बॉलीवूड

जेव्हा या कलाकारांना भूमिका साकारण्यासाठी करावे लागले स्वतःमध्ये अफलातून बदल

Trupti Paradkar  |  Aug 20, 2020
जेव्हा या कलाकारांना भूमिका साकारण्यासाठी करावे लागले स्वतःमध्ये अफलातून बदल

बॉलीवूड चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांपासून फक्त मसाला चित्रपटांनाच ट्रेंड होता. मात्र काळानुरूप प्रेक्षकांच्या आवडीनिवडीत बदल झाले आहे आणि चांगल्या दर्जाचे चित्रपट बॉलीवूडमध्ये निर्माण होऊ लागले. एखादा वेगळा विषय आणि हटके संकल्पना असेल तर अशा चित्रपटांमधील भूमिकेसाठी कलाकारांनाही विशेष मेहनत घ्यावी लागते. अशा आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी कलाकार कधी कधी प्रयत्नांची अक्षरशः शिकस्त करतात. आज आम्ही तुमच्यासोबत असे काही कलाकार शेअर करत आहोत ज्यांनी काही भूमिका साकारण्यासाठी स्वतःच्या लुक आणि अभिनयात अफलातून बदल केले होते. 

अमिताभ बच्चन –

अमिताभ बच्चन यांना आदराने बॉलीवूडचा  महानायक असं म्हटलं जातं. याच कारण त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये सक्षम अभिनयातून निरनिराळ्या बाजाच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रसंगी स्वतःचा लुक आणि अभिनयातही खूप बदल केले. बिग बी ने अशीच एक हटके भूमिका साकारली होती ‘पा’ चित्रपटात. या चित्रपटातील त्यांची भूमिका पाहून कोणालाही ते अमिताभ बच्चन आहेत हे ओळखता येत नव्हतं. 

रणदीप हूडा –

‘सरबजीत’ या चित्रपटात रणदीप हूडाला ओळखणं जवळजवळ अशक्य झालं होतं. कारण त्याने स्वतःच्या लुकमध्ये या भूमिकेसाठी अनेक बदल केले होते. ज्यामुळे या चित्रपटातून रणदीपला एक नवी ओळख मिळाली. सरबजीत चित्रपट उमंग कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. सरबजीत सिंह यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात स्वतःला सरबजीत करण्यासाठी रणदीपने पंचवीस दिवसांमध्ये स्वतःचे अठरा किलो वजन कमी केलं होतं. 

दीपिका पादूकोण –

दीपिका पादूकोण आज बॉलीवूड आणि फॅशन इंडस्ट्रीमधील एक बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री आहे. मात्र ‘छपाक’ मधील लक्ष्मी अग्रवाल साकारण्यासाठी दीपिकाने स्वतःची ग्लॅमरस ओळख दूर ठेवली होती. अॅसिड पिडीत लक्ष्मी अग्रवाल प्रमाणे दिसण्यासाठी तिने स्वतःचा संपूर्ण लुकच बदलला होता. हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपट प्रदर्शित होण्या आधी  दीपिका अनेकदा लोकांसमोरून जात असे.  मात्र तिच्या या लुकमुळे तिला कुणीही ओळखू शकत नसे. 

रणवीर सिंह –

‘पद्मावत’ या चित्रपटात रणवीर सिंहने अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट रणवीरच्या आयुष्यातील एक सुपरहिट चित्रपट आहे. मात्र अल्लाउद्दीन साकारताना रणवीरला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. रणवीरने या भूमिकेसाठी स्वतःमध्ये इतके बदल केले होते की तो स्वतःचं व्यक्तिमत्वच कधी कधी विसरत असे. त्याने या भूमिकेसाठी शूटिंग आधी काही दिवस स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं.  त्याला या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठीही मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागलं होतं. 

रणबीर कपूर –

रणबीर कपूरने ‘संजू’ या चित्रपटात संजय दत्त याची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तरूणपणापासून ते अगदी पन्नाशीपर्यंतच्या वयाचा संजय दत्त त्याने साकारला होता. संजूप्रमाणे दिसण्यासाठी वेळोवेळी त्याच्या लुकमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. या चित्रपटातील संजय दत्त रणबीरने असा हुबेहुब साकारला की तो रणबीर आहे हेच कधीकधी ओळखला येत नव्हतं. या चित्रपटातून संजय दत्तच्या आयुष्यातील कठीण आणि चांगल्या प्रसंगाना उजाळा देण्यात आला होते. सध्या संजय दत्त त्याच्या जीवनात पुन्हा एका कठीण काळाला समोर जात आहे. संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. 

 

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

हेमा मालिनी आणि इशा देओल यंदा असं करणार बाप्पाचं स्वागत

बाहुबली आता बनणार आदिपुरुष, केली ग्रँड घोषणा

पाहायला हवेत असे नवीन मराठी चित्रपट 2020 (Latest Marathi Movie List)

Read More From बॉलीवूड