मॅनोपॉजमुळे होतो का महिलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम

मॅनोपॉजमुळे होतो का महिलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम

प्रत्येक स्त्रीला आयुष्यात निरनिराळ्या टप्यामधून जावे लागते. किशोरवयात मासिक पाळी आल्यापासून ते अगदी उतारवयात ती जातानाही अनेक शारीरिक आणि मानसिक बदल तिच्या मध्ये होत असतात. मॅनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीच्या काळात तिच्या मध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होण्यामागची कारणंही अनेक असू शकतात. या काळात होणारे हॉर्मोनल बदल, चिंता-काळजी, कुटुंबातील ताणतणावर यामुळे परिस्थिती अधिकच बिघडत जाते. मुळातच मॅनोपॉजची लक्षणे माहीत नसणं आणि त्याविषयी कुटुंबात चक्क अज्ञान असणं हे या समस्या वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. यासाठीच याबाबत महिला आणि त्याच्या कुटुंबियांना या विषयी बेसिक माहिती असायलाच हवी. ज्यामुळे त्यावर नियंत्रण राखणं सोपं जाऊ शकतं. काही महिलांना या काळात लक्षात न राखण्याचा त्रास जाणवतो. छोट्या छोट्या गोष्टी त्या विसरून जातात. वजन वाढणं, मूड स्विंग होणं याप्रमाणेच स्मरणशक्ती कमी होणं हे ही मॅनोपॉजचं एक लक्षण आहे. 

मॅनोपॉज आणि स्मरणशक्ती

मॅनोपॉजमध्ये हॉर्मोनल बदलांमुळे स्त्रीच्या शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. मात्र संशोधनात या शारीरिक बदलांपेक्षा मानसिक बदल जास्त प्रमाणात होतात असं आढळून आलं आहे. ज्यामुळे अनेक महिलांना या काळात छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. मात्र मॅनोपॉजची लक्षणं ही काळापुरती मर्यादित असतात. त्यामुळे जर तुम्हाला या काळात लक्षात राहत नसेल तर ते मॅनोपॉजचं एक लक्षण आहे हे समजून घ्या. विसरण्यासोबतच एखादी गोष्ट समजून घेणे अथवा नव्या गोष्टी आत्मसात करणं हेही या काळात महिलांसाठी आव्हानात्मक असू शकतं. ज्यामुळे मॅनोपॉज आणि स्मरणशक्तीचा नक्कीच सबंध आहे असं काही संशोधकांचे म्हणणे आहे. वयानुसार स्मरणशक्तीवर परिणाम होतो हे जरी काही प्रमाणात खरं असलं तरी पंचेचाळीस ते पन्नास या वयोगटातील महिलांना मॅनोपॉजमुळेही लक्षात ठेवणं कठीण जाऊ शकतं. या संदर्भात काही महिलांवर केलेल्या संशोधनात असं आढळलं आहे की मॅनोपॉजचा काळ सुरू होण्यापू्र्वी आणि नंतर काही काळ महिलांना हा त्रास जास्त प्रमाणात जाणवला. यामागे महिलांना मॅनोपॉजबाबत असलेली कमी माहिती, ताणतणाव, शारीरिक आणि मानसिक आजार या गोष्टींचीही जोड असू शकते. यासाठीच या  काळात महिलांनी स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी आणि कुटुंबियांना याबाबत सांगण्याचा संकोच करू नये. मॅनोपॉजच्या काळात अशा अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या महिलांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या या समस्येबाबत जागरूक असावे. ज्यामुळे महिलांचा मॅनोपॉजचा काळ नक्कीच सुखावह असू शकतो. 

मॅनोपॉजमध्ये स्मरणशक्ती कमी झाल्यास करा हे उपाय

मॅनोपॉजची लक्षणं ही काळापुरती असतात त्यामुळे योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास मॅनोपॉजनंतर महिला पूर्ववत होऊ शकतात. यासाठीच या काही टिप्स लक्षात ठेवा.

  • योग्य,सतुंलित आणि मेंदूलाा चालना देणारा आहार घ्या
  • शांत झोप घ्या आणि जासस्त दगदग करू नका
  • वर्क आऊट अथवा लाईट इंटेसिटी एक्सरसाईझ नेहमी करा
  • मेंदूला चालनान मिळेल अशा अॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या
  • कामाच्या ताण तणावापासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा
  • प्रत्येक महिलेचे मॅनोपॉजचे लक्षण वेगवेगळे असू शकते यासाठीच तुमच्या शरीराप्रकृती आणि लक्षणानुसार वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.