तिखट, मसालेदार आणि चमचमीत पदार्थ चवीला मस्त लागतात. त्यामुळे असे पदार्थ खाण्याची अनेकांना आवड असते. मात्र मसालेदार पदार्थ खाण्यामुळे आरोग्य बिघडत असं सांगितलं गेल्यामुळे ते खाऊ नयेत असाच सल्ला अनेकजण देतात. मात्र असं नाही मसालेदार पदार्थांचे आरोग्यावर अनेक चांगले फायदेही होतात. फक्त हे पदार्थ अती प्रमाणात सेवन करू नयेत. त्यामुळे जर तुम्हाला असे चमचमीत हॉट आणि स्पायसी पदार्थ आवडत असतील तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरू शकते.
लाल तिखटामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, प्रोए व्हिटॅमिन आणि भरपूर अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशी प्रतिकारशक्ती निर्माण होते. आजारपणाशी लढा देण्यासाठी हे पदार्थ तुमच्या शरीराला मदत करतात. इनफेक्शन टाळण्यासाठी आणि रोगापासून दूर राहण्यासाठी आहारात तिखट पदार्थ असणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरतं.
मसालेदार पदार्थ त्वचेसाठी फायद्याचे आहेत हे ऐकून तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. मसालेदार पदार्थांमुळे शरीराला पुरेसे मायक्रोबियल गुणधर्म मिळतात. ज्यामुळे तुमच्या शरीराचे बॅक्टेरिआ आणि इनफेक्शनपासून संरक्षण होते. लसूण, आलं, जीरे, वेलची, लेमनग्रास, लवंग असे पदार्थ जर तुमच्या आहारात असतील तर तुमचे आरोग्य तर सुधारतेच शिवाय तुमच्या त्वचेचं इनफेक्शनपासून संरक्षणही होतं. त्वचेवर नितळपण आणि नैसर्गिक चमक येते. त्यामुळे सौंदर्य वाढवण्यासाठी आहारातील मसालेदार पदार्थ तुमच्यासाठी उपयुक्त ठरतात.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्व जण सतत ताणतणाव आणि चिंतेत आढळतात. ताणतणावाचे प्रमाण वाढून अनेकजण पुढे नैराश्याच्या अधीन होतात. मात्र जर तुमच्या आहारात तिखट पदार्थ असतील तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मसालेदार पदार्थांमध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या शरीरात स्ट्रेस रिलिज करणारे हॉर्मोन्स वाढतात. तणाव कमी करण्यासाठी असे हॉर्मोन्स शरीराला गरजेचे असतात.
असं म्हणतात मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तुमच आयुष्य वाढतं. मसालेदार पदार्थांमुळे तुम्हाला पित्त, जळजळ असे त्रास जाणवतात हे खरं असलं तरी ते अती प्रमाणात मसालेदार पदार्थ खाण्यामुळे होणारे तोटे आहेत. जर तुम्ही प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ले तर तुमच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. एवढंच नाही तर यामुळे तुमचे आयुष्य वाढते.
कोणताही पदार्थ अती प्रमाणात सेवन केला तर त्याचे दुष्परिणाम हे होतातच. त्याचप्रमाणे अती तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. शिवाय प्रत्येकाच्या शरीराची ठेवण, आहाराची पद्धत, राहत असलेले वातावरण वेगवेगळं असतं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम शरीरावर होत असतो. ज्या लोकांना आधीच आतड्याच्या समस्या, पित्ताचा त्रास, पोटाचे विकार, अॅसिडिटी असेल त्यांनी आहारात तिखटाचे प्रमाण कमी करावे. गरोदर महिला, स्तनपान देणाऱ्या माता, लहान मुले आणि वृद्ध मंडळींनी आहारात तिखट पदार्थ खाऊ नयेत. कारण त्यामुळे त्यांच्या पचनशक्तीवर दुष्परिणाम होऊ शकतो. तिखट आरोग्यासाठी लाभदायक असलं तरी ते प्रमाणात खाणं नेहमीच फायद्याचं ठरतं.