मनोरंजन

गोव्यातील मालिकांचं चित्रीकरण रखडलं,मालिकांना बसणार फटका

Leenal Gawade  |  May 6, 2021
गोव्यातील मालिकांचं चित्रीकरण रखडलं,मालिकांना बसणार फटका

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरु केल्यामुळे मुंबई तसेच इतर जिल्ह्यातील शूटिंग हे पूर्णपणे थांबण्यात आले. पण मालिकांनी अविरत मनोरंजनाचा वसा घेतल्यामुळे अनेक वाहिन्यांनी आपल्या मालिकांचे शूटिंग हे जवळील राज्यांमध्ये सुरु ठेवले आहे. गोवा आणि कर्नाटक येथील काही ठिकाणी मराठी मालिकांचे शूटिंग सुरु आहे. आतापर्यंत अनेक मालिकांनी गोव्यातील भाग प्रसारीत करायला सुरुवात देखील केली आहे. पण आता गोव्यामध्ये सुरु असलेल्या मालिकांच्या शूटिंगवर काही काळासाठी गदा येणार आहे. गोव्यातील फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत या मालिकांचे शूटिंग थांबवण्याची मागणी केली होती. खबरदारी म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही मागणी मान्य करत येत्या 10 मे पर्यंत मालिकांचे शूटिंग बंद केले आहे.

लग्नाच्या काही दिवसानंतर कॉमेडियनला जाणवले लग्नाचे साईड इफेक्टस, व्हिडिओ व्हायरल

या कारणासाठी मालिकांचे शूटिंग बंद

गोव्याच्या मडगाव या परिसरात सध्या काही मराठी मालिकांचे शूटिंग सुरु आहे. मडगावच्या रवींद्रभवनमध्ये सध्या मराठीतील संगीत रिअॅलिटी शो ‘सूर नवा ध्यास नवा’ चे शूटिंग सुरु असताना विजय सरदेसाई यांनी आंदोलकांना हातीशी घेत या सेटवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या परिसरात शूटिंगला परवानगी दिल्यापासून कोरोना रुग्ण वाढत असल्याचे देखील त्यांनी सांगितले त्यामुळे या शूटिंगला परवानगी देऊ नये असे त्यांनी सांगितले. शिवाय वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत या परिसरात 150 बेड्सचे कोव्हिड रुग्णालय उभारावे अशी देखील मागणी करण्यात आली. या मागणीनंतर या ठिकाणी कोव्हिड चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. अशी माहिती स्वत: विजय सरदेसाई यांनी देखील ट्विट करत दिली आहे. 

‘माझ्या शरीरात पवित्र रक्त आहे, म्हणून मला कोरोना होत नाही’, राखीचं अजब वक्तव्य

गोव्यात या पुढे होणार नाही चित्रीकरण

मुंबईत कोरोनाचा वाढता कहर पाहता मालिकांचे शूट बंद करण्यास आले. त्यानंतर मालिकांचे शूटिंग करण्यासाठी अनेकांनी वेगेवगळ्या राज्यांची मदत घेतली. सध्या गोवा, सिल्वासा, राजस्थान, कर्नाटक या ठिकाणी काही मराठी मालिकांचे शूटिंग सुरु आहे. गोव्यामध्ये हा सगळा गोंधळ झाल्यानंतर शूटिंगला 10 मे पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. शिवाय यापुढे कोणत्याही नव्या मालिकांना गोव्यामध्ये शूटिंगची परवानगी देण्यात येणार नाही. शूटिंगच्या अशा बदलत्या निर्णयाचा नक्कीच निर्मात्यांना फटका बसणार आहे. 

या मालिकांचे शूटिंग थांबले

सध्या गोव्यामध्ये ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘आई माझी काळुबाई’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ आणि संगीत रिअॅलिटी शो ‘सूर नवा ध्यास नवा’ यांचे चित्रीकरण सुरु आहे. काही काळासाठी या मालिकांनी आपले जुने भाग प्रसारित करायला सुरुवात केली होती. पण आता पुन्हा एकदा चित्रीकरणात खंड पडल्यामुळे या मालिकांचे जुनेच भाग पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहावा लागणार आहे. 

गोवा प्रशासनाने शूटिंगला परवानगी दिली नाही तर पुन्हा एकदा मालिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 

दीपिका पादुकोणच्या संपूर्ण कुटुंबाला करोनाची लागण

Read More From मनोरंजन