कोरोनाच्या सावटाखाली अशी साजरी करा होळी

कोरोनाच्या सावटाखाली अशी साजरी करा होळी

होळी आणि रंगपंचमीचा तुमचा उत्साह कोरोनामुळे कमी झाला आहे का? आता तुम्ही म्हणाल की, कोरोना असताना काय साजरी करणार होळी किंवा रंगपचमी. पण उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी दरवेळी बाहेर पडलंच असं नाही. तुम्ही घरच्याघरीही होळी-रंगपंचमीचा आनंद घेऊ शकता. कारण सध्याचं युग आहे व्हर्च्युअल सेलिब्रेशन्सचं. मग ते ऑनलाईन फंक्शन असो देवदर्शन असो किंवा होळी सेलिब्रेशन असो नाही का?

Unsplash

होळी म्हणजे वसंत ऋृतूच्या आगमनाची चाहूल आणि निरोप घेणारी थंडी यांचा काळ असतो. खरंतर होळीच्या निमित्ताने एकत्र येणं आणि रंगाची उधळण करून जुनं आणि वाईट विसरून नव्याने सुरूवात करणं होय. आपल्या जवळच्यांना सणाच्या निमित्ताने होळीच्या शुभेच्छा देणं हे आलंच तुम्ही हा सण यंदाही छान साजरा करू शकता. फक्त थेट भेट न घेता व्हर्च्युअली सेलिब्रेट करून आणि काही हटके पद्धतीने. ज्याने तुम्हाला या तणावाच्या काळातही आनंदाचे कवडसे नक्कीच सापडतील.

व्हर्च्युअल होळी आणि रंगपंचमी

हायफाय टेक्नोलॉजीच्या जमान्यात होळीचा सण तरी कसा मागे राहील. आता तुम्ही म्हणाल, ऑनलाईन होळी लावायची का? तर नक्कीच नाही. होळीचं दहन करणं म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय होय. त्यामुळेच आपण दरवर्षी होळीचं आयोजन आवर्जून करतो. पण यंदा होळीदहनासाठी लाकूड किंवा गवत जाळून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यापेक्षा आपल्या घरी ईको-फ्रेंडली दिवे लावून प्रतिकात्मक होळी साजरी करा. अशाप्रकारे तुम्ही कोरोना काळात सुरक्षित राहून पर्यावरला पूरक अशी होळी साजरी करू शकता. कोरोनावर विजय मिळविल्यावर पारंपारिक पद्धतीने आपल्या सगळ्यांसोबत होळी नक्कीच साजरा करता येईल.

Canva

पर्यावरणप्रेमी रंगपंचमी

सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हर्च्युअल होळीच्या निमित्ताने तुम्ही पर्यावरणाबाबतही सजगता दाखवू शकता. यामुळे केमिकलयुक्त रंगाचा वापरही टळेल आणि पाण्याचीही आपोआपच बचत होईल. कारण दरवर्षी होळीचा सण आल्यावर मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त रंग आणि बेसुमार पाणी वापरलं जातं. हे टाळण्याची उत्तम संधी यंदा चालून आली आहे. यंदा रंगपंचमीच्या शुभेच्छा ऑनलाईन द्या पण अगदीच घरातल्या बच्चे कंपनीने आग्रह केला तर नैसर्गिक रंग आणि कमीतकमी पाणी वापरून तुम्ही नक्कीच रंगपंचमी खेळू शकता किंवा मस्तपैकी फेसटाईमवर रंगपंचमी खेळा. होळीच्या निमित्ताने ऑनलाईन कंटेस्ट्समध्ये भाग घ्या. यंदा होळीच्या निमित्ताने बरेच ऑनलाईन इव्हेंट्स नक्कीच आयोजित करण्यात आले असतील. त्यात भाग घ्या. यामुळे तुम्ही होळीचा आनंदही लुटू शकता आणि कोरोनालाही दूर ठेवू शकता.

सोशल मीडियापासून राहा लांब

सोशल मीडियावर आपण केलेली प्रत्येक गोष्ट पोस्ट करायलाच हवी असे नाही. तसंच यंदा इतरांनी एकत्र येऊन साजरा केलेल्या होळीच्या फोटोजनाही लाईक करू नका. आम्ही तर सांगू सोशल मीडियाचा एक दिवसाचा उपवासच करा आणि खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबियांच्या सान्निध्यात राहा.

होळी आणि गोडधोड

Canva

होळी म्हटलं की, गोडधोड पदार्थ आलेच. दरवर्षी होळीला मित्राकडे किंवा ऑफिसमध्ये तुम्ही मिठाई आणि मस्त जेवण जेवत असाल. यंदा घरच्याघरी खमंग पुरणपोळी आणि कटाची आमटी असा बेत करा. अगदीच काही करण्याचा कंटाळा आला तर ऑनलाईन उपलब्ध असलेल्या व्हरायटीतून मस्त ऑर्डर करा

मग कशा वाटत आहेत, यंदाची होळी हटके पद्धतीने साजरी करण्यासाठीच्या या ट्रीक्स आणि टीप्स. तुम्हीही आपल्या कुटुंबासमवेत अशी होळी आणि रंगपंचमी यंदा नक्की साजरी करा. आपल्या आणि इतरांच्या कुटुंबाचं कोरोनापासून रक्षण करा आणि सुदृढ राहून सणांचा आनंद लुटा.