बाजारातील भेसळयुक्त पीठ ओळखण्यासाठी सोप्या टिप्स

बाजारातील भेसळयुक्त पीठ ओळखण्यासाठी सोप्या टिप्स

आजकाल बाजारातील अनेक गोष्टींमध्ये जास्त फायदा मिळवण्यासाठी दुकानदार भेसळ करताना आढळतात. भेसळयुक्त पदार्थ खाण्यामुळे ग्राहकांचे आरोग्य बिघडू शकते ही साधी गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. ज्यामुळे बाजारात मिळणारं तेल, पीठ, मध, मसाले, तूप शुद्ध असेलच याची खात्री देता येत नाही. पूर्वी धान्य विकत आणून ती स्वच्छ करून गिरणी, घरघंटीवर दळून त्याचे पीठ तयार केले जात असे. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे इतका वेळ असेलच असं नाही. ज्यामुळे बाजारातील तयार पीठ विकत घेण्याकडे कल वाढला आहे. तुम्ही देखील असं तयार पीठ विकत घेत असाल तर ते भेसळयुक्त नाही ना याची आधीच खात्री करून घ्या. यासाठी पीठ भेसळयुक्त आहे का हे ओळखण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.

पीठात केलेली भेसळ ओळखण्यासाठी तुम्हाला मशीन अथवा तंत्रज्ञानाची मदत घेण्याची गरज नाही. घरातच  अगदी साधे आणि सोपे उपाय करून तुम्ही पीठातील भेसळ ओळखू शकता. बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर गव्हाचे पीठ तयार करण्यासाठी दुकानदार त्यामध्ये बोरिक पावडर, मैदा असे पदार्थ मिसळतात. मात्र तुमचे पीठ असे पदार्थ मिसळून भेसळयुक्त केलेले आहे का हे ओळखण्यासाठी  तुमच्या घरातील काही पदार्थ तुमच्या नक्कीच मदतीचे आहेत. 

भेसळयुक्त पीठ ओळखण्यासाठी टिप्स

कसं ओळखावं पीठ चांगलं आहे की भेसळयुक्त, यासाठी वापरा या सोप्या घरीच करता येतील अशा टिप्स

पाण्याने ओळखा भेसळयुक्त पीठ

भेसळयुक्त पीठ ओळखण्यासाठी फक्त एक ग्लास पाणी तुमच्या मदतीला येऊ शकतं. कारण या पाण्यामुळे तुम्हाला लगेच कळेल की पीठ भेसळयुक्त आहे की नाही. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा गव्हाचे पीठ मिसळा. जर हे पीठ खाली न बसता वरच तरंगू लागले तर समजा की या पीठात काहीतरी मिक्स करण्यात आलं आहे. ज्या पीठात गव्हाचा कोंडा कमी असतो ते पीठ भेसळयुक्त असण्याची शक्यता अधिक असते.

हायड्रोक्लोरिक अॅसिड 

भेसळयुक्त पीठ ओळखण्याची ही एक साधी आणि सोपी पद्धत आहे. यासाठी एखादे काचेचं भांडं घ्या आणि त्यामध्ये गव्हाचे पीठ टाका. या पीठात थोडंसं हायड्रोक्लोरिक अॅसिड मिसळा.  असं केल्यावर जर तुमच्या पीठाचा रंग बदलला अथवा पीठात काहीतरी मिसळलेलं आहे असं तुम्हाला दिसलं तर तुमचं पीठ भेसळयुक्त आहे हे ओळखा. हायड्रोक्लोरिक अॅसिड तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळू शकतं. 

लिंबाचा रस 

लिंबाच्या रसानेही तुम्हाला तुमचे पीठ भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखता येऊ शकते. यासाठी एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या आणि त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा. जर लिंबाचा रस मिसळल्यावर पीठातून बुडबुडे येऊ लागले तर तुमच्या पीठात काहीतरी मिसळलेले आहे. 

आम्ही शेअर केलेल्या या टिप्स वापरा आणि मगच बाजारातील पीठ विकत घ्या. बऱ्याचदा अशा पीठांमध्ये मैद्या आणि खडूची पावडरही मिसळलेली असते. यासाठीच बाजारातील तयार पीठ घ्यायचे असेल तर एखाद्या चांगल्या ब्रॅंडचे पीठ विकत घ्या. अशा पिठांमध्येही बऱ्याचदा ते जास्त काळ टिकावे  यासाठी प्रिझर्व्हेटिव्ज टाकलेले असतात. ज्यामुळे ते पीठ तुमच्या आरोग्यासाठी योग्य असतंच असं नाही. जर तुम्हाला पीठातील पोषकमुल्य मिळावी असं वाटत असेल तर पांरपरिक पद्धतीने गिरणीवर दळलेलं पीठ तयार करून घेणं हाच एकमेव उत्तम मार्ग आहे. कारण अशा पिठामध्ये कोणतीही भेसळ तर नसतेच शिवाय पुर्ण धान्य दळल्यामुळे त्यात धान्याची पोषकमुल्य आणि भरपूर फायबर्स असतात.