स्वयंपाकानंतर किचन स्वच्छ करायला नाही लागणार वेळ, फॉलो करा या टिप्स

स्वयंपाकानंतर किचन स्वच्छ करायला नाही लागणार वेळ, फॉलो करा या टिप्स

स्वयंपाक करणं एक वेळ सोपं असू शकतं मात्र स्वयंपाकानंतर किचन आवरणं नक्कीच एक मोठा टास्क असतो. अनेक घरांमध्ये स्वयंपाकघर खूप मोठं असतं. शिवाय घरातील प्रत्येकाच्या आवडीचे निरनिराळे पदार्थ बनवावे लागतात. त्यामुळे स्वयंपाकापेक्षा त्यानंतर किचन स्वच्छ करण्यातच अनेकींचा खूप वेळ जातो. जर तुमच्याकडे अशा कामांसाठी पूर्णवेळ मदतनीस असेल तर हा भार थोडा कमी होतो. मात्र जर काही ठराविक काळासाठीच मदतनीस घरी येत असेल तर स्वयंपाकानंतर लगेच किचन आवरण्याचा नक्कीच कंटाळा येऊ शकतो. यासाठीच स्वयंपाक करतानाच या टिप्स फॉलो करा ज्यामुळे स्वयंपाक झाल्यावर तुम्हाला किचनमध्ये जास्त वेळ द्यावा लागणार नाही. 

स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वीच किचन स्वच्छ करा -

स्वयंपाक झाल्यावर तुम्हाला किचन स्वच्छ करण्याचा कंटाळा येत असेल तर आधीच किचन स्वच्छ करा. थोडक्यात जर स्वयंपाकाला सुरूवात करण्याआधीपासूनच किचन सिंक भांड्यांनी भरलेलं असेल तर स्वयंपाकानंतर पडलेली भांडी पाहून तुम्हाला नक्कीच चक्कर येईल. यासाठी सर्व आवरून मगच स्वयंपाकाला सुरूवात करा. त्याचप्रमाणे स्वयंपाक करता करता लागणारी भांडी लगेचच स्वच्छ करून घ्या ज्यामुळे किचनमध्ये भांड्यांचा पसारा होणार नाही. शिवाय स्वच्छ किचनमध्ये केलेला स्वयंपाक आरोग्यासाठीही चांगला राहील.

गार्बेज बॅग जवळ ठेवा -

स्वयंपाक करताना तुम्हाला अनेक गोष्टी सोलाव्या, चिराव्या, कापव्या लागतात. अशा वेळी भाजी, फळं यांच्या साली आणि देठ, लसणाच्या पाकळ्या अशा गोष्टी तुमच्या किचनच्या कांऊटरटॉपवर पसरल्या जातात. जर तुम्ही काम करताना जवळच पॉलेथीन अथवा गार्बेज बॅग जवळ ठेवली तर तुम्हाला या गोष्टी पटकन त्यामध्ये टाकता येतील. ज्यामुळे स्वयंपाकघर फार अस्वच्छ होणार नाही.

जागच्या जागी आणि जिथल्या तिथे हा नियम पाळा -

किचन अथवा घर स्वच्छ ठेवण्याची ही एक छोटी पण खूप परिणामकारक टीप आहे. स्वयंपाक करताना आपण अनेक कप्प्यामधील अनेक गोष्टी बाहेर काढत असतो. बऱ्याच लोकांना सर्व सामान काऊंटर टॉपवर जमा करून ठेवायची सवय असते. ज्यामुळे स्वयंपाकक झाल्यावर या गोष्टी आवरण्यात त्यांचा खूप वेळ जातो. त्यापेक्षा लागणारी गोष्ट जसं की मीठाची बरणी वापरली की पुन्हा तिच्या जागी लगेच ठेवून द्या. ज्यामुळे तुम्हाला तुम्हीच करून ठेवलेल्या या गोष्टींचा पसारा आवरत बसावा लागणार नाही. 

किचनमध्ये असू दे साबणाचा स्प्रे आणि वाईप्स -

एखादी रेसिपी बनवताना त्यात तिखट, मीठ आणि तेल अशा अनेक गोष्टी आपण वापरत असतो. सहाजिकच लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या चमचमीत ग्रेव्हीज अथवा पदार्थांचे डाग तुमच्या किचन काऊंटर टॉप अथवा गॅस हॉबवर पडत असतात. जर ते लगेच स्वच्छ केले नाहीत तर ते सुकतात आणि स्वच्छ करणं कठीण होतं. यासाठीच एका स्प्रेमध्ये साबणाचं पाणी भरून ठेवा. डाग पडले की लगेच त्यावर ते पाणी स्प्रे करा आणि वाईप्सने पुसून टाका. ज्यामुळे तुमचं किचन खराब होणार नाही. 

आम्ही शेअर केलेल्या या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes

INR 69 AT MyGlamm