उन्हाळ्यात वर्क फ्रॉम होम सुसह्य करण्यासाठी सोप्या टिप्स

उन्हाळ्यात वर्क फ्रॉम होम सुसह्य करण्यासाठी सोप्या टिप्स

कोरोनाचा संकटाचा सामना करता करता आता दुसरं वर्ष सुरू झालं. मागचा उन्हाळा आणि संपूर्ण वर्ष कोरोनावर मात करण्यात निघून गेलं. या वर्षी थोडा दिलासा मिळत असतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरु झालं. मागच्या वर्षीपासून अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर काहीजणांना पुन्हा झालेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे घरातून काम करावं लागणार आहे. त्यात एप्रिल, मेचा कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अशा वातावरणात घरातून काम करणं सुसह्य करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

उन्हाळ्यात वर्क फ्रॉम होम करण्यासाठी सोप्या टिप्स

जर यंदाच्या उन्हाळ्यात घरातून ऑफिसचं काम करणं सुसह्य करायचं असेल तर या गोष्टी जरूर फॉलो करा.

काम करण्यासाठी घरातील हवेशीर जागा निवडा-

मागच्या वर्षभरापासून बरेच जण  वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे आता असं काम करण्याची सर्वांना नक्कीच सवय झाली असेल. अनेकांनी घरात एक छोटेखानी ऑफिसदेखील थाटलं असेल. मात्र आता उन्हाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आठ ते नऊ तास तुम्हाला एसीत बसणं शक्य नसेल तर कामासाठी घरातील एखादी हवेशीर जागा निवडा. खिडकी, बाल्कनी, अंगण अशा ठिकाणी कामासाठी बसल्यामुळे तुम्हाला उकाडा जाणवणार नाही.  उष्णतेपासून बचाव करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे लॅपटॉप मांडीवर न घेता टेबलावर ठेवून काम करणे. कारण काम करताना तुमचा लॅपटॉप गरम होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त उकाडा जाणवू शकतो. शिवाय असं करणं आरोग्यासाठीदेखील योग्य नाही. 

pexels

हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा -

उन्हाळ्यात काम करणं सुसह्य करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला हायड्रेट ठेवणे. यासाठी तुम्ही तुमचे काम करत असलेल्या डेस्क अथवा टेबलावर पाण्याची बॉटल ठेवा. कामाच्या गडबडीत पाणी पिणे विसरू नये यासाठी तुमच्या लॅपटॉप अथवा मोबाईलवर पाणी पिण्याची आठवण करून देणारे रिमांयडर लावा.  याकाळात तुम्ही दिवसभरात ठराविक वेळेत ताक, लस्सी, कोकम सरबत, आंब्याचे पन्हे, लिंबू सरबत, खसचे सरबत अशी शरीराला थंडावा देणारी पेय पिऊ शकता. हायड्रेट राहण्यासाठी दिवसभरातून दोनदा अंघोळ करा आणि चहा, कॉफी, मद्यपान, धुम्रपानापासून दूर राहा.

उन्हाळ्याला साजेसा आहार घ्या -

उन्हाळ्यात वातावरणात उष्णता वाढल्याने भुक कमी लागते. मात्र असं असलं तरी शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी योग्य आणि पोषक आहार घेणं गरजेचं आहे. याकाळात तुम्ही डाळखिचडी, दहीभात, वरणभात, पालक, पछडी, कोशिंबीर, सलाड असा हलका आहार घेऊ शकता. शिवाय दोन जेवणाच्या मध्ये कलिंगड, द्राक्ष, स्टॉबेरी, जाम, ताडगोळे अशी पाणीदार फळे खा. ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होईल आणि थंडावा मिळेल.

pexels

आरामदायक कपडे घाला -

वर्क फ्रॉम होममुळे आजकाल घरच्या कपड्यांवरच बसून ऑफिसचं काम करणं सोपं झालं आहे. जेव्हा ऑफिसचे ऑनलाईन कॉल, मिटिंग सुरू असते तेव्हादेखील अनेकजण फक्त कंबरेच्या वरील आऊटफिट बदलतात आणि बॉटमचे आऊटफिट घरचेच असतात. या काळात घरात बसून काम करणं सुसह्य करण्यासाठी तुम्हाला आरामदायक ठेवतील असे कपडे तुम्ही वापरू शकता. सैल, हलक्या रंगाचे आणि सुती कपडे शरीराला उन्हाळ्यात जास्त आराम देतात. 

सकाळी आणि संध्याकाळी वॉक घ्या -

दिवसभर ऑफिसच्या कामामुळे तु्म्हाला घराबाहेर जाणं नक्कीच शक्य नाही. मात्र तुमच्या शरीराला पुरेसा आराम मिळणं गरजेचं आहे. सध्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. मात्र असं असलं तरी सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तासासाठी चालण्याचा व्यायाम तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा मूडदेखील चांगला होतो. शरीराला व्यायाम मिळाल्यामुळे कामाचा उत्साह वाढतो. यासाठीच सकाळी अथवा संध्याकाळी योग्य वेळेनुसार सोसायटी अथवा पार्कमध्ये फेरफटका मारा. या काळात तुमच्या जवळ मोबाईल अथवा इतर कोणतेही गॅजेट ठेवू नका. कामाचा ताण आणि चिंता दूर ठेवा आणि थोडावेळ स्वतःसाठी द्या. जर तुम्हाला कामाच्या वेळेमध्ये कोणतेही बंधन नसेल तर काम करण्यासाठी रात्री उशीरा अथवा सकाळी लवकरची वेळ निवडा. ज्यामुळे दुपारी उकाडा सहन करत काम करावं लागणार नाही.