकातून उतरताना पाठिवर योग्य वजन असेल तर तुम्हाला थकवा येत नाही. त्यामुळे या दरीत उतरताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्हाला असे कपडे घालायचे आहेत. जे भिजल्यानंतर पटकन वाळतील.  कारण व्हॅलीमध्ये असे पाण्याचे पॅच आहेत जिथे चक्क 4 फुटांपर्यंत पाणी आहे. अशावेळी बॅग डोक्यावर घेऊन तुम्हाला खडकाळ पाण्यातून मार्ग काढावा लागतो. या शिवाय रॅपलिंग आणि कडे कपार उतरताना जड बॅग ही अडथळा होऊ शकते. त्यामुळे कमीत कमी आणि योग्य इतकेच सामान स्वत:सोबत ठेवा. या बॅगमध्ये मुव्ह स्प्रे (कारण पाय मांड्या, पोटऱ्या सगळं काही इतकं दुखतं की विचारता सोय नाही). ट्रेकसाठी उत्तम दर्जाचे स्पोर्टस शूज आणि कपडे वापरा म्हणजे ते फाटण्याची आणि तुटण्याची शक्यता नाही. 


योग्य चौकशी करुन पाऊस नसेल अशा काळात हा ट्रेक करा. तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव येईल. 

कोरोनाचे टेन्शन न घेता महाराष्ट्रातील या ठिकाणांना बिनधास्त द्या भेट