खमंग आणि खुसखुशीत बटाटावडा बनवा घरी, सोपी रेसिपी

खमंग आणि खुसखुशीत बटाटावडा बनवा घरी, सोपी रेसिपी

बटाटावडा अथवा वडापाव म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं. खमंग आणि खुसखुशीत असा गरमागरम बटाटावडा खाण्याची मजाच काही और आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वडापावच्या गाड्या असतात. पावापेक्षाही वडे खाण्यात आपल्याकडे सगळेच पटाईत आहेत. मस्तपैकी लसूण चटणी, गरमागरम वडा आणि तळलेली हिरवी मिरची ही फक्कड मेजवानी असली की इतर कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची गरजच भासत नाही. बरेचदा पावसाळा आला की, गरमागरम भजी आणि वडे असा फक्कड बेत बऱ्यात घरांमध्ये आखला जातो. पण कधी कधी जसा बटाटावडा बाहेर मिळतो तसा घरी होत नाही अशी तक्रार असते. पण तुम्ही आता घरच्या घरीदेखील अगदी सोप्या पद्धतीने हा लज्जतदार बटाटावडा करू शकता. आम्ही तुम्हाला या लेखातून बटाटावड्याची रेसिपी देत आहोत. तुम्हाला हवं तर पावाला चटणी लावा आणि त्याबरोबर हा बटाटावणा हाणा अथवा नुसता गरमागरम बटाटावडा आणि चटणी तुम्ही खाऊ शकता. जाणून घेऊया महाराष्ट्रीयन पदार्थ असणाऱ्या फक्कड बटाटावड्याची रेसिपी मराठीत.

कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

बटाटावडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य

बटाटावडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य हे साधारणतः प्रत्येक घरात असते. आपण नेहमीच घरात बटाट्याच्या भाजीसाठी या साहित्याचा उपयोग करत असतो. त्यामुळे हा वडा बनविण्यासाठी तसा जास्त वेळही लागत नाही आणि लगेच उठून दुकानात जाण्याची गरजही भासत नाही. 

साहित्य 

 • 4-5 उकडलेले बटाटे 
 • आलं - लसूण - हिरवी मिरची पेस्ट
 • चिरलेला कांदा 
 • हळद 
 • कोथिंबीर 
 • चवीनुसार मीठ 
 • तळण्यासाठी तेल
 • बेसन 
 • खाण्याचा सोडा

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी

बटाटा वडा बनविण्याची पद्धत

बरेचदा बेसन नीट न भिजवल्याने वडे फसतात. पण तुम्ही योग्य प्रमाण वापरले तर तुमचा बटाटावडादेखील अत्यंत खुसखुशीत, कुरकुरीत आणि चमचमीत होऊ शकतो. आम्ही सांगितलेली कृती वापरून तुम्ही नक्कीच बटाटावडा करून पाहा. 

 • कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. उकडलेले बटाटे साल काढून सोला आणि व्यवस्थित मॅश करा
 • एका कढईत तेल घ्या. त्यात चिरलेला कांदा परतून घ्या. त्यात हळद मिक्स करून कांदा थंड होऊ द्या
  आले चिरून घ्या आणि लसणीच्या पाकळ्या काढा. मिरचीचे देठ काढून घ्या. हे तिन्ही एकत्र मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या
 • दुसऱ्या भांड्यात बेसन (चण्याच्या डाळीचे पीठ) पाण्याने भिजवा. त्यात मीठ आणि खाण्याचा सोडा चवीपुरता घाला आणि मध्यम स्वरूपात भिजवा 
 • मॅश केलेल्या बटाट्यांवर परतलेला कांदा, आलं - लसूण - मिरची पेस्ट, मीठ घाला आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्या. त्याचे गोळे करा 
 • हे गोळे पिठात भिजवा आणि तेल मध्यम आचेवर ठेऊन तळा. गरमागरम खुसखुशीत आणि खमंग वडे गोड आणि तिखट चटणीसह खायला द्या

टिप - बटाटावडा करताना बटाटे अति चिकट नाहीत ना याचा आधी आढावा घ्या. तसंच बटाट्याला एक विशिष्ट वास असतो. त्यानुसार बटाट्याची निवड करा. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करताना तिन्ही समप्रमाणात घ्या. जेणेकरून तिन्हीची चव वड्याला व्यवस्थित लागू शकेल. वडा अति तिखट होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा वड्याची मूळ चव निघून जाते. या टिप्स लक्षात ठेऊन तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा मस्त खुसखुशीत वडे.

क्रिस्पी आणि खुसखुशीत साबुदाणा वडा बनविण्यासाठी सोपी ट्रिक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक