Marathi Bhasha Din: मराठी भाषिकांना वाटतेय का मराठीची लाज...मराठी भाषा दिन की दीन

Marathi Bhasha Din 2021

मराठी माणसांना आजकाल एका वाक्यात किमान दोन ते तीन इंग्रजी शब्द अथवा हिंदी शब्द वापरायची सवय झाली असं दिसून येतंय. विशेषतः शाळेतल्या मुलांचं मराठी तर अगदीच ….खरं तर त्यावर न बोललेलं बरं असं म्हणायची वेळ आली आहे. एका बाजूला मराठीचा डंका बडवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र आपल्याला आपल्या मुलांना इंटरनॅशनल शाळांमध्ये प्रवेश देण्याची वेळ येत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मराठी शाळांची वानवा आणि पालकांना सतावणारा प्रश्न म्हणजे माझं मूल इतर मुलांच्या तुलनेत मागे तर राहणार नाही ना? घरात मराठी बोलत असतो पण तरीही इंग्रजी नीट यायला हवं म्हणून सगळीकडून येणारा ताण. त्यामुळे मुलांशी इंग्रजीमध्ये संभाषण करण्यात येतं. लवकरच मराठी भाषा दिन येईल. त्या दिवशी सगळीकडे मराठी भाषा दिन स्टेटस (Marathi Bhasha Din Status), मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश, मराठी भाषेचा गोडवा एक दिवस गायला जाईल. पण मग या मराठी भाषेचा अभिमान बाळगायचा आहे तर मग कुठेही जाताना सर्वात मराठी का बरं तोंडातून बाहेर पडत नाही. कोणत्याही दुकानात अथवा कुठेही गेल्यानंतर हिंदी अथवा इंग्रजी भाषा का बरं बोलली जाते याचा विचार कधी करताय का तुम्ही?

मराठी भाषा बोलायची नका बाळगू लाज

Canva

जेव्हा इतर भाषिक आपल्या भाषेमध्ये बोलतात तेव्हा त्यांना लाज वाटत नाही मग मराठी भाषिक माणसांना का लाज वाटावी. बऱ्याचदा दोन मराठी  माणसं हिंदी अथवा इंग्रजीमध्ये बोलताना आपण ऐकतो. पण असं का? कोणत्याही  दुकानात गेल्यानंतर आपसूकच हिंदी भाषा बोलायला लागतो. पण आधी मराठी बोलून तर पाहा. समोरच्या व्यक्तीला अगदीच कळत नसेल तर ठीक आहे. आपण  मराठी आहोत हा अभिमान स्वतः बाळगला तरच समोरचा माणूसही तितकाच आदर करेल असं नाही का वाटत तुम्हाला? अगदी मोठमोठ्या व्यक्तीही चांगलं मराठी बोलतात. मग जर आपल्याला वाटत असेल की आपलं मराठी खराब आहे म्हणून बोलत नाही तर असं अजिबात करू नका. जर तोडकं मोडकं इंग्रजी बोलायला लाज वाटत नाही तर मग आपलीच भाषा आहे ना अहो ती...तिला आंजारा गोंजारा आणि आपलंसं करा. कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही आत्मविश्वासाने आणि अभिमानाने जेव्हा मराठीत बोलता तेव्हा तुम्हाला नक्कीच समोरच्या व्यक्तीकडूनही तसाच आदर मिळतो. मराठी भाषा दिन माहिती सगळ्यांनाच असते. पण बोलणे सुरू करायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि विचार नेहमीच आपण  अभिमानाने घेत असतो. मग तसं वागत का नाही बरं...

भाषा दिन साजरा करताना दीन होणार नाही याकडे लक्ष द्या

केवळ एक दिवस मराठी भाषा दिन साजरा करणं म्हणजे  मराठीचा डंका मिरवणं नक्कीच नाही. भाषा दीन होणार नाही याकडे मराठी भाषिक माणूस म्हणून आपणच लक्ष देऊ शकतो. एखाद्या भाषेचा विकास व्हावा म्हणून ती भाषा जास्तीत जास्त कशी वापरता येईल, आपल्या रोजच्या जगण्यात त्याचा किती आणि कसा उपयोग करून घेऊ शकतो हे जेव्हा आपण जपायला लागू तेव्हाच ती भाषा अधिक समृद्ध होईल. आपणच जर ती भाषा आपल्याला साजेशी नाही असं म्हटलं तर मग मात्र आपणच आपली मराठी भाषा समृद्ध न करता दीन करत आहोत. हे मुळात लक्षात घेत पुढची पिढी घडवायला हवी.  इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं तरीही मराठीची पाळंंमुळं मात्र जपून ठेवायला हवीत.  कोणत्याही स्पर्धेत पुढे जाताना आपण आपली परंपरा विसरत नाही आणि मराठी भाषेच्या बाबतीतही हेच महत्त्वाचं आहे. तेच जपण्यासाठी आता प्रत्येकाने पाऊल उचलायला हवं.  गेल्या काही वर्षांपासून केवळ मराठी भाषा दिन साजरा करणं हाच उद्देश नाही तर ती जितकी जपता येईल, वापरता येईल तितकाचा त्याचा जास्त उदोउदो होईल हे सगळ्यांनाच कळायला हवं.  आता अनेक ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील मराठीमधून प्रश्न विचारण्यात येत आहेत हे दिसून येत आहे. आपले क्रिकेटर्सही बिनधास्त आपल्या भाषेत उत्तरं देत आहेत आणि हेच तर आपल्याला हवं आहे. आपली भाषा आपणच जपू शकतो. हा मराठी भाषा दिन उत्तम दिन म्हणून साजरा होईल आणि दीन होणार नाही याकडे आपण सर्वांनीच लक्ष पुरवू हीच अपेक्षा!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक