लठ्ठपणा हा अनेक अजारांचे केंद्रस्थान असून त्यामुळे कर्करोग आणि लठ्ठपणा यांचा घनिष्ठ संबंध आहे. जगभरात होणा-या एकूण मृत्यूंपैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. परदेशात झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी महिलांमध्ये २०% तर पुरूषांमध्ये १४% मृत्यूचं कारण लठ्ठपणा असल्याचे समोर आले आहे. यावरून लठ्ठपणा हे कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमुख आहे. त्यामुळे कॅन्सर टाळण्यासाठी लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे, असे मुंबईतील सैफी आणि अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी ‘POPxo’ मराठीला सांगितले आहे. देशात लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढता आहे. पिझ्झा, बर्गर, पास्ता आणि अन्य फास्टफूड पदार्थांमुळे अनेकदा लठ्ठपणाच्या समस्या उद्भवतात. लठ्ठपणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, पीसीओडी, सांधेदुखी, यकृत आणि मूत्रपिंडाचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. परंतु, आता लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोकाही वाढतोय.
बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले की, लठ्ठपणामुळे एक-दोन नाही तर १३ प्रकारचे कर्करोग होऊ शकतात, असे अमेरिकेतील कॅन्सर रिसर्चमधील वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. यात रजोनिवृत्तीनंतर स्तन व गर्भाशयाचा कर्करोग, कोलोरेक्टल, मूत्रपिंड, एंडोमेट्रियल, थायरॉईड, स्वादुपिंड, यकृत, मेनिन्जिओमा, अंडाशय, पित्त मूत्राशय आणि मायलोमा या कर्करोगाचा समावेश आहे. या सर्वेक्षणानुसार, वजन वाढल्यास शरीरात फॅट सेल्स वाढत जातात. त्यामुळे श्वास घेण्याची क्षमता कमी होते. मेटाबॉलिज्म स्तर बदलू लागतो तसेच इन्सुलिन वेगाने वाढू लागतो आणि हार्मोन्सचं नियंत्रण बिघडतं. या सर्व कारणांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
लठ्ठपणा आणि स्तनाचा कर्करोगः-
भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यात महिला लठ्ठ असल्यास कर्करोगावर उपचार करणंही खूप अवघड होऊन जातं. अशा महिलांना कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा धोकाही अधिक असतो. लठ्ठपणामुळे अनेक महिला नियमित स्तनाचा तपासणी आणि मेमोग्रॉफी करून घेण्यास संकोच करतात. त्यामुळे वेळीच निदान व उपचार न झाल्यास गुंतागुंत अधिक वाढते. अशा स्थितीत लठ्ठ महिलांमध्ये किमोथेरपीचा पाहिजे तसा चांगला प्रतिसाद मिळत नाही.
लठ्ठपणा आणि कोलोरेक्टल कर्करोगः-
लठ्ठ व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका असतो. कोलोरेक्टल कॅन्सर हा पोट आणि आतड्यांचा कर्करोग म्हणूनही ओळखला जातो. स्त्रियांच्या तुलनेत पुरूषांमध्ये हा कर्करोग सामान्य आहे.
लठ्ठपणा आणि यकृत कर्करोगः-
यकृत कर्करोग हा पुरुषांमध्ये पाचव्या तर महिलांमध्ये नवव्या क्रमांकाचा सामान्य प्रकार आहे. यकृतात दोन प्रकारचे कर्करोग होतात. पहिला प्रकार यकृतातील पेशीमध्ये बदल होऊन होणारा कर्करोग तर दुसरा प्रकार म्हणजे शरीरातील इतर भागात झालेल्या कर्करोगाच्या काही पेशी यकृतात येतात. तिथे त्यांची वाढ होऊन गाठी तयार होतात. यामुळेही कर्करोग होऊ शकतो. याशिवाय हिपेटायटीस बी आणि सी विषाणूंचा प्रादुर्भाव आणि लठ्ठपणा इत्यादींमुळेही यकृताचा कर्करोग होऊ शकतो. लठ्ठपणामुळे ‘फॅटी लिव्हर’ चा आजार वाढत आहे. या आजारामुळे ‘लिव्हर सिरोसिस’ होऊन यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
या सगळ्या माहितीचा आधार घेऊन आता तरी किमान महिलांनी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्यासाठी योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसंच खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन फिटनेसकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक