फॅशनेबल दिसण्यासाठी कान, नाक अथवा शरीरावरील विविध अवयवांवर टोचणं (Piercing) ही एक सामान्य गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीत लहान बाळाचे कानही त्याच्या जन्मानंतर बाराव्या दिवशी टोचले जातात. नामकरण विधीसाठी बाळाचे कान सोनाराकडून टोचून घेण्याची भारतीय परंपरा आहे. बालपणी कानाच्या पाळ्या नाजूक आणि मऊ असल्यामुळे कान टोचताना बाळाला फार त्रास होत नाही. मात्र जेव्हा तुम्ही मोठेपणी फॅशनेबल दिसण्यासाठी शरीरावरचे अवयव टोचून घेता तेव्हा बऱ्याचदा इनफेक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे कधी कधी टोचलेल्या ठिकाणी त्वचा लालसर होणं, फोड येणं, फोडामधून रक्त येणं, जखम होऊन पू जमा होणं, त्वचेवर सूज येणं अशा त्वचेच्या समस्या जाणवतात. यासाठीच नाक, कान टोचण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.
त्वचा ही अतिशय नाजूक असते. ज्यामुळे तिच्यावर इनफेक्शन होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. जर तुम्हाला फॅशनेबल दिसण्यासाठी नाक, कान अथवा शरीरावरचा इतर एखादा अवयव टोचायचा असेल तर त्याआधी त्या भागावरची त्वचा स्वच्छ करून घ्या. ज्यामुळे इनफेक्शनचा धोका कमी होऊ शकतो. जर तुम्ही ज्या भागावर टोचून घेणार आहात तिथे आधीच एखादे इनफेक्शन अथवा जखम असेल तर टोचण्याची घाई करू नका. काही दिवस थांबा त्वचेचा त्रास कमी झाला की मग टोचून घ्या.
जर तुम्ही तुमचे नाक, कान अथवा टोचून घेणार असाल तर तुम्हाला त्यामुळे होणारा त्रास आधीच माहीत असायला हवा. कारण तुमची शारीरिक अवस्था आणि प्रतिकार शक्ती यावर तुम्हाला कोणता त्रास होईल अथवा नाही हे ठरू शकतं. बऱ्याचदा लोकांना नाक, कान टोचल्यावर त्या जागी सूज येते. काहींना जळजळ जाणवते, कुणाला त्या ठिकाणी जखम होते आणि प्रचंड दाह होतो. जर तुम्हाला मधुमेह असेल तर जखम पटकन बरी होत नाही. मात्र शारीरिक समस्या नसतील तर हे त्रास दोन ते चार दिवसांमध्ये बरे होतात. यासाठीच शरीरावर कोणत्याही भागावर टोचून घेण्याआधी तुम्हाला तुमची शारीरिक स्थिती माहीत असायला हवी.
नाक किंवा कान टोचले तर लगेच त्यावर अॅंटि बॅक्टेरिअल क्रीम लावा. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर इनफेक्शन होणार नाही. तुमच्या स्किन स्पेशलिस्टकडून एखादं चांगलं क्लिंझर घ्या आणि त्याने तुमचा टोचलेला भाग नियमित स्वच्छ करा. कारण जर तुमच्या टोचलेल्या भागावर सतत धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचा संपर्क झाला तर तुम्हाला इनफेक्शन होण्याची शक्यता वाढू शकते. त्याचप्रमाणे जरी तुम्ही फॅशन कॅरी करण्यासाठी नाक, कान टोचलं असेल तरी काही दिवस त्या भागावर कोणतेही दागिने वापरू नका. कारण दागिन्यांचे मटेरिअल, अस्वच्छता यामुळे तुम्हाला अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. कान अथवा नाक टोचलेल्या भागाला सतत हात लावू नका. तुमच्या हातामुळेही त्या भागाला इनफेक्शन होऊ शकतं. अंघोळ करताना अथवा तोंड धुताना नाक,कान टोचलेला भाग दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. कारण सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये जखम ताजी असल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. काही दिवसांमध्येच ही जखम बरी होईल आणि मग तुम्हाला हवी तशी फॅशन करता येईल.
नाक कान टोचल्यावर जर तुम्हाला त्वचेचं इनफेक्शन झालं तर या गोष्टींची काळजी घ्या