पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार होतात. पोटाचे इन्फेक्शन होणे सामान्य आहे. जुलाबाची समस्या सामान्य असली तरी त्यामुळे शरीरात प्रचंड अशक्तपणा येतो. अतिसार हा पचनसंस्थेशी संबंधित विकार आहे. ज्यामध्ये मल पाण्यासारखा पातळ असतो. हा आतड्यांचा रोग प्रामुख्याने रोटाव्हायरसमुळे होतो. लहान मुलांनाही अतिसार होणे सामान्य आहे. जाणून घ्या अतिसाराची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध याशिवाय अतिसारात काय खावे आणि काय खाऊ नये.
अतिसार होण्याचे कारण काय
अतिसाराचे मुख्य कारण म्हणजे व्हायरल किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होय. पण, अतिसार होण्याची इतर अनेक कारणे असू शकतात, जसे की इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBD). इरिटेबल बॉवेल सिंड्रोममुळे तुमच्या मोठ्या आतड्याच्या आणि गुदाशयाच्या सर्वात आतील भागात अल्सर होतात. तसेच जेव्हा तुमची पचनसंस्था अन्नातून पोषक द्रव्ये शोषण्यात अपयशी ठरते, तेव्हा तुम्हाला अतिसाराची लक्षणे दिसू शकतात. रेचक आणि इतर औषधे जसे की प्रतिजैविक घेतल्याने देखील अतिसार होऊ शकतो. याचप्रमाणे हार्मोन्सशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास अनियमित मलप्रवाह आणि इतर अतिसाराची लक्षणे दिसू शकतात. उदाहरणार्थ, एडिसन रोग असलेल्या लोकांमध्ये स्टिरॉइड हार्मोनची अपुरी पातळी असते. अशा स्थितीत त्यांना जुलाब होण्याची शक्यता जास्त असते. मळमळणे , पोटदुखी, लूज मोशन्स, पोटात दुखणे, क्राम्पस येणे, डिहायड्रेशन, ताप येणे, मलातून रक्त जाणे ही अतिसाराची लक्षणे आहेत.
अतिसार होत असल्यास काय खावे
अतिसाराचा त्रास झाल्यानंतर शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखणे फार महत्वाचे असते. त्यासाठी पुरेसे पाणी आणि फळांचे ताजे रस पिणे आवश्यक आहे.घरी रस काढल्यास उत्तम म्हणजे स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घेतली जाते आणि दूषित अन्न पोटात जाण्याची भीती नसते. याशिवाय भाज्यांचे पातळ सूप, केळी, सोललेले बटाटे, मऊ भात, उकडलेल्या भाज्या या डिहायड्रेशनच्या समस्येतून बरे होण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
डायरियामध्ये काय खाऊ नये
अतिसाराचा त्रास होत असताना तुम्ही जे काही खाता ते डायरियाची लक्षणे वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा ही समस्या उद्भवते तेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. म्हणून स्वत:ला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा अतिसाराचा त्रास होतो तेव्हा दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळा, कारण ते पचणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते. ताजे घरचे पातळ ताक पिणे उत्तम! ताकामध्ये पोटासाठी आवश्यक असलेले प्रोबायोटिक्स असतात. यावेळी कोबी आणि सोयाबीनसारख्या फायबर युक्त भाज्या टाळा, कारण यामुळे गॅसेस होऊन पोट फुगल्यासारखे वाटू शकते. डायरियाची लक्षणे दिसू लागल्यास, सोडा, चहा आणि कॉफी यांसारखी कॅफिनयुक्त पेये पिणे पूर्णपणे टाळायला हवे.
अतिसारापासून बचाव कसा करावा
दूषित अन्न व पाण्यातून पोटाला संसर्ग झाल्याने अतिसार होणे सामान्य आहे. म्हणूनच बाहेरचे खाताना केवळ स्वच्छ ठिकाणचेच अन्न खावे व पिण्याचे पाणी शुद्ध असल्याची खात्री करून मगच प्यावे. रस्त्यावरील उघडे ठेवलेले अन्न आणि दूषित पाणी हे जंतूंचे मुख्य केंद्र आहेत, ज्यामुळे अतिसार होऊ शकतो. तसेच स्वतःचे हायजिन पाळण्यासाठी शौचालयातून आल्यानंतर तीस सेकंद साबण आणि पाण्याने हात धुवावे. तसेच स्वयंपाक करण्यापूर्वी, कुणालाही अन्न वाढण्यापूर्वी, खाण्यापूर्वी आणि नंतर आपले हात स्वच्छ धुवावेत. रोटाव्हायरस हे अतिसाराचे मुख्य कारण आहे. रोटाव्हायरसची लस घेतल्यास अतिसार टाळता येतो. तसेच उरलेले अन्न आणि इतर खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवावेत जेणे करून ते खराब होऊ नयेत. कच्ची फळे व भाज्या खाण्यापूर्वी आणि शिजवण्यापूर्वी त्या स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्याव्यात. नासलेले, खराब झालेले काहीही खाऊ नये. याशिवाय दूषित पाण्याची समस्या असेल तर वॉटर प्युरिफायर वापरावे किंवा पाणी गाळून घेतल्यावर ते चांगले उकळून मगच प्यावे.
अशा प्रकारे अतिसारापासून बचाव करता येतो.
फोटो क्रेडिट- istock
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक