मनोरंजन

अभिनेत्री रंजना यांचा जीवनप्रवास आता बघायला मिळणार मोठ्या पडद्यावर

Vaidehi Raje  |  Jul 25, 2022
ranjana deshmukh biopic

मराठी चित्रपटसृष्टीला अनेक महान अभिनेते आणि अभिनेत्री लाभल्या ज्यांनी रसिक प्रेक्षकांना अनेक अजरामर कलाकृती दिल्या. अनेक मराठी अभिनेत्रींनी त्यांच्या सुंदर संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. त्यांच्या टॅलेंट व अदाकारीने त्यांनी ब्लॅक अँड व्हाईटच्या काळातही रुपेरी पडदा रंगेबेरंगी करून टाकला. या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अभिनयातील विविधता, सोज्वळ देखणे रूप, मनमोहक नृत्य, सुरेख संवादफेक या सगळ्याच्या बळावर रंजना देखमुख यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली व एक काळ गाजवला आहे. त्यांनी प्रेक्षकांवर जणू त्यांच्या अदाकारीने मोहिनीच घातली होती. त्या काळातील आघाडीच्या जवळजवळ सगळ्याच दिग्दर्शकांबरोबर व अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले व अनेक चित्रपट गाजवले जे आजही प्रेक्षक आवडीने बघतात. पण दुर्दैवाने एका अपघातानंतर रंजना यांना काम करणे थांबवावे लागले आणि त्यांनी अकाली या जगाचा निरोप घेतला. आजही प्रेक्षकांना याबाबत हळहळ वाटते. अशा चतुरस्त्र अभिनेत्री असलेल्या रंजना यांचा जीवनप्रवास आता प्रेक्षकांना लवकरच रुपेरी पडद्यावर बघता येणार आहे. 

बालपणीच गिरवले अभियानाचे धडे 

रंजना यांचा जन्म मुंबईचाच! ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख या रंजना यांच्या आई होत. तर व्ही. शांताराम यांच्या पत्नी म्हणजेच अभिनेत्री संध्या या रंजना यांच्या मावशी होत्या. रंजना यांनी १९६० सालापासून त्यांच्या अभिनय कारकीर्दीस आरंभ केला. १९६० ते २००० सालापर्यंत त्यांनी अनेक सुंदर व्यक्तिरेखा साकारत मराठी चित्रपट रसिकांचे मनोरंजन केले. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट‘हरिश्चंद्र तारामती’ होता. या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर तरुणपणी त्यांनी संध्या यांच्या ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या चित्रपटात एक लहानशी भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘झुंज’ व  ‘असला नवरा नको ग बाई’ या चित्रपटात त्यांना नायिकेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले. या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना कौतुकाची थाप मिळाली. त्यानंतर ‘गोंधळात गोंधळ’ , ‘मुंबईचा फौजदार’, ‘सुशीला’,’ बिन कामाचा नवरा’,’बहुरूपी’,’गुपचूप गुपचूप’,’खिचडी’ अशा अनेक यशस्वी आणि वेगवेगळ्या विषयांवर असलेल्या चित्रपटांत त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. जितक्या सहजतेने त्या गंभीर भूमिका साकारत असत तितकेच त्यांचे विनोदाचे टायमिंग सुंदर होते. खास करून अशोक सराफ यांच्याबरोबरच्या त्यांच्या काही भूमिका तर अजरामर आहेत. या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांना त्यांच्या कलागुणांचे दर्शन घडवले.  आता रंजना यांच्यावर येणाऱ्या बायोपिकच्या रूपात मराठी प्रेक्षकांसमोर त्या पुन्हा येणार आहेत. 

नुकतीच झाली ‘रंजना-अनफोल्ड’ ची घोषणा 

रंजना यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘रंजना-अनफोल्ड’ या बायोपिकची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे. कार्निव्हल ग्रुपचे चेअरमन डॉ. श्रीकांत भासी हे हा चित्रपट प्रस्तुत करणार आहेत. कार्निव्हल मोशन पिक्चर्स व वैशाली सरवणकर हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित मोहन वारंग हे या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. ‘रंजना अनफोल्ड’ या चित्रपटाद्वारे रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास पडद्यावर उलगडला जाणार आहे.  या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होईल. यात रंजना यांची भूमिका साकारण्याची संधी कुणाला मिळेल तसेच आणखी कोण या चित्रपटात हजेरी लावणार आहे हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 

पुढील वर्षी 3 मार्च 2023 रोजी म्हणजेच रंजना यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन