तुम्ही दररोज करता का जीभ स्वच्छ, फॉलो करा या सोप्या टिप्स

तुम्ही दररोज करता का जीभ स्वच्छ, फॉलो करा या सोप्या टिप्स

तोंडांची स्वच्छता राखण्यासाठी तुम्ही नियमित दात घासता आणि सतत चुळहीभरता. मात्र तुम्ही दररोज तुमची जीभ स्वच्छ करता का? जर तुम्ही दररोज जीभ स्वच्छ करत नसाल तर तुम्हाला गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. कारण जीभेचा आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होत असतो. आपण दातांप्रमाणेच जीभेच्या मदतीने जेवत असतो. जर जीभ निरोगी नसेल तर अन्नपदार्थांमध्ये चावताना व्यवस्थित लाळ मिसळली जाणार नाही. ज्याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होऊन आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढेल. जीभ नियमित स्वच्छ न केल्यास जीभेवर पांढरट, पिवळ्या रंगाचा थर जमा होतो. तुम्ही जे अन्नपदार्थ खाता त्यामुळेच जीभेवर हा थर जमा होत जातो. म्हणूनच नेहमी जेवल्यावर आणि सकाळी उठल्यावर जीभेवरचा हा थर स्क्रॅपरने काढून टाकायला हवा. असं न केल्यास हा थर दिवसेंदिवस वाढत जातो आणि तिथे जीवजंतू पोसले जातात. तोंडाच्या आरोग्यासाठी हे मुळीच हितकारक नाही. या सवयीमुळे तु्म्हाला ओरल इनफेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो.

अशी राखा तोंडाची स्वच्छता

तोंडाची स्वच्छता आरोग्यासाठी खूप गरजेची आहे यासाठी फॉलो करा या टिप्स

 • दिवसभरातून दोनदा दात घासा आणि तोंड स्वच्छ करा.
 • वर्षातून एकदा अथवा दोनदा डेटिस्टकडे  तोंड, दात, हिरड्या तपासून घ्या.
 • दात घासण्यासोबत नियमित फ्लॉसिंग करा.
 • नियमित पोषक आणि संतुलित आहार घ्या.
 • जीभ स्क्रॅपर्सच्या मदतीने स्वच्छ करा.
 • काही लोक जीभ टुथ ब्रशने स्वच्छ करतात,मात्र टुथब्रशच्या तुलनेत स्क्रॅपर्स जीभ स्वच्छ करण्यासाठी जास्त प्रभावी असतात. कारण त्यामुळे जीभेवरचा अन्नकणांचा थर मुळापासून स्वच्छ होतो. यासाठी जीभ स्वच्छ करण्यासाठी बाजारात मिळणारे मेटल अथवा प्लास्टिकचे स्क्रॅपर्स विकत घ्या. 
 • बाजारात टंग क्लिनर अथवा स्क्रॅपर्स निरनिराळ्या शेपमध्ये  मिळतात, यातील व्हि शेपचे स्क्रॅपर्स जास्त परिणामकारक ठरतात.
 • स्क्रॅपर्सने जीभ स्वच्छ करण्यासाठी जीभ तोंडाच्या बाहेर काढा आणि मगच स्क्रॅपर त्यावरून फिरवा
 • जीभ स्वच्छ करण्यापूर्वी स्क्रॅपर गरम पाण्यात निर्जंतूक करून घ्या.
 • स्क्रॅपर्स वर खालच्या दिशेला फिरवून तुम्ही जीभेवरचा थर काढून टाकू शकता. 
 • स्क्रॅपर्स फार जोरात जीभेवर घासू नका नाहीतर त्यामुळे जीभेवर दुखापत होऊ शकते. 
 • दिवसभरात सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी असं दोन वेळा जीभ स्वच्छ करा.
 • जीभ स्वच्छ केल्यावर कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा. 

जीभ स्वच्छ केल्याचे फायदे

दाताप्रमाणेच जीभ स्वच्छ केल्याचे अनेक फायदे आहेत. 

 • तोंडाची स्वच्छता राखली जाते आणि तोंडाचे आरोग्य सुधारते.
 • जीभेची स्वच्छता राखल्यामुळे दातांचे इनफेक्शन होण्याचा धोकाही कमी होतो आणि दात तुटणे अथवा कीड लागण्याची शक्यता कमी होते.
 • जीभेची स्वच्छता राखल्याने हिरड्या मजबूत होतात.  कारण तोंडातील जीवजंतू यामुळे नष्ट होतात.
 • जीभ नियमित स्वच्छ केल्यामुळे वारंवार तोंड येणे, जीभेला फोड येणे अशा समस्या होत नाहीत.
 • तोंडाला येणारा घाण वास अथवा दुर्गंधी यामुळे कमी होते. 
 • ज्या लोकांच्या तोंडाची चव गेल्यामुळे अन्नाची वासना कमी होते त्यांनी जीभेच्या स्वच्छतेची नियमित काळजी घ्यावी.