जाणून घ्या गुढीपाडव्याबाबतच्या काही विशेष गोष्टी

जाणून घ्या गुढीपाडव्याबाबतच्या काही विशेष गोष्टी

हिंदू नववर्षाचा प्रारंभ म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस होय. गुढीपाडवा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरोघरी सगळ्यांचीच जय्यत तयारी सुरू झाली असेलच. हा सण महाराष्ट्रच काय तर भारताच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कारण याच दिवशी चैत्र नवरात्राला सुरूवात होते. तर दक्षिणेला या सणाला 'उगादी' असे संबोधले जाते. जाणून घेऊया गुढीपाडव्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती.

गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस, ज्या दिवशी हिंदू कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष सुरू होतं. 

गुढीपाडव्याला भारतभरात अनेक नावांनी ओळखलं जातं. जसं संवत्सर पाडवो, युगादी, उगादी, चेती चंद आणि नवरेह. भारताच्या ईशान्य पूर्व भागात मणीपूरमध्येही हा सण साजरा केला जातो. जिथे या सणाला सजिबू नोंगमा पानबा चेरोबा असं म्हणतात. या दिवशी तेथील लोकं अनेक पारंपारिक पदार्थ बनवताता आणि संध्याकाळी जवळच्या टेकडीवर जाऊन हा सण एकत्रित साजरा करतात. 

भारत हा मुख्यतः शेतीप्रधान देश आहे. येथील बहुतेकांचा व्यवसाय हा शेती आहे. गुढीपाडवा हा सण वसंताची चाहूल आणणारा सण आहे. जिथे एक ऋतू संपून नव्या ऋतूची चाहूल लागत आहे. 

पुराणानुसार या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता आणि अयोध्येत रामाचं आगमन झालं होतं. त्यामुळे ही गुढीपाडव्याचा दिवस विजयाची गुढी उभारून साजरा केला जातो. 

महाराष्टाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनीही आपल्या विजयांनंतर गुढीपाडवा साजरा करायला सुरूवात केली.  घरोघरी गुढी उभारण्याची प्रथा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली आणि या दिवशी मराठी प्रांतात नववर्षाचं आगमन सुरू झालं. 

मुख्यतः घराच्या मुख्य दरवाजाच्या इथे गुढी उभारली जाते. परंतु आजकाल बिल्डींगमध्ये हे शक्य नसल्याने बरेच जण गॅलरीत किंवा खिडक्यांमध्ये गुढी उभारतात. पण गुढी म्हणजे नेमकं काय? तर एका काठीला भरजरी वस्त्राने गुंडाळून त्यावर तांब्या उलटा ठेवण्यात येतो. नंतर त्यावर हळदी-कुंकवाने स्वस्तिक काढून कडुनिंबाचा पाला, हार, फुलं आणि साखरेची माळ वाहून नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. 

गुढीपाडव्याला नवीन कपडे घालून एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन तसंच कडुनिंबाचा पाला, गूळ आणि चिंच खाण्याची पद्धत आहे. याची एकत्र पेस्ट करून किंवा सरबत करून प्यावं. यामुळे रक्ताची शुद्धी होऊन प्रतिकारक्षमता वाढते. 

महाराष्ट्रीयन घरात या दिवशी प्रामुख्याने श्रीखंडपुरीचा बेत असतो. तर कोकणी लोकांमध्ये कागणाची खीर बनवतात. ज्यामध्ये रताळं, नारळाचं दूध, गुळ आणि भाताचा समावेश असतो. 

गुढीपाडव्याच्या दिवशी घर खरेदी, सोनं खरेदी किंवा वाहन खरेदी करणं शुभ मानलं जातं. ज्यामुळे वर्षभर भरभराट होते. 

गेल्या काही वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या निमित्ताने तरूणाईही उत्साहात सण साजरा करत आहे. याच प्रमुख द्योतक म्हणजे स्वागतयात्रा. गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेने पुन्हा एकदा तरूणाई पारंपारिक पद्धतीने सण साजरा करू लागली. हिंदू नववर्षाचं जल्लोषाने स्वागत होऊ लागलं. या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजनही महाराष्ट्रात सुरू झालं. गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवली येथे झाली. ज्याला आता महाराष्ट्रभरात मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे. 

तुम्हाला सगळ्यांनाही POPxo परिवारातर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

फोटो क्रेडीट - इन्स्टाग्राम