आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक महिला दिन हा महिलांना सशक्तिकरणासाठी (women empowerment), महिलांना सन्मान देण्यासाठी, पुरूष आणि महिलांमधील भेदभाव कमी करण्यासाठी आणि महिलांना त्यांचे सर्व हक्क देण्यासाठी साजरा केला जातो. खरंतर आज महिलांनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतलेली आहे. त्यामुळे आता हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मात्र असं असूनही आजही अनेकांना जागतिक महिला दिन का साजरा केला जातो आणि त्यामागचा इतिहास काय हे माहीत नाही. यासाठीच जाणून घ्या जागतिक महिला दिन माहिती (mahila din mahiti 2021) आणि या वर्षी कसा करावा साजरा जागतिक महिला दिन, त्याचप्रमाणे या वर्षी काय आहे जागतिक महिला दिनाची थीम आणि हॅशटॅग्ज
पूर्वीच्या काळी शिक्षणाप्रमाणेच मतदानाचाही अधिकार महिलांना नाकारण्यात आलेला होता. 1908 साली हा अधिकार मिळावा यासाठी न्युऑर्क शहरात पहिल्यांदा महिलांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. त्यात महिलांना मतदानाचा अधिकार मिळावी, नोकरीची वेळ कमी करावी आणि नोकरीच्या ठिकाणी सुरक्षितता या तीन प्रमुख अटींची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे स्त्रीयांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली होती. या आंदोलनानंतर 28 फेब्रुवारी हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. मात्र नंतर आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडण्यात आलेल्या सूचनेनुसार पुढे 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निवडण्यात आला. तेव्हापासून आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.
आजही महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाची सुरूवात या कामगार आंदोलनातून झालेली असली तरी आता मात्र या दिवसाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे ही एक आनंदाची बाब आहे. काही ठिकाणी या निमित्ताने महिलांना सुट्टी दिली जाते. तर काही ठिकाणी महिलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र असं असलं तरी जीवनात स्त्रीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यामुळे वर्षातून फक्त एक दिवस असा उत्सव साजरा करून तिची महती नक्कीच गायली जाणं शक्य नाही. यासाठी वर्षाचा प्रत्येक दिवस हा स्त्रीच्या सन्मानाचा, स्त्रीच्या कलागुणांना वाव देणारा, तिची प्रतिष्ठा अधिकाधिक वाढवणारा असायला हवा.
महिला दिन कसा साजरा केला जावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. मात्र जर या पद्धतीने महिला दिन साजरा केला तर खरंच तुमच्या आयुष्यातील महिलांना तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी करू शकाल.
तुमच्या ओळखीच्या अथवा कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिला सहकाऱ्यांसाठी तुम्ही एखादी स्पर्धा आयोजित करू शकता. ज्यामध्ये स्वयंपाक,अभिनय, गायन, कलाकुसर, फोटोग्राफी, लेखन अशा अनेक कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा तुम्ही ठेवू शकता. अशा कार्यक्रमातून महिलांना आयुष्यात काही तरी चांगलं करण्याची उर्मी मिळू शकते. शिवाय त्यांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून काही काळासाठी छान ब्रेक मिळू शकतो.
तुमच्या आयुष्यातील सर्व महिलांसाठी तुम्ही एखादा छोटेखानी कार्यक्रम अथवा पार्टी आयोजित करू शकता. ज्यामधून तुम्ही त्यांच्या आवडीचे खेळ, गाणी, डान्स, आवडीचे पदार्थ अशा गोष्टी त्यांच्यासाठी करू शकता. ज्या ज्या महिलांचा तुमचे आयुष्य सुखकर करण्यासाठी हातभार लागला आहे अशा सर्व महिलांची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने तुम्हाला मिळेल.
प्रत्येकाला आयुष्यात चार शब्द कौतुकाचे ऐकायला मिळावे असं वाटत असतं. महिलांचे तर तुमच्या जीवनात एक महत्त्वाचं स्थान आहेच. तुमच्या जीवनात असलेल्या महिलेच्या मदतीशिवाय तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या आई, बहीण, पत्नी आणि मुलीला जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवा आणि त्यांची कृतज्ञता व्यक्त करा.
पुस्तके ही नेहमीच आयुष्यात प्रत्येकाला प्रेरणादायी ठरत असतात. त्यामुळे पुस्तकांना गुरू असंही म्हटलं जातं. अशा अनेक यशस्वी महिला आहेत ज्यांनी पुस्तकांमधून त्यांच्या यशस्वी जीवनाचं रहस्य मांडलेलं आहे. अशा कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा मांडणारी ही पुस्तके तुम्ही तुमच्या आयुष्यातील महिलांना भेट स्वरूपात देऊ शकता.
महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. ज्यामधून यशस्वी महिला त्यांच्या जीवनाचा प्रवास मांडत असतात. तुमची आई, बहीण, पत्नी अथवा मुलीला जर तुम्ही अशा व्याख्यानमालेत नेलं तर त्यांनाही त्यांच्या जीवनाचा खरा मार्ग मिळू शकतो. तेव्हा अशा अनमोल गोष्टी तुम्ही तुमच्या खऱ्या प्रेरणास्थानांना नक्कीच देऊ शकता.
भारतीय संविधान आणि संसदेत महिला सबलीकरणासाठी काही विशेष कायदे करण्यात आलेले आहेत. प्रत्येक महिलेला ते माहीत असायलाच हवेत. त्यातील काही कायदे आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
समान वेतन कायद्यानुसार महिलांना पुरूषांच्या बरोबरीने समान पगार मिळण्याचा हक्क आहे. म्हणजे समान गुणवत्ता असलेल्या पुरूष आणि महिलेमध्ये वेतन ठरवताना भेदभाव करता येत नाही.
लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कंपनीमध्ये याबाबत एक समिती असणं बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी महिला कर्मचारी त्यांच्या लैंगिक छळाबाबत असलेल्या तक्रारी करू शकतात. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये ही कंपनीची जबाबदारी आहे. असं न झाल्यास कंपनीला दंड भरावा लागू शकतो त्याचप्रमाणे कंपनीचे लायसन्सदेखील रद्द होऊ शकते.
पुरूष आणि महिलांना कायद्याने समान हक्क असल्याने वडिलोपार्जित संपत्तीमध्येदेखील महिलांना समान हक्क असतो. हिंदू वारसा कायद्यानुसार मुलाप्रमाणे मुलीचाही वडिलांच्या संपत्तीवर हक्क असू शकतो. जर पालकांनी मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्यांना हा हक्क समान वाटून देण्यात येतो.
जर एखादी महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात गेली आणि तिच्याकडे दुर्लक्ष केले गेले अथवा तिची तक्रार नोंदवली गेली नाही तर ती याबाबत ती कायदेशीर कारवाई करू शकते. मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार प्रत्येक महिलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारानुसार सुर्यास्तानंतर कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही. शिवाय अटक झाल्यास ती का झाली हे जाणून घेण्याचा अधिकार तिला असतो. महिला गुन्हेगाराला फक्त महिला पोलीस कर्मचारीच अटक करू शकतात.
महिलांसाठी भारतीय संविधानात अशा अनेक कायद्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रत्येक महिलेला याबाबत माहीत असायलाच हवे.
दरवर्षी जागतिक महिला दिनाची एक थीम ठरवण्यात येते. यंदा “Women in Leadership: Achieving an Equal Future in a COVID-19 World” अर्थात नेतृत्व करणाऱ्या महिला : कोविड 19 च्या काळात योगदान देणाऱ्या महिला ही आहे
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना जांभळा रंग वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण हा रंग लिंग समानेतेचं प्रतिक मानलं जातं.
जागतिक महिला दिन 2021 साठी सोशल मीडियावर #WomensDay #ChooseToChallenge, the straightforward #IWD2021, #InternationalWomensDay, आणि #SeeHer या हॅशटॅग्जचा समावेश असेल