केळवणाचा बेत आखताय, मग बनवा हे खास पदार्थ (Kelvan Menu In Marathi)

Kelvan Menu In Marathi

महाराष्ट्रात नवीन लग्न ठरलेल्या वधूवरांचे केळवण करण्याची पद्धत आहे. हा विधी लग्नाआधी केला जातो. या निमित्ताने मित्रमंडळी, नातेवाईक नववधू अथवा वराच्या घरातील मंडळींना जेवणाचं आमंत्रण देतात. वधू वराच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खाऊ घालतात. प्रेमाचं प्रतिक म्हणून वधूवरांना गिफ्ट दिलं जातं आणि भरपूर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. केळवणात बऱ्यातदा साडी, कपडे, दागदागिने, मौल्यवान वस्तू, रूखवतातील वस्तू, संसारासाठी उपयुक्त वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात. लग्नाआधी घरचं केळवण करण्याचीदेखील पद्धत आहे. ग्रहमखाआधी वधूवरांच्या अगदी जवळची नातेवाईक मंडळी एकत्र जमतात आणि सहभोजनाचा आनंद घेतात. केळवणातून प्रेम, आदर, नातेसंबध दृढ होतात. आजकालच्या घाईगडबडीच्या काळातही आवर्जून केळवणाचे बेत आखले जातात. यासाठीच जाणून घ्या केळवणासाठी नेमके कोणते पदार्थ करावेत. केळवणासाठी वधूवराच्या आवडीचे पदार्थ केले जातात. मात्र जर तुम्हाला त्यांची आवडनिवड माहीत नसेल तर तुम्ही हे लोकप्रिय पदार्थ त्यांच्यासाठी बनवू शकता. 

Table of Contents

  श्रीखंड पुरी -

  श्रीखंड पुरी हा महाराष्ट्रातील एक स्पेशल पदार्थ आहे. त्यामुळे तो तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी करू शकता. 

  श्रीखंडासाठी साहित्य -

  • दही अथवा चक्का
  • साखर
  • वेलची पूड
  • जायफळ पूड

  श्रीखंड बनवण्याची कृती -

  श्रीखंड बनवण्याआधी एक दिवस दही घट्ट बांधून त्याचा चक्का तयार करा. सकाळी चक्क्यात साखर मिसळून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्या. नंतर ते चाळणीत गाळून घ्या. गाळलेल्या मिश्रणामध्ये वेलचीपूड आणि जायफळाची पूड टाकून ते फ्रीजमध्ये ठेवून द्या.

  पुरीसाठी साहित्य - 

  गव्हाचे पीठ

  मीठ

  तेल

  पुरी बनवण्याची कृती-

  गव्हाचे पीठ मीठ टाकून मळून घ्या. हवं असेल तर तुम्ही त्यात चवीसाठी जिरे टाकू शकता. तेल गरम करून मोहन दिल्यास पुऱ्या खुशखुशीत होतात. मळलेल्या पीठाता तेल लावून काही मिनिटे ठेवा. थोड्या वेळाने पीठ चांगले मऊ झाले की त्याच्या पुऱ्या लाटा आणि तेलात तळून घ्या. 

  instagram

  मसाले भात -

  मसालेभात ही तर महाराष्ट्रीय थाळीतील एक खासीयतच आहे.

  मसालेभाताचे साहित्य -

  • बासमती तांदूळ
  • मटारचे दाणे
  • बटाट्याच्या फोडी
  • तोंडली
  • लवंग
  • दालचिनी
  • जिरे
  • धणे
  • कांदा
  • लसणाची पेस्ट
  • मोहरी
  • हिंग
  • हळद
  • लाल मसाला
  • गोडा मसाला
  • तमालपत्र
  • काजू
  • ओला नारळ
  • कोथिंबीर
  • लिंबू
  • तेल 
  • मीठ 
  • तूप

  मसालेभात बनवण्याची कृती -

  तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा. तव्यावर धणे, जिरे, दालचिनी, लवंग भाजून त्याची पूड करून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात काजू तळून घ्या. काजू काढून ठेवल्यावर त्यात तमालपत्र, हिंग आणि मोहरीची फोडणी तयार करा. त्यात पातळ चिरलेला कांदा टाका, लसूण पेस्ट टाका आणि परतून घ्या. हळद, लाल तिखट, गोडा मसाला, खड्या मसाल्याची पूड परतून घ्या. त्यात सर्व भाज्या चिरून टाका. थोडं पाणी टाका आणि शिजू द्या. लवकर शिजण्यासाठी गरम पाणी वापरा. वरून भिजवलेले तांदूळ आणि काजू टाका. शिजण्यासाठी दोन  कप तांदळाला अडीच ग्लास पाणी टाका. पाणी गरम असेल तर मसालेभात लगेच शिजेल. सर्व मिश्रण एकत्र करा आणि भाद शिजला की गॅस मंद करून झाकण ठेवा. भात गरमागरम वाढताना त्यावर तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लिंबाने सजवा. 

  instagram

  कॉर्न कटलेट -

  वधूवरांना केळवणाची अनेकांकडून आमंत्रणे येत असल्यामुळे बऱ्याचदा जेवणाचा बेत आखता येत नाही अशा वेळी कॉर्न कटलेटसारखा हलका फुलका नास्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता. 

  कॉर्न कटलेटसाठी लागणारे साहित्य -

  • मक्याचे दाणे
  • बारीक चिरलेला कांदा
  • तांदळाचे पीठ
  • कॉर्न फ्लॉवर
  • उकडलेला बटाटा
  • हिरव्या मिरच्या
  • किसलेले आले
  • जीरा पावडर
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • तेल

  कॉर्न कटलेट बनवण्याची कृती  -

  कॉर्न मिक्समध्ये जाडसर दळा. त्यात तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, उकडलेला बटाटा. काळीमिरी पावडर, आल्याची पेस्ट, जिरा पावडर, मीठ, हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकून चांगले मळून घ्या. छोट्या टिक्कीप्रमाणे आकार द्या आणि शॅलो फ्राय करा. गरमागरम स्टार्टरप्रमाणे टिश्यू पेपर आणि टुथपिकच्यासोबत सर्व्ह करा.

  instagram

  गाजराचा हलवा-

  गाजराचा हलवा हा अनेकांची फेव्हरेट डिश असते.त्यामुळे केळवणासारख्या खास प्रसंगी गाजराचा हलवा करणं नक्कीच योग्य ठरेल.

  गाजराच्या  हलव्यासाठी साहित्य -

  • लाल रंगाची गाजर
  • खवा
  • साखर
  • तूप
  • ड्रायफ्रूट्स
  • वेलची आणि जायफळाची पूड

  गाजरचा हलवा करण्याची कृती -

  गाजर स्वच्छ धुवून सोलून घ्या. किसणीवर ती छान किसून त्यातील पाणी काढून टाका. कढईत तूप टाका आणि त्यावर गाजराचा किस परतून घ्या. किस थोडा नरम झाला की त्यात साखर आणि किसलेला खवा टाका. झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्या. वरून ड्रायफ्रूट टाका आणि गॅस बंद करून वेलची आणि जायफळची  पूड टाका. सर्व साहित्य एकत्र करा आणि गरमागरम सर्व्ह करा.

  instagram

  पुरणपोळी-

  पुरणपोळ्या ही खास महाराष्ट्रीय डिश आहे. त्यामुळे ती सर्वांच्या आवडीची असतेच. तेव्हा तुम्ही वधूवरांच्या केळवणासाठी पुरळपोळीचा बेत आखू शकता.

  पुरळपोळीचे साहित्य -

  • मैदा
  • गव्हाचे पीठ
  • हरभरा डाळ
  • किसलेला गुळ

  पुरळपोळ्या बनवण्याची कृती -

  मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून सैलसर कणीक मळून घ्या तेल लावून पीठ बाजूला ठेवून द्या.हरबरा डाळ शिजवून घ्या.  पाणी काढून त्यात किसलेला गुळ टाका आणि मंद आचेवर मिश्रण शिजवून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात वेलची पूड घालून ते मिक्सर अथवा पुरणयंत्रात वाटून घ्या. कणकेची पारी तयार करून त्यात पुरणाचा गोळा भरा आणि अलगद पारीचे तोंड बंद करा. पोळी लाटून तूपावर खरपूस शेकवा. अशा गरमागरम पोळ्या तूप, दूध यासोबत मस्त लागतात.

  instagram

  बटाटे वडे -

  मुंबई स्पेशल बटाटावडा खायला कोणाला नाही आवडणार. त्यामुळे जर घाईत केलेला केळवणाचा बेत असेल तर असे गरमागरम बटाटे वडे बनवा आणि त्यांना खुश करा. 

  बटाटेवडे बनवण्याचे साहित्य - 

  • बटाटे
  • आले लसणाची पेस्ट
  • हिरव्या मिरचीची पेस्ट
  • मीठ
  • लिंबूरस
  • बेसन

  बटाटेवडे तयार करण्याची कृती -

  सर्वात आधी बटाटेवडे कुकरमध्ये उकडून घ्यावेत. उकडलेले बटाटे सोलून ते व्यवस्थित कुस्करून एकजीव करावेत.या सारणामध्ये आले लसणाची पेस्ट, मिरचीचे वाटण टाकून पुन्हा एकजीव करावे. सारणाला वरून एक चमचा तेल, हिंग, कडीपत्त्याची फोडणी देऊन वरून लिंबूरस पिळून भाजीचे सारण पुन्हा एकत्र करावे. या सारणाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत. बेसनाच्या पिठात चवीपुरते मीठ आणि मोहनाचे तेल टाकून भजीप्रमाणे सरसरीत पीठ भिजवून घ्यावे. कढईत तेल गरम करून मस्त बटाटेवडे तळावेत. लसणाची आणि ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत पावासोबत सर्व्ह करावे. तुमच्याकडे केळवणाला येणारे फिटनेस प्रिय असतील तर आप्पेपात्रात बटाटेवडे तयार करा

  instagram

  गुलाबजाम -

  गुलाबजाम तुम्ही तयार इन्स्टंट पीठापासून तयार करू शकता. मात्र आम्ही तुम्हाला पांरपरिक पद्धतीने ते कसे करायचे हे सांगणार आहोत.

  गुलाबजामसाठी साहित्य -

  • गुलाबजामचा खवा
  • साखरेचा पाक ( एक कप साखर आणि दोन कप पाणी)
  • वेलची पावडर
  • तेल अथवा तूप
  • मैदा
  • दुध
  • बेकिंग सोडा

  गुलाबजाम बनवण्याची कृती -

  खवा मैदा आणि थोडंसं बेकिंग सोडा टाकून दुधाचा हात लावून मळून घ्या. मिश्रण तूप लावून ओला फडक्याने झाकून ठेवा. अर्धा तासाने या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि तूपात किंवा तेलात तळून घ्या. गॅसवर पाक करायला ठेवा आणि साखर विरघळ्यावर एक उकळ येऊ द्या. उकळत्या पाकात तळलेले गुलाबजाम टाका. पाच दहा मिनिटांनी गॅस बंद करा आणि काही तास गुलाबजाम पाकात मुरू द्या. 

  instagram

  बासुंदी पुरी -

  श्रीखंड पुरीप्रमाणे तुम्ही केळवणासाठी बासुंदी पुरीचा बेत आखू शकता. 

  बासुंदीसाठी लागणारे साहित्य -

  • दूध
  • ड्रायफ्रूटचे काप
  • साखर
  • वेलची पूड

  बासुंदी बनवण्याची कृती -

  एका जाड बुडाच्या भांड्यांत दूध उकळत ठेवा. ते अर्धे आटू द्या. त्यात ड्रायफ्रूटचे काम आणि साखर टाका. वेलची पूड टाकून थंड करा. थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. 

  पुरीसाठी साहित्य - 

  • गव्हाचे पीठ
  • मीठ
  • तेल

  पुरी बनवण्याची कृती -

  गव्हाचे पीठ मीठ टाकून मळून घ्या. हवं असेल तर तुम्ही त्यात चवीसाठी जिरे टाकू शकता. तेल गरम करून मोहन दिल्यास पुऱ्या खुशखुशीत होतात. मळलेल्या पीठाता तेल लावून काही मिनिटे ठेवा. थोड्या वेळाने पीठ चांगले मऊ झाले की त्याच्या पुऱ्या लाटा आणि तेलात तळून घ्या. 

  instagram

  उकडीचे मोदक -

  मोदक आणि त्यावर सोडलेली तूपाची धार पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी उकडीचे मोदक हा एक बेस्ट प्लॅन ठरेल.

  मोदकासाठी साहित्य -

  • मोदकासाठी बनवलेले तांदळाचे पीठ
  • ओले खोबरे
  • मीठ
  • गुळ
  • खसखस
  • ड्रायफ्रूट 

  मोदक बनवण्याची कृती -

  तांदळाची उकड काढून घ्या. पाणी गरम करा त्यात मीठ आणि पीठ टाकून ते ढवळून त्याची उकड काढता येईल. उकडीचे पीठ चांगले मळून घ्या. कढईत तूप टाका त्यात खसखस, ओलं खोबरं आणि गुळ टाकून मिश्रण एकजीव करा. वरून ड्रायफ्रूट्स टाका. पीठाची पारी तयार करा आणि त्या खोबऱ्याचं सारण भरा. पारीचे तोंड बंद करून कळ्या पाडत त्याला मोदकाचा आकार द्या. मोदक पंधरा ते वीस मिनिटे उकडपात्रात उकडून घ्या.

  instagram

  पावभाजी -

  पावभाजी हा झटपट होणारा आणि सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. शिवाय तुम्ही जेवणासाठीही याचा बेत आखू शकता.

  पावभाजीसाठी साहित्य -

  • बटाटा
  • फ्लॉवर
  • मटार
  • सिमला मिरची
  • टोमॅटो
  • बीट
  • कांदा
  • लसूण
  • पावभाजी मसाला
  • मीठ
  • लिंबू
  • कोथिंबीर
  • बटर
  • पाव

  पावभाजी करण्याची कृती -

  सर्व भाज्या उकडून त्या स्मॅश करून घ्या. कढईत तेल आणि बटर एकत्र करून त्यात बारीक चिरलेला कांदा, वाटलेला लसूण आणि चिरलेला टोमॅटो टाका आणि परतून घ्या. त्यावर चवीपुरतं लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाका आणि परतून घ्या. स्मॅश केलेल्या भाज्या टाका आणि अंदाजाने मीठ टाका. सर्व मिश्रण एकत्र शिजू द्या. वरून बटर, चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाने सजवा आणि पावासोबत सर्व्ह करा. हवं असल्यास पावाला बटर आणि मसाला लावून तव्यावर गरम  करा.

  instagram

  डोसा चटणी -

  वरवधूसाठी पचायला हलका जेवणाचा बेत करायचा असेल तर मस्त डोसा चटणी बनवा. यासाठी वाचा डोसाचे विविध प्रकार

  डोसा करण्यासाठी साहित्य -

  • तांदूळ
  • उडीद डाळ
  • मेथीचे दाणे
  • मीठ

  डोसा बनवण्याचे प्रकार -

  डाळ, मेथीचे दाणे आणि तांदूळ स्वच्छ धुवून अथवा आठ ते दहा तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर पाणी उपसून डाळ आणि तांदूळ बारीक वाटून घ्या. चवीनुसार मीठ टाकून एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा. डोसाचं पीठ रात्रभर अशा प्रकारे ठेवल्यास चांगलं फुगून वर येतं. आयत्यावेळी तव्यावर गरमागरम डोसे तयार करा. चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यासोबत करू शकता.

  instagram

  मटार करंजी -

  वधूवरांना आल्यावर लगेचच काहीतरी खायला द्यायला मटार करंजी मस्त प्लॅन आहे.

  मटार करंजीसाठी साहित्य -

  • मैदा
  • रवा
  • तेल
  • मीठ
  • मटार
  • बटाटे
  • हिरव्या मिरच्या
  • हिंग
  • जिरे
  • हळद
  • कढीपत्ता
  • लसूण
  • मिरपूड
  • तेल

  मटार करंजीची कृती -

  मैदा आणि रवा एकत्र करून त्यात मीठ आणि तेलाचे मोहन टाकून पीठ तयार करा. बटाटे सोलून स्मॅश करून घ्या, मटार वाफवून स्मॅश करू घ्या. त्यात जिरे, हिंद, हळद आणि कढीपत्याची फोडणी टाका.. सर्व मिश्रण एकत्र करा  आणि त्याचे छोटे छोटे गोळे करा. पीठाच्या पुऱ्या लाटून करंजीप्रमाणे त्यात मटारचे सारण भरा. करंजीचा आकार द्या आणि तेलात तळून घ्या. 

  instagram

  मॅंगो मस्तानी -

  लग्न बऱ्याचदा उन्हाळ्यात असतात अशा वेळी वधूवर घरी येताच त्यांचे स्वागत तुम्ही मॅंगो मस्तानी देऊन करू शकता.

  मॅंगो मस्तानी साठी साहित्य -

  • आंब्याची प्युरी
  • थंड दूध
  • वॅनिला आयस्क्रिम
  • ड्रायफ्रूट
  • टुटीफ्रुटी
  • मॅंगो मिल्कशेक

  मॅंगो मस्तानी बनवण्याची कृती-

  एका ब्लेंडरमध्ये मॅंगोचा पल्प टाकून दुधासोबत मिल्कशेक बनवा. थंड दूध आणि वॅनिला आयस्क्रिम मिक्स करून घ्या. एका ग्लासात दोन चमचे मॅगो क्युब्स टाका. वरून वॅनिला आयस्क्रिम टाका, पुन्हा वरून मॅंगो पल्प, ड्रायफ्रूट आणि टुटीफ्रुटीने सजवाथोडं मॅंगो मिल्कशेक टाका. सर्वात वरती आयस्क्रिम, ड्रायफ्रूटने सजवा. 

  instagram

  वालाचं बिरडं -

  पारंपरिक थाळीचा बेत आखला असेल तर त्यात वालाचं बिरडं असायलाच हवं. 

  वालाच्या बिरड्यासाठी साहित्य -

  • मोड आलेले कडवे वाल
  • चिरलेला कांदा
  • लसूण, आल्याची पेस्ट
  • ओलं खोबरं
  • लाल तिखट
  • हळद
  • गुळ
  • चिंचेचा कोळ
  • मीठ
  • तेल

  वालाचं बिरडं करण्याची कृती -

  वाल भिजत घालून सोलून घ्या. कढईत तेल गरम करा. मोहरी, आलं लसणाची पेस्ट आणि कांदा परतून घ्या. त्यात सोललेले वाल टाका. पाणी टाकून शिजू द्या. वाल शिजले की मीठ, हळद, लाल तिखट, ओलं खोबरं टाका. शिजवल्यावर गॅस बंद करण्यापूर्वी गुळ, चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर टाका. 

  instagram

  ड्राय पनीर टिक्का -

  जर नववधूंना पंजाबी खाद्यपदार्थ आवडत असतील तर हा बेत आखा. स्टार्ट्स साठी परफेक्ट आहे.

  ड्राय पनीर टिक्का करण्यासाठी साहित्य -

  • पनीर क्युब्स
  • सिमला मिरचीचे तुकडे
  • कांद्याचे तुकडे
  • आलं लसणाची पेस्ट
  • घट्ट दही
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • कसूरी मेथी
  • धणे पावडर
  • चाट मसाला
  • तेल
  • मीठ
  • लिंबाचा रस

  ड्राय पनीर टिक्का कृती -

  दह्यात पनीर, सिमला मिरची, कांदा आणि सर्व साहित्य टाका आणि मॅरीनेट करा. त्यात सिमला मिरची, पनीर आणि तयार मॅरिनेशमधील सर्व साहित्य स्टिकवर लावून तंदूर, ग्रील अथवा तव्यावर शेकवा. गरमा गरम खायला द्या. 

  instagram

  कोंबडीवडे -

  जर वधूवरांना नॉनव्हेजची आवड असेल तर या त्यांच्यासाठी कोंबडीवड्यांचा  बेत आखा.

  कोंबडीवड्यांचे साहित्य -

  तांदूळ

  उडीद डाळ

  चणा डाळ

  गहू

  मेथी दाणे

  धणे

  काळीमिरी

  बडिशेप

  कोबंडी वडे करण्यासाठी कृती -

  सर्व साहित्य घरघंटीवर सरसरीत दळून घ्या. हे पीठ सहा महिने टिकू शकतं. एका भांड्या पीठ, हळद, हिंग आणि मीठ एकत्र करा आणि कोमट पाण्याने पीठ मळा. पीठ ओला फडका टाकून अर्धा तास झाकून ठेवा.पोळपाटावर एक बटर पेपर घ्या आणि त्याला तेल लावा. त्यावर एक छोटा गोळा घेऊन ते पीठ बोटांनी थापत वड्याचा आकार द्या. तेल गरम करून वडे तळा. 

  चिकनसाठी साहित्य -

  ओलं खोबरं

  सुकं खोबरं

  चिरलेले कांदे

  आलं लसणाची पेस्ट

  मालवणी मसाला

  हळद

  तमालपत्र

  चिकन मसाला

  लिंबू

  चवीपुरतं मीठ

  चिकन करण्याची कृती -

  चिकन स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करावे. त्यानंतर त्याला स्पेशल मालवणी मसाला, मीठ, हळद, आले-लसणाची पेस्ट, लिंबाचा रस लावून एक तास मॅरेनेट करण्यासाठी ठेवावे. कढईत थोडं तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्याच कढईत ओलं आणि सुकं खोबरंही परतून घ्यावं. हे मिश्रण वाटून मिक्समध्ये वाटलेला मसाला तयार करावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यावर तमाल पत्र आणि चिरलेला कांदा टाकावा. त्यात मॅरीनेट केलेलं चिकन टाकून चांगलं परतून घ्यावं. चिकन मध्ये थोडं पाणी टाकून झाकण ठेवून वाफेवर शिजवावं. त्यानंतर त्यात वाटलेला मसाला, स्पेशल मालवणी मसाला, स्पेशल चिकन मसाला, मीठ आणि पाणी  टाकून शिजवावं. गरमगरम चिकन मसाला भाजणीच्या वड्यांसोबत मस्त लागतात. या रेसिपीसाठी जाणून घ्या स्पेशल मालवणी मसाला कसा करायचा.

  instagram

  सुरमई फ्राय -

  जर तुमच्याकडे येणारे पाहुणे फिशलव्हर असतील तर त्यांच्यासाठी सुरमई फ्राय बनवा. 

  सुरमई फ्रायसाठी साहित्य -

  • सुरमईचे तुकडे
  • लाल तिखट
  • मीठ
  • रवा
  • हळद
  • कोकमाचे आगळ

  सुरमई फ्राय कृती -

  सुरमईचे तुकडे  स्वच्छ धुवून त्याला मीठ, कोकमाचे आगळ, मीठ लावून ठेवा.

  थोड्या वेळाने रव्यात मीठ आणि लाल तिखट मिसळून त्यात ते घोळवा आणि खरपूस तळून घ्या.

  instagram

  चिकन बिर्याणी -

  चिकन बिर्याणी हा अनेकांची स्पेशलिटी असते. त्यामुळे तुम्हालाही जर बिर्याणी करायला आवडत असेल तर केळवणाला बिर्याणीचा बेत आखा.

  चिकन बिर्याणीसाठी साहित्य -

  • चिकनचे तुकडे
  • बासमती तांदूळ
  • कांदा
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • आले
  • मीठ
  • चिकन मसाला
  • बिर्याणी  मसाला
  • गरम मसाला
  • टोमॅटो
  • हळद
  • तमालपत्र
  • वेलची
  • लवंग
  • केसर

  बिर्याणी करण्याची कृती -

  तांदूळ धुवून पाण्यात भिजत ठेवा. कढईत तेल गरम करून लसूण, कांदा, हिरवी मिरची आलं गरम करा आणि वाटून घ्या. हे वाटण चिकनला लावून ठेवा. त्यात चिकन मसाला, मीठ आणि गरम मसाला टाकून चिकन तेलात फ्राय करा. त्यात टोमॅटोची प्युरी टाका. एका पातेल्यामध्ये तांदूळ, तिप्पट पाणी, हळद, तमालपत्र, लवंग आणि वेलची टाकून भात शिजू द्या. शिजलेला भात चिकनमध्ये टाका. सर्व मिश्रण पाच मिनिटं शिजू द्या. वरून तळलेला कांदा आणि केशराचे पाणी टाकून झाकण लावून दम द्या. 

  instagram

  केळवणाबाबत मनात असलेले प्रश्न - FAQ's

  1. केळवणाचे ताट कसे सजवावे ?

  केळवणासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार अथवा वधूवरांच्या आवडीनुसार कसेही पदार्थ बनवा. मात्र पान अथवा ताट सुंदर पद्धतीने सजवा. आजकाल भाजारात सजावटीसाठी विविध साहित्य मिळतं ते वापरा अथवा फुलांनी सजावट करा. ताटाशेजारी दिवा आणि उदबत्ती लावा. औक्षण करून पाहुण्यांना भोजनाची विनंती करा.

  2. केळवणासाठी काय काय तयारी करावी ?

  केळवण कधी करायचे आहे त्याआधीच वधूवराच्या आवडीनिवडी अथवा तुम्ही जे पदार्थ बनवणार आहात त्याची तयारी करावी. ज्यामुळे तुमची घाई होणार नाही. वधूवरांना द्यायचं गिफ्ट, ते आल्यावर काय काय करणार याची आधी यादी बनवा.

  3. केळवणासाठी खाद्यपदार्थ कसे निवडावे ?

  केळवणासाठी खाद्यपदार्थ निवडताना वधूवरांच्या आवडीनिवडी, त्यावेळेस असलेले वातावरण, लग्नाची तारिख या सर्व गोष्टींचा विचार करावा. ज्यामुळे ते पदार्थ खाण्यामुळे वधूवरांना कोणताही त्रास होणार नाही.