चिकनकारी अथवा लखनवी ड्रेस वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात

चिकनकारी अथवा लखनवी ड्रेस वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात

चिकनकारी हा एम्ब्रॉयडरी कापडाचा एक असा पारंपरिक प्रकार आहे जो आजही देशभरातील अनेक महिलांना भुरळ घालत असतो. भारतातील लखनऊमध्ये हे कापड तयार केले जाते म्हणून त्याला लखनवी असं म्हणतात. लखनऊमधील चौकमध्ये अनेक कामगार चिकनकारीचं बारीक एम्ब्रॉडरीचं काम करताना आढतात. या कापडाचे रंग आणि बारीक काम त्याचे सौंदर्य अधिकच वाढवतात. आजकाल चिकनकारीचा वापर ब्रायडल आऊटफिट्समध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. ज्यामुळे सेलिब्रेटीजही अनेक कार्यक्रमात लखनवी आऊटफिट्स कॅरी करताना दिसतात.

असं मानलं जातं की मुघल साम्राज्याचा सम्राट जहांगीरची पत्नी नूरजहाॅंमुळे भारतात चिकनकारी लोकप्रिय झाली. कारण तिने येताना हे कापड भारतात आणलं. हे कापड विणणं हे कौशल्य असून अतिशय बारीक सुईने हे सुंदर विणकाम केलं जातं. चिकनकारीचे काम करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. ज्यामुळे ते कापड अधिकच आकर्षक आणि सुंदर दिसतं. आजकाल मशिनवर चिकनकारी कापडाचे काम केले जाते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर कुर्ती, ड्रेस, साडी आणि दुपट्टे वापरले जातात. हॅंडवर्क आणि मशिनवर्क केलेल्या कापडामध्ये खूप फरक असतो. कॉटन, शिफॉन, मलमल, रेशम, ऑर्गेना, नेटवर हे नाजूक काम केलं जातं. पूर्वी फक्त यासाठी पांढऱ्या धाग्याने वर्क केलं जातं असे मात्र आता निरनिराळ्या रंगाच्या धाग्यांचा वापर यासाठी केला जातो. ज्यावर मोती, खडे आणि आरशांचे काम करून त्याची शोभा आणखी वाढवली जाते. 

हॅंडवर्क करण्याची प्रक्रिया खूपच मोठी आणि मेहनतीची असते. ज्यात आधी कापड कापून त्याला ब्रॉक प्रिटिंग केलं जातं. पुढे त्यावर भरतकाम करून कापड धुतलं जातं. नंतर त्यावर एम्ब्रॉयडरी करून आणि सजावट करून ड्रेस, साडी, दुपट्टाच्याची फिनिशींग गेली जाते.  कापडावर कसं काम केलेलं आहे यावरू त्या कापडाची किंमत ठरते. हॅंडवर्क केलेलं चिकनकारी कापड खूप महाग असतं. म्हणूनच या कापडापासून तयार केलेले कुर्ती, ड्रेस, साडी आणि दुपट्टे याची विशेष काळजी घ्यावी लागते. 

Instagram

चिकनकारी अथवा लखनवी कापडाची कशी घ्यावी काळजी -

लखनवी अथवा चिकनकारी केलेले ड्रेस, कुर्ती, दुपट्टा आणि साडी नाजूक आणि हलक्या रंगाचे असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी. 

  • चिकनकारी अथवा लखनवी कापड बऱ्याचदा पांढऱ्या अथवा पेस्टल रंगाचे असते. त्यामुळे ते धुताना इतर कपड्यांसोबत धुवू नये
  • कॉटन चिकनकारीचा ड्रेस शिवण्यापूर्वी कापड धुवून मग शिवावा ज्यामुळे ते कापड थोडे आटले तरी ड्रेस तोकडा होत नाही
  • चिनककारी अथवा लखनवी कापडावर नाजूक काम केलेले असल्यामुळे ते पहिल्यांदा धुताना ड्राय क्लिन करावे अथवा सौम्य साबणाने हाताने धुवावे
  • चिकनकारी अथवा लखनवी कापड कधीच मशिनमध्ये धुवू नये असं केल्यास त्यावरील नाजूक काम खराब होण्याची शक्यता असते
  • कॉटन चिकनकारी धुतल्यावर स्टार्च केल्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे दिसू शकते
  • चिकनकारी अथवा लखनवी ब्रायडल ड्रेस नाजूक असल्यामुळे ते वॉर्डरोबमध्ये सुती कापडात गुंडाळून ठेवावे. ज्यामुळे त्याच्यावर केलेले नाजूक काम खराब होत नाही