चविष्ट, चमचमीत आणि मस्त जेवण करता येतं? तुमच्या जेवणाची चव अनेकांना आवडते? तुम्हाला वेगवेगळया पद्धतीचे जेवण उत्तम पद्धतीने करता येते? तुमच्या कामाचा उरक चांगला आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थित जमत असतील तर तुम्ही घरबसल्या उत्तम जेवणाच्या माध्यमातून चांगला बिझनेस उभारु शकता. आता जेवणाचा बिझनेस करायचा म्हणजे लगेचच हॉटेल उभारायचे का? तर असे मुळीच नाही. घरबसल्या कशापद्धतीने तुम्हाला हा बिझनेस करता येईल आणि कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ विकता येतील याच्या काही आयडियाज आज आम्ही तुम्हाला देणार आहोत करुया सुरुवात
घरच्या घरी सुरू करा बिझनेस…आजच व्हा स्वावलंबी
डब्याची सोय
उत्तम जेवण करत असाल तर तुमच्या चवीवरुनच लोकं तुमचं नाव काढतात. शहरांसारख्या अनेक ठिकाणी खूप जणांना जेवण करायला फारसा वेळ नसतो. घरचं जेवण हे आरोग्यासाठी चांगले असल्यामुळे तुम्ही अगदी साधी सुरुवात ही डब्याने करु शकता. डाळ, भात, भाजी, पोळी, सलाद असा सोपा डब्बा असतो. त्यामध्ये तुम्ही तुमचा एखादा टच देऊ शकता. घरी बनवलेल्या भाज्या या नेहमीच आवडीने खाल्ल्या जातात. त्याला तिखट- मीठ घरच्याप्रमाणे असेल तर लोक डबा हमखास नेतात. त्यामुळे तुम्ही डब्यापासून सुरुवात करा. कारण एकदा ग्राहक झाल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेत तुम्हाला त्यांना डबे बनवून द्यावे लागतात. यासाठी थोडी मेहनत आणि सगळ्या गोष्टीचे गणित जमणे गरजेचे असते. पण एखाद्या सुगरणीला काटकसर करुन या गोष्टी कशा करायच्या हे चांगलेच जमते. त्यामुळे तुम्ही हे गणित जुळवा आणि बिझनेसचा श्रीगणेशा करा.
चपाती किंवा भाकऱ्यांचा व्यवसाय
चपाती आणि भाकऱ्या करण्यात तुमचा हातखंडा असेल तर तुमच्यासाठीही बिझनेसची उत्तम संधी आहे. अनेकांना आजही चपात्या आणि भाकरी करण्याचा कंटाळा असतो. त्यामुळे विकतच्या चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या भाकऱ्या किंवा चपात्या मिळाल्या की, लोकं लगेच ते विकत घेतात. या बिझनेससाठी पार मोठा सेटअप लागत नाही. एकदा तुम्हाला लोकांना कोणत्या वेळात चपाती आणि भाकऱ्या लागतात हे कळले की, मग तेव्हा हा ताजा स्टॉक बनवता येऊ शकतो. तुम्ही बनवलेल्या भाकऱ्या या चांगल्या आणि बजेटमध्ये बसणाऱ्या असतील तर तुमच्याकडे लोक पुन्हा नक्कीच येतात.
बिझनेस सुरू करताय, मग फॉलो करा या सोप्या टिप्स
हेल्दी आहार
हल्ली पौष्टिक आहाराच्या बाबतीत लोकं आग्रही असतात. त्यांना कमी तेलाचं आणि डाएटनुसार जेवण लागतं. अजूनही फार कमी ठिकाणी डाएटचं जेवण मिळतं. जर तुम्ही हेल्दी आणि पौष्टिक आहार देत असाल तर लोकं तुम्हाला नक्कीच विचारणार. जर तुम्हाला पौष्टिक आहाराची थोडी माहिती घेतली. तर तुम्हाला तुमच्या जेवणात काय वेगळेपणा आणता येईल हे देखील नक्की कळेल. साधारणपणे पौष्टिक आहारात क्विनोआ, सलाद, मल्दीग्रेन ब्रेड, ब्राऊन राईस, फळं, चणे- शेंगदाणे अशा काही गोष्टी येतात. तुम्ही व्हेज- नॉनव्हेज अशा दोन्हीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी आणू शकता. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा डबा ही बनवू शकता.
या काही आयडियाज आहेत ज्या तुम्ही बिझनेससाठी वापरु शकता. पण या आयडियाज वाचताना तुम्हाला नक्कीच काही नव्या आयडियाजही सुचतील. त्यामुळे बिझनेस म्हणजे काही वेगळं आणि नुकसान करणार असेल असे काही समजू नका. तर तुमच्याकडील कलांचा विचार करा.