आवळा हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. म्हणूनच “एक आवळा, अनेक फायदे असे म्हटले जाते. आवळा हे एक चमत्कारिक फळ आहे ज्याला आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. हिरवागार आवळा हा रानमेवा म्हणून गणला जातो आणि त्याला आंबट तुरट चव असते. आवळा खाल्ल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. त्याचप्रमाणे आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
प्रकृतीसाठी उत्तम आवळा
भारतीय घराघरांमध्ये अनेक आजारांवर आजीबाईच्या बटव्यातील आवळ्याचा वापर करून अनेक उपाय सांगितले आहेत. मळमळणे ,उलट्या होणे यासाठी आवळा सुपारी खाण्याचा सल्ला दिला जातो. अपचन किंवा भूक लागत नसेल तर घरातल्या आज्यापणज्या लगेच चटपटीत आवळा कॅण्डी देतात. पूर्वी तर घराघरांमध्ये वर्ष-दोन वर्ष पुरेल असा मोरावळा घालून ठेवला जाई जेणे करून कुणाला जर पोटाचा त्रास झाला तर त्याला औषध म्हणून मोरावळा खायला दिला जाई.
मोरावळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
आवळ्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, डॉक्टर गॅस्ट्र्रिटिस व पचन आणि जठरासंबंधी समस्यांसाठी आवळ्याचा मुरंबा किंवा मोरावळा खाण्याचा सल्ला देतात. मोरावळ्यात साखर आणि मध मिसळून ते बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून वापरले जाते. उत्तम आरोग्यासाठी आपले पोट निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण बहुतेक समस्या किंवा रोग हे पोट खराब झाल्यामुळे होतात. आवळा क्रोमियम, जस्त, तांबे, लोह आणि इतर खनिजांनी समृद्ध आहे. आयुर्वेदतज्ज्ञ या खनिजांना शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे मानतात. हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन्सनुसार, क्रोमियम, रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते असे मानले जाते आणि ते हृदयविकाराचा धोका कमी करू शकते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीरासाठी आवश्यक असते आणि ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. आवळा हे कमी चरबीयुक्त, कमी कार्बोहायड्रेट असलेले फळ आहे. त्यामुळे एखाद्याच्या तृष्णेचे नियमन करण्याबरोबरच ते मेटाबॉलिजम देखील वाढवते. तसेच आवळा व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे, जे तुमच्या डोळ्यांची काळजी घेते. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे ते वृद्धत्व विरोधी घटक म्हणून वापरले जाऊ शकते व कॅन्सरला प्रतिबंध करण्यास फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये शरीरास आवश्यक फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते, जे त्वचा आणि केसांचे आरोग्य राखण्यास मदत करते.
मोरावळा बनवण्याची पद्धत
आवळ्यात पॉलीफेनॉल्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह हे पोषक घटक समृद्ध प्रमाणात आढळतात. म्हणूनच आयुर्वेदतज्ज्ञ व घरातील ज्येष्ठ मंडळी कायम आवळा खाण्याचा सल्ला देतात. आता प्रत्येक सीझनमध्ये तर आवळा मिळत नाही. तो जास्त चांगला हिवाळ्यातच मिळतो. पण त्याचे लोणचे किंवा मोरावळा करून ठेवला तर तो वर्षभर टिकतो. मोरावळा जितका मुरलेला, तितका तो औषधी असतो. जाणून घ्या मोरावळा बनवण्याची पद्धत-
साहित्य- 1 किलो आवळा, 1 1/2 किलो साखर , 6 कप पाणी , 1 चमचा लिंबाचा रस
कृती – सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्या व काट्याच्या साहाय्याने त्यांना छिद्रे पडून घ्या. आता एका भांड्यात पाणी उकळून त्यात आवळे घाला व मऊ होईपर्यंत शिजवा.किंवा कुकरमध्ये आवळे शिजवून घ्या. आता साखर, लिंबाचा रस आणि ६ कप पाणी एकत्र करून साखरेचा पाक बनवा व त्यात आवळे घालून एक उकळी येऊ द्या व मंद आचेवर ४-५ मिनिटे उकळा. त्यानंतर गॅस बंद करून मोरावळा थंड होऊ द्या. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात वेलची पूड देखील घालू शकता. मोरावळा साठवण्यासाठी हवाबंद काचेची बरणी घ्या व बुरशी लागणार नाही अशा ठिकाणी मोरावळा साठवा.
Photo credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक