पालकत्त्व ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. कारण तुमच्या लहान मुलांची संपूर्ण काळजी तुम्हालाच घ्यावी लागते. लहान असताना मुलं त्यांच्या भावना फक्त रडण्यातून आणि हसण्यातून व्यक्त होतात. मुलांना काय आवडतं आणि काय आवडत नाही हे तुम्हाला त्यांच्या हावभावातून ओळखावं लागतं. त्यामुळे बाळाला कोणते पदार्थ भरवावे आणि कोणते भरवू नये याची जबाबदारी पालकांवरच असते. जर तुमच्या घरी एक ते पाच वर्षांचं बाळ असेल तर त्याला कोणते पदार्थ भरवू नयेत याची माहिती तुम्हाला असायलाच हवी.
तेलकट आणि चमचमीत पदार्थ –
आईवडील जे खातात ते च पदार्थ मुलांना खावेसे वाटत असतात. समजा तुम्ही तुमच्या लहान बाळासमोर सतत तिखट आणि चमचमीत खात असाल तर मुलंदेखील हे पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. मात्र लक्षात ठेवा मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना तेलकट,तिखट आणि चटकदार पदार्थ खाण्यास देऊ नका. अशा पदार्थांमुळे तुमच्या मुलांना पचनाच्या समस्या आणि ह्रदयाचे विकार होण्याची शक्यता असते.
सुकामेवा –
मुलांना सतत भुक लागत असते. ज्यामुळे पालकांना सतत मुलांसाठी काहितरी खाण्यासाठी बनवावे लागते. बऱ्याचदा पालकांना वाटते की मोठयांसाठी जे पदार्थ पोषक असतात तेच मुलांनाही योग्य असतात. जसं की मधल्या वेळी मोठयांना सुकामेवा खाण्याची सवय असते. ज्यामुळे मुलांनाही बऱ्याचदा सुकामेवा खाण्यास दिला जातो. मात्र लक्षात ठेवा लहान मुलांना सुकामेवा खाण्यास देऊ नये. कारण सुकामेवा त्यांच्या अन्ननलिकेत अडकून त्यांना त्रास होऊ शकतो. शिवाय एक ते पाच वर्षांच्या मुलांच्या दातांची वाढ योग्य पद्धतीने झालेली नसते. त्यामुळे कठीण सुकामेवा चावून खाणं त्यांच्यासाठी शक्य नसतं. सुकामेवा खाण्यामुळे मुलांच्या नाजूक अन्ननलिकेवर परिणाम होऊ शकतो. यासाठी मुलांना सुकामेवा कधीच खाण्यास देऊ नका.
कच्ची फळं आणि भाज्या –
फळे आणि भाज्या जरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पोषक असल्या तरी त्या कच्च्या स्वरूपात लहान मुलांना खाण्यास देऊ नये. गाजर, मुळा अशा भाज्या आणि द्राक्षे, स्टॉबेरी अशी फळं खाण्यामुळे मुलांची अन्ननलिका चॉक अप होऊ शकते. यासाठी भाज्या स्वच्छ धुवून शिजवून त्याचे सूप आणि फळांचे रस मुलांना अवश्य द्यावे. मुलांना नेहमी असेच पदार्थ खाण्यास द्यावे जे त्यांच्या घशातून सहज गिळले जातील आणि अन्ननलिकेत अडकणार नाहीत. शिवाय मोठा घास गिळावा लागेल असा कोणताच पदार्थ लहान मुलांना खाण्यास देऊ नये.
च्विंगम आणि कॅंडी –
लहान मुलांना चॉकलेट कॅंडी आणि च्विंगम खाण्यास फार आवडते. मात्र एक ते पाच वर्षांच्या मुलांना असे पदार्थ खाण्याची सवय लावू नये. एकतर अशा पदार्थांमुळे मुलांचे दात लवकर खराब होतात. शिवाय असे पदार्थ खाण्यामुळे ते मुलांच्या अन्ननलिकेत अडकण्याची शक्यता जास्त असते. यासाठी असे पदार्थ घरीच आणू नयेत ज्यामुळे तुमच्या मुलांना त्याबद्दल आकर्षण वाटेल.
सॉफ्ट ड्रिंक –
सॉफ्ट ड्रिंकमध्ये भरपूर कॅलरिज असतात शिवाय ते चवीला गोडदेखील असतात. लहान मुलेच नाही तर मोठ्यांनीदेखील कोल्डड्रिंक पिणे आरोग्यासाठी योग्य नाही. मात्र मोठ्यांचे अनुकरण करत जर तुमची लहान मुलं कोल्डड्रिंक पित असतील तर त्यांना ते देणं त्वरीत थांबवा. कोल्डड्रिंकमधील अॅसिड आणि साखरेमुळे तुमच्या मुलांच्या दातांचे आणि आतड्याचे नुकसान होऊ शकते. यासाठीच या गोष्टींची वेळीच काळजी घ्या.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम