पावसाळ्याचा ऋतू उन्हाळ्याने त्रासलेल्या सगळ्यांना थोडा आराम मिळतो. वातावरणात गारवा येतो. पहिल्या पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच असते. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर पावसाच्या थेंबांमुळे वातावरण एकदम थंड होते, त्यामुळे आपल्याला थोडा दिलासा मिळतो. पण या हंगामात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे आरोग्य आणि त्वचा दोघांनाही हानी पोहोचू शकते. पावसाळ्यात साथीचे अनेक आजार पसरतात. एवढेच नव्हे तर वाढलेल्या आर्द्रतेमुळे आपली पचनशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. म्हणूनच पावसाळ्यात प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आणि शरीरात साठलेले टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी काही अतिरिक्त उपाय करणे आवश्यक आहे. तर आज जाणून घ्या काही आयुर्वेदिक उपाय, जे पावसाळ्यात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घेण्यास मदत करतील.
आहाराची खास काळजी घ्या
आयुर्वेदानुसार या ऋतूत आहारात तुरट, हलके कडू आणि तिखट पदार्थांचा समावेश करायला हव. या ऋतूमध्ये जास्त खारट पदार्थ खाणे टाळावे कारण अतिरिक्त मिठामुळे शरीरात पाणी साठून राहते ज्यामुळे शरीरावर सूज येऊ शकते. तसेच चिंच आणि टोमॅटोसारखे नैसर्गिकरित्या आंबट पदार्थ देखील शक्यतोवर खाऊ नका. कारले, मेथी, हळद यांसारख्या कडू भाज्या व औषधी पदार्थांचा आहारात समावेश करावा ज्यामुळे शरीरातील दोषांची स्थिती संतुलित होते आणि शरीर डिटॉक्स होते. विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ प्या. तसेच, फक्त ताजे ,घरचे व चांगले शिजवलेले अन्न खा.
पावसाळ्यात कफ व सर्दी खोकला होऊ नये म्हणून हर्बल चहाचे सेवन करणे फायदेशीर आहे. विशेषतः आले, काळी मिरी, मध, पुदिना आणि तुळशीच्या पानांपासून तयार केलेला बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असलेला काढा / चहा घ्यावा. पावसाळ्यात आपण कॉफी आणि चहाचे जास्त सेवन करतो पण त्याने शरीरातील द्रवपदार्थांचे निर्जलीकरण होते, म्हणून ते टाळावे. आपल्या पूर्वजांना या सगळ्याचे उत्तम ज्ञान होते म्हणूनच या काळात अनेक व्रतवैकल्ये व सणवार साजरे करण्याची पद्धत ठेवली गेली, ज्यामुळे आपसूकच लोक उपवास करतील व निरोगी राहतील ही यामागची युक्ती होती. उपवास हा शरीराला विषमुक्त करण्याचा आयुर्वेदिक मार्ग आहे. त्यामुळे झेपत असल्यास पावसाळ्यात आठवड्यातून एकदा तरी उपवास केला पाहिजे.
आंघोळ करताना हे करा
पावसाळ्यात वात वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी तिळाच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने मसाज केल्यास खूप फायदा होऊ शकतो. या ऋतूत पायांची देखील अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. पायांची काळजी घेण्यासाठी काही ताजी कडुलिंबाची पाने किंवा त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळवून घ्या. ते पाणी थंड होऊ द्या आणि नंतर या शुद्ध पाण्याने आपले पाय धुवा. हे आठवड्यातून एकदा करा.
पावसाळ्यात शरीराला डिटॉक्स करणे महत्त्वाचे आहे, म्हणून हर्बल पावडर, शॉवर वॉश आणि साबणांच्या रूपात कडुलिंब, चंदन, चमेली, कोरफड, हळद आणि गुलाब यासारख्या नैसर्गिक गोष्टींचा समावेश करा. हरितकीचे चूर्ण सैंधव मिठासोबत सेवन करणे पावसाळ्यात उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुपारच्या जेवणानंतर 2-3 ग्रॅम हरितकी चूर्णात चिमूटभर मीठ टाकून घ्या. तसेच पावसाळ्यात मधाचे सेवन करणे आवश्यक आहे. शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी तुम्ही सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून ते सेवन करू शकता. किंवा 5-6 तुळशीची पाने, 2 काळी मिरी, 1 लवंग, एक दालचिनी आणि थोडे आले पाण्यात उकळा. हा काढा अर्धा होईपर्यंत उकळू द्या आणि गरम असताना प्या. हा काढा आरोग्यवर्धक आहे.
पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून हे उपाय करून बघा.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक