जेव्हा इंग्रजांविरोधात उभे राहिले महात्मा ज्योतिबा फुले

जेव्हा इंग्रजांविरोधात उभे राहिले महात्मा ज्योतिबा फुले

देशातील अस्पृश्यता दूर करणे आणि समाजातील वंचिताना सशक्त बनवण्यात मुख्य भूमिका पार पाडणारे महात्मा ज्योतिबा फुले होय. समाजसेवक, लेखक, दिशादर्शक आणि क्रांतीकारक ज्योतिराव गोंविदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुण्यात झाला आणि निधन 28 नोव्हेंबर 1890 साली झालं. त्यांचं खरं नाव ज्योतिराब गोविंदराव फुले असं होतं. मात्र ज्योतिबा फुले या नावाने त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांचं संपूर्ण आयुष्यच क्रांतीकारी कार्याने भरलेलं आहे. त्यांनी समाजातील वंचित आणि दुर्लिक्षितांना सशक्त बनवण्यासाठी लढा दिला. यासाठी त्यांना समाजाच्या रूढी परंपरा आणि बुरसट विचारांच्या विरोधात वेळोवेळी उभं राहावं लागलं. यासाठी वेळ पडल्यास ते ब्रिटीशांविरोधात उभं राहण्यासही डगमगले नाहीत. त्यांनी ब्रिटिश शासनाविरोधात उभं ठाकल्याचे दोन रोचक किस्से या लेखात तुम्हाला वाचायला मिळतील.

पत्रकारिता स्वातंत्र्य (Freedom of Press)

1876 ते 1880 पर्यंत भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड लिटन हे होते. भारतीय राष्ट्रवादाच्या आंदोलनाला त्यांना दडपायचं होतं आणि त्यामुळेच त्यांना प्रेसचं स्वातंत्र्यही खटकत होतं. त्यांनी राष्ट्रवाद्यांना दडपण्यासाठी प्रेसवर गदा आणणे हे योग्य पाऊल मानलं. 1878 साली त्यांनी व्हर्नाक्युलर एक्ट पास करत प्रेसची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. या कायद्यांतर्गत सर्व राज्य भाषांमध्ये छापल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रावर काही प्रमाणात बंदी आणून त्यांचं स्वातंत्र्य हिरावण्यात आलं. सत्यशोधक समाजाचा भाग असलेल्या दीनबंधु वर्तमान पत्रातून याचा तीव्र विरोध करण्यात आला. या प्रतिबंधाच्या दोन वर्षानंतर 1880 साली लिटन पूण्याच्या दौऱ्यावर येणार होते. पूण्याच्या नगरपालिकेचे तत्कालीन अध्यक्षांना लिटन यांचं जंगी स्वागत करायचं होतं. स्वागताच्या खर्चासाठी पुण्याच्या नगरपालिका सदस्यांनी आपला प्रस्ताव मंजूर करावा यासाठी आग्रह केला. पण ही गोष्ट ज्योतिबा फुले यांना पटली नाही की, जनतेचा पैसा लिटन यांच्यासारख्या क्रूर माणसावर खर्च करावा. त्यांनी न घाबरता याविरोधात प्रस्ताव ठेवला की, लिटन यांच्या स्वागतावर खर्च करण्याऐवजी हे पैसे पुण्यातील गरिबांच्या शिक्षणावर खर्च करण्यात यावेत. ते आपल्या म्हणण्यावर अडून राहिले. जेव्हा लिटन खर्च प्रस्ताव मतदानासाठी मांडण्यात आला. तेव्हा तत्कालीन सदस्यांपैकी फक्त ज्योतिबा फुले यांनी त्या प्रस्तावाविरोधात मतदान केलं.

ब्रिटीश परिवाराला दिलं आव्हान (Challenged Britishers)

पुन्हा एकदा अशीच घटना घडली जेव्हा ज्योतिबांनी गरीब शेतकऱ्यांसाठी न डगमगता आवाज उठवला. ज्योतिबा फुले यांचे मित्र हरि रावजी चिपळूणकर होते. त्यांनी ब्रिटिश राजपुत्र आणि त्यांची पत्नी हिच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ब्रिटीश राजपुत्र हा महाराणी व्हिक्टोरिया यांचा नातू होता. या कार्यक्रमाला ज्योतिबा फुले पोचले. तिकडे जाऊन शेतकऱ्यांचे दुःख मांडण्याकरता त्यांनी शेतकऱ्यांसारखेच कपडे परिधान केले आणि भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात धनाढ्य लोकांवर टीका केली जे दागदागिने घालून आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करतात. त्यांनी हेही म्हटलं की, ही धनाढ्य लोक भारताचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. त्यांनी म्हटले की, राजपुत्राला जर खरंच भारतातील जनतेची स्थिती पाहायची असेल तर त्यांनी गावोगाव दौरा करावा. त्यांनी राजपुत्राला अशा शहरात दौऱ्याचा सल्ला दिला जिथे लोकांना अस्पृश्य म्हणून हीन वागणूक दिली जाते. ज्योतिबांनी राजपुत्राला आग्रह केला की, त्यांचा संदेश महाराणी व्हिक्टोरियापर्यंत पोचवण्यात यावा आणि गरीबांना योग्य न्याय देण्यात यावा. ज्योतिबा फुले यांच्या भाषणाने समारंभातील उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. 

हे दोन्ही किस्से आपल्याला पुन्हा पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि ज्योतिबांची संपूर्ण माहिती वाचण्यास नक्कीच प्रेरित करतात.