आरोग्य

उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, होतील पोटाचे विकार

Leenal Gawade  |  May 13, 2022
अजिबात खाऊ नका हे पदार्थ

 सध्या आपल्याला एकच सीझन चांगला जाणवतोय. तो म्हणजे उन्हाळा, कडक उन्हाळा आणि कडकडीत उन्हाळा. या दिवसात खरंतर फार काही खाण्याची इच्छा आपल्याला होत नाही. त्यातल्या त्यात आपण कसे काही चुकीचे पदार्थ खातो की, त्यामुळे पोटाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या या सीझनमध्ये पदार्थांचे काही कॉम्बिनेशन, काही पदार्थ नक्कीच पोटासाठी चांगले नसतात. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ तुम्ही या दिवसात टाळायला हवेत.

बाजरीची भाकरी

Bajrichi Bhakari

खूप जणांच्या घरी नाश्त्याला किंवा जेवणाला भाकरी केली जाते. बाजरीची भाकरी ही आवडत असली तरी देखील ती उन्हाळी दिवसांसाठी अजिबात चांगली नाही. कारण बाजरी ही उष्ण असते.तिचे अति सेवन केल्यामुळे जुलाब होण्याची शक्यता अधिक असते. कितीही मोह झाला तरी देखील या दिवसात बाजरीची भाकरी न खाणेच उत्तम. जर तुम्हाला भाकरी खायची असेल तर तुम्ही तांदुळाची भाकरी, ज्वारीची भाकरी खाल्ली तरी देखील चालू शकते. त्यामुळे बाजरीची भाकरी खाणे या दिवसात न खाणेच चांगले. 

चिकन

खूप जणांना दररोज चिकन खाण्याची सवय असते. कोंबडीचे मांस याला चिकन म्हटले जाते. कोंबडी ही देखील उष्ण असते. कोंबडीचे सेवन या दिवसात केल्यामुळे ते पचण्यास चांगलेच जड जाते. इतकेच नाही तर काही जणांना त्यामुळे जुलाब, अपचन, पोटात आग आग होणे, शौचातून रक्त पडणे असे त्रास देखील होऊ लागतात. चिकनच्या जागी तुम्ही बकऱ्याचे मटण खाल्ले तर ते चालू शकते. कारण बकऱ्याचे मटण हे थंड असते. त्यामुळे पोटाला कोणताही त्रास होत नाही.

अंडी

Eggs

जीमला जाणारे, वर्कआऊट करणारे अनेक जण या दिवसात अंडीचे सेवन अगदी हमखास करत असतात. पण या दिवसात अंडी खाताना थोडेसे सावध राहा. कारण अंडी ही देखील उष्ण असतात. अंड्यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. उष्णतेमुळे त्वचेवर फोड येणे, चेहरा सुजलेला दिसणे, शौचास साफ न होणे असे काही त्रास होऊ शकतात. पोटाचे आरोग्य अंड्यामुळे सगळ्यात जास्त बिघडण्याची शक्यता असते. 

 ताडगोळा

ताडगोळा याच सीझनमध्ये मिळणारे असे फळ आहे. ते खायलाच हवे. कारण यामध्ये पाणी देखील असते. पण ताडगोळा जास्त प्रमाणात खाल्ला तर त्यामुळे पोटदुखी होण्याची शक्यता असते. ताडगोळे हे चांगले नसतील तर ही पोटदुखी अजून जास्त जाणवते. त्यामुळे ताडगोळे खाताना ते मोजून मापून आणि चांगले बघून असेच खा. म्हणजे त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही.

बेसनाचे पदार्थ

 चटपटीत चमचमीत असे पदार्थ ज्यांना खायची सवय असते. अशांच्या आहारात बेसनाचा अगदी हमखास समावेश असतो. बेसनाचे पदार्थ म्हणजेच वडा, समोसा, तळणीचे पदार्थ हे या दिवसात पचण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे तुम्ही या दिवसात थोडे मोजून मापूनच हे पदार्थ खाल्लेले बरे. 

आता उन्हाळ्याच्या या दिवसात हे काही पदार्थ नक्की खाणं टाळलेले बरे.

Read More From आरोग्य