वेळ वाचवण्यासाठी असं करा दिवसाचं नियोजन

वेळ वाचवण्यासाठी असं करा दिवसाचं नियोजन

वेळ ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. म्हणूनच इंग्रजीत Time is money असं म्हटलं जातं. मात्र आजकाल प्रत्येकजण कुठल्याही गोष्टीसाठी सरळ माझ्याकडेल वेळच नाही असं उत्तर देताना दिसतो. वेळ नाही म्हणून अनेक लोक व्यायाम करत नाहीत, वेळेवर जेवत नाहीत, पुरेशी झोपही घेत नाहीत किंवा प्रियजनांसोबत फिरायला जात नाहीत. वास्तविक जगातील प्रत्येकाकडे दिवसभराचे चोविस तासच असतात. मग तो लहान असो वा मोठा, श्रीमंत असो वा गरीब. आपल्याला फक्त प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करता यायला हवा. यासाठीच आपण दिवसभरात वेळ कसा वाचवू शकतो याच्या काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.

पुरेशी आणि शांत झोप घ्या -

झोप ही अशी एक गोष्ट आहे जी कितीही पैसे खर्च केले तरी विकत मिळणार नाही. शिवाय पुरेशी झोप घेतली नाही तर आरोग्यही बिघडते. म्हणून झोपेसाठी पुरेसा वेळ काढणं आणि मिळालेल्या वेळेत गाढ झोपणं खूप गरजेचं आहे. जर रात्री तुम्ही कमी झोपला तर तुमचा संपूर्ण दिवस खराब जातो. यासाठीच वेळ लावून कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त आठ तासा शांत झोपा. झोप लागण्यासाठी खोलीत अंधार करा, गॅझेट पाहणे टाळा, मंद संगीत ऐका ज्यामुळे तुम्हाला शांत झोप मिळेल.

ऑफिसचे काम वेळेत पूर्ण करा -

तुम्हाला वर्क फ्रॉम होममुळे कधीही आणि कुठेही काम करण्याची सवय लागली आहे. मात्र यामुळे तुमचा संपूर्ण दिवस कामात जातो आणि स्वतःसाठी पुरेसा वेळ काढता येत नाही. मात्र कामाची एक ठराविक वेळ आणि जागा ठरवणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारेल आणि कामाचा वेळदेखील वाचेल. वेळेत काम पूर्ण केल्यामुळे तुम्हाला सतत कामाची चिंता सतावणार नाही. ज्यामुळे कामा व्यतिरिक्त असलेला वेळ तुम्ही तुमच्या इतर महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी वापरू शकाल. 

कपडे इस्त्री करण्याचा वेळ वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

सोशल मीडियापासून दूर राहा-

सोशल मीडिया टाळणं आजकाल सहज सोपं नक्कीच नाही. कारण सोशल मीडियाचं सर्वांना जणू वेडच लागलं आहे. सोशल मीडिया पूर्णपणे टाळणं शक्य नसेल तरी दिवसभरात ठराविक वेळ ठरवा आणि त्या काळातच सोशल मीडिया अकाउंट चेक करा. कारण तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुमचा खूप वेळ सोशल मीडियावर वाया जातो. सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच तोटेदेखील आहेत. त्यामुळे किती वेळ सोशल मीडियाला द्यायचा हे फक्त तुम्हीच ठरवू शकता.

दिवसभराचे नियोजन आखताय... स्वतःसाठी वेळ काढायला विसरु नका!

मोबाईलमधून गेम्स डिलीट करा -

लॉकडाऊनच्या  काळात गेम्स खेळण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. गेम्स हे काही काळासाठी मनोरंजन करण्यासाठी ठीक आहेत. पण जर तु्म्ही या काळात गेम्सच्या आहारी गेला असाल तर या  व्यसनापासून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे गेम्स डिलीट केल्यामुळे तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. 

गॉसिप आणि वायफळ गप्पा टाळा-

गॉसिप आणि इकडच्या तिकडच्या वायफळ गप्पा मारून तुमचं जीवन यशस्वी होणार नाही. त्यामुळे विनाकारण या दुष्ट चक्रात अडकू नका. घरी, मित्रमैत्रिणींमध्ये अथवा ऑफिसमध्ये अशा गप्पा मारून कधीच कोणाचं भलं झालेलं नाही. झालं असेल तर नुकसानच झालेलं आहे.  इतरांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा तो वेळ स्वतःसाठी आणि काहितरी चांगलं करण्यासाठी खर्च करा. 

'या' सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत

एकदाच भरपूर स्वयंपाक करून ठेवा -

जर तुमचा वेळ सतत स्वयंपाक करण्यात वाया जात असेल तर तो वाचवण्याचा सोपा मार्ग म्हणजे एकदाच सर्वांना पुरेल इतकं अन्न शिजवणे. स्वयंपाक ही कला असली तरी त्यासाठी दिवसभरात किती वेळ खर्च करायचा हे प्रत्येकाने ठरवायला हवं. कारण सतत यासाठी वेळ काढण्यामुळे तुमची अनेक महत्त्वाची  कामे राहून जातात. त्यामुळे आठड्यातून काही दिवस दोन वेळचं अन्न एकदाच शिजवण्याची सवय स्वतःला आणि घरातील लोकांना लावा. 

घरातील कामाचे योग्य नियोजन करा -

जेव्हा एखादी गोष्ट जागच्या जागी असते तेव्हा ती शोधण्यात आपला खूप वेळ वाचतो. त्यामुळे महिन्यातून एकदा अथवा दोनदा वेळ काढून घर नियोजित करा. वाणसामान, दैनंदिन वापरातील वस्तू, कपडे अशा जागी असावेत जे वेळ पडल्यावर तुम्हाला पटकन सापडतील. ज्यामुळे तुमचा दिवसभरातील खूप वेळ वाचू शकेल. 

 

 

फोटोसौजन्य - pexels