मधुमेहींसाठी वरदान आहे नाचणी, असा करा आहारात वापर

मधुमेहींसाठी वरदान आहे नाचणी, असा करा आहारात वापर

भारतीय खाद्यसंस्कृतीत नाचणीचे महत्त्व आहे. कारण नाचणी हे एक परिपूर्ण धान्य तर आहेच शिवाय ते सर्व सामान्यांना परवडणारंदेरखील आहे. फार पूर्वीपासून अन्नपदार्थांमध्ये नाचणीचा वापर केला जातो. नाचणीने तुमचे शरार डिटॉक्स होण्यास मदत होते, मधुमेहींच्या रक्तातील साखर यामुळे नियंत्रणात राहते, ह्रदयविकारांपासून रक्षण होते, शरीराला चांगली ऊर्जा मिळते अनेक फायदे नाचणी खाण्यामुळे मिळत असतात. नाचणीमध्ये अनेक पोषक घटक असल्यामुळे त्याला आपण सूपरफूड असंही म्हणू शकतो. नाचणीमुळे  व्हिटॅमिन डी, प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहाडट्रेट, फायबर्स, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, सोडिअम आणि झिंक अशा पोषक घटकांचा मुबलक पूरवठा शरीराला होतो. विशेष म्हणजे हे सर्व घटक एकमेकांना पूरक आणि पोषक असतात. त्यामुळे त्याचा तुमच्या शरीरावर नक्कीच चांगला फायदा होतो. मधुमेहींसाठी तर नाचणी खाणं खूप फायद्याचं ठरू शकतं.

मधुमेहीसाठी नाचणी कशी आहे फायदेशीर

जेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढते तेव्हा त्या आरोग्य स्थितीला मधुमेह असं म्हणतात. सध्या मधुमेह हा एक जीवनशैली विकार असला तरी तो दुर्लक्ष करण्यासारखा नाही. कारण रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. मधुमेह अनियंत्रित झाल्यास अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जगभरातील अनेक लोक आज मधुमेहाने ग्रस्त आहेत. आजकाल फक्त वयस्कर लोकच नाही तर लहान मुलंही मधुमेही झालेली आहेत. त्यामुळे खाण्यापिण्याबाबत एक छोटीशी चुकही अशा लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. मधुमेह, हायपरटेंशन, लठ्ठपणा अशा अनेक समस्यांसाठी नाचणी वरदान ठरू शकते. म्हणूनच मधुमेहींनी आहारात नाचणीचा वापर अवश्य करायला हवा. टाईप 2 मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी नाचणीचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. त्यात असलेल्या मॅग्नेशिअममुळे तुमच्या रक्तातील इन्सुलीनची कार्यक्षमता वाढण्यात मदत होते. त्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लूकोज ग्रहण करण्याची क्षमता अधिक प्रभावी होते. त्यामुळे याचा परिणाम मधुमेहींवर चांगला होतो आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

नाचणीचा असा करा आहारात वापर

नाचणी तुम्ही निरनिराळ्या प्रकारे आहारातून घेऊ शकता. मात्र मधुमेहींनी यासाठी दररोज नाचणीची भाकरी अथवा डोसा खावा. ज्यामुळे त्यांना नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. 

नाचणीची भाकरी -

नाचणीच्या भाकरीतून तिच्यातील पोषक घटक तुमच्या शरीराला सहजपणे मिळताच. नाचणी खाण्यामुळे शरीराची  झीज लवकर भरून काढली जाते. यासाठीच अशक्तपणा अथवा आजारी व्यक्तीला नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. नाचणी थंड स्वरूपाची असल्यामुळे उन्हाळ्यात आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश जरूर केला जातो. 

साहित्य -

  • नाचणीचे जाडसर पीठ
  • मीठ
  • गरम पाणी

कृती

नाचणीच्या पीठात चवीपुरतं मीठ टाका आणि गरम पाण्यात ते मळून घ्या. तांदळाच्या पिठाप्रमाणे तुम्ही याची उकडही काढू शकता. मळलेल्या पीठाची भाकरी थापा अथवा पोळीप्रमाणे लाटा आणि गरम तव्यावर मस्त शेकून घ्या. 

नाचणीचा डोसा -

नाचणी शरीरासाठी अतिशय उत्तम असल्यामुळे तिचा आहारात समावेश करण्यासाठी  तुम्ही त्याचा डोसा नियमित खाऊ शकता.

साहित्य -

  • एक वाटी नाचणीचे पीठ
  • एक वाटी तांदळाचे पीठ
  • मीठ
  • हिरवी मिरची पेस्ट
  • ताक
  • हळद

कृती

एका भांड्यात सर्व पीठ आणि इतर साहित्य एकत्र करा आणि बॅटर तयार करून काही मिनिटे बाजूला ठेवा. तवा गरम करा आणि त्यावर डोसा घाला झाकण ठेवून शिजू द्या. गरमागरम आणि कुरकुरीत डोसा चटणीसोबत खा.