मनोरंजन

‘तू चाल पुढं’ मालिकेतून दीपा चौधरी आणि धनश्री काडगावकरचं पुनरागमन

Dipali Naphade  |  Jul 12, 2022
deepa-chaudhari-and-dhanashri-to-comeback-with-tu-chal-pudha-in-marathi

सध्या अनेक मालिकांमधून पुन्हा एकदा जुन्या अभिनेत्रींचे चेहरे नव्याने दिसू लागले आहेत. तर हल्ली प्रेक्षकही चाळीशीतल्या अभिनेत्रींशी आपल्या आयुष्यातील घडामोडी जोडून अधिक भावनिक जोडले जातात. अशीच आता अजून एक नवी मालिका 15 ऑगस्टपासून (15 August) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ती म्हणजे ‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha). दीपा परब चौधरी (Deepa Parab Choudhary) या मालिकेतून बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. तर सर्वांची आवडती नंदिनी वहिनी अर्थात धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या दोन्ही अभिनेत्रींचे पुन्हा एकदा टीव्हीवर पुनरागमन होत असल्याने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 

गृहिणीची कहाणी 

आपल्याकडे अनेक महिला आहेत ज्या आजही गृहिणी आहेत, तर अनेक महिला काम करत असूनही आपलं घर – ऑफिस अथवा घर आणि आपला उद्योग या दोन्ही कसरती अत्यंत यशस्वीपणे सांभाळताना दिसून येतात. अशाच कथेवर आधारित ही एका गृहिणीची आणि गृहिणी असूनही यशस्वी उद्योजिकेचा प्रवास करणारी कहाणी असल्याचा अंदाज प्रोमोवरून लावण्यात येत आहे. तर प्रोमोवरूनच वहिनी आणि नणंद यातील स्वभाव आणि घरात काम करणाऱ्या वहिनीला न देण्यात येणारे महत्त्व हे दिसून येत आहे. दीपा चौधरी वहिनीच्या भूमिकेत असून नणंदेच्या भूमिकेत धनश्री दिसून येत आहे. पुन्हा एकदा धनश्री नकारात्मक भूमिकेत असून तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असल्याचे सोशल मीडियावरील कमेंट्सवरून कळून येत आहे. घरात असणाऱ्या महिलांना नक्कीच यावरून काही प्रेरणा मिळू शकते. कोणत्याही महिलेने कधीही स्वतःला कमी लेखू नये हाच एक सामाजिक संदेश या मालिकेतून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे. 

दीपा आणि धनश्रीचे दणक्यात पुनरागमन 

अंकुश चौधरीशी लग्न झाल्यानंतर दीपा परब लहान आणि मोठ्या पडद्यापासून बराच काळ दूर राहिली होती. तसंच आपल्या मुलाच्या जन्मानंतर पुन्हा एकदा दीपा मराठी मालिकेतून आता दिसणार आहे. गेल्यावर्षी दीपाने हिंदी मालिकेतून पुनरागमन केले होते. पण मराठी प्रेक्षकांना दीपा पुन्हा कधी दिसणार असा प्रश्न अनेकांना सतावत होता आणि दीपा चौधरी पुन्हा एकदा मराठी मालिकेतून (Marathi Serial) दणक्यात पुनरागमन (Comeback) करत आहे असे पहिलाच प्रोमो पाहून वाटत आहे. याशिवाय दीपासह धनश्रीचेही या मालिकेतून पुनरागमन होत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून नंदिनीच्या भूमिकेतून धनश्रीने सर्वांचे मन जिंंकून घेतले होते. तर आता या मालिकेत धनश्री काय करणार याकडेही तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रोमोवरून मालिकेचा विषय कळला असला तरीही आता नक्की कोणत्या मालिकेच्या ठिकाणी ही मालिका प्रसारित होणार असा प्रश्न प्रेक्षकांना सतावत आहे. याचाच अर्थ कोणती तरी एक मराठी मालिका नक्कीच निरोप घेणार. पण सध्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा जुने चेहरे बघायला आवडत असल्यामुळे या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना नक्कीच प्रेक्षक प्रेम देतील असे सध्या दिसून येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन