खोबरं खाण्याचे आणि नारळपाणी पिण्याचे फायदे तुम्ही बरेचदा ऐकले असतील. पण तुम्ही कधी नारळाचा चहा घेतला आहे का? नारळाचाही चहा होतो. याला कोकोनट टी असे म्हणतात. हे खऱ्या नारळाच्या दुधापासून बनवलेले एक अनोखे आणि स्वादिष्ट पेय आहे, ज्याची चव तर अप्रतिम आहेच पण ते आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कोकोनट टी हे एक कॅफिनयुक्त पेय आहे जे खोबऱ्याचे काप किंवा नारळाचे दूध ग्रीन टी मध्ये किंवा काळ्या चहामध्ये मिसळून बनवले जाते.
ग्रीन टी व नारळाचे दूध एक उत्तम कॉम्बिनेशन
कोकोनट टी हे सध्या यूएस आणि युरोपच्या काही भागांमधील लोकांना फार आवडते आहे. त्यांच्यासाठी हे एक नवीन प्रकारचे पेय आहे. खरं तर हे पेय उष्णकटिबंधीय भागात राहणाऱ्या लोकांद्वारे तयार केले जाते जेथे नारळाची भरपूर झाडे सापडतात. नारळाच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते. तसेच ते लॉरिक ऍसिड, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबरने समृद्ध आहे. ग्रीन टी आणि ब्लॅक टी हे पॉलिफेनॉलिक संयुगे आणि इतर सक्रिय घटकांनी समृद्ध आहेत ज्यांचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. जेव्हा तुम्ही हे दोन घटक एकत्र करता तेव्हा ते एक सुपरफूड ड्रिंक तयार होते.
त्वचेसाठी फायदेशीर
नारळाचे दूध आयुर्वेदात अतिशय पौष्टिक मानले जाते. त्यात हायपरलिपिडेमिक बॅलन्सिंग गुणधर्म असतात. नारळ हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे ते त्वचेसाठी फायदेशीर आहे. खोबऱ्याच्या सेवनाने त्वचेचे आरोग्य सुधारते. तसेच नारळाच्या दुधाचा चहा प्यायल्याने तुमची त्वचा सुंदर राहण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
नारळाच्या पाण्याप्रमाणे नारळाच्या दुधाचा चहा देखील वजन कमी करण्यास मदत करू शकतो. नारळात वजन वाढवणारी चरबी नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत. खोबऱ्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर मानले जाते.
रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा कोकोनट टी
कोविडमध्ये अनेक डॉक्टर विषाणूपासून बचाव करण्यासाठी नारळपाणी पिण्याचा सल्ला देत होते. आपणही पूर्वापार आजारी व्यक्तीला पटकन बरे वाटावे म्हणून नारळपाणी देतोच. संशोधनानुसार, तुम्ही नारळाच्या दुधाचा चहा जरी घेतला तरी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नारळात व्हिटॅमिन सीचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नारळाचे दूध व ग्रीन टी यांच्या एकत्रित उत्तम गुणधर्मांनी युक्त असलेला कोकोनट टी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर आहे.
हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले
नारळातील एचडीएल कोलेस्ट्रॉल आणि लॉरिक ऍसिड उच्च रक्तदाब आणि कोरोनरी हृदयरोगापासून वाचवण्यास मदत करू शकतात. तज्ज्ञांच्या संशोधनातही हे सिद्ध झाले आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की नारळाचे पाणी शरीराचे मेटॅबोलिजम सुधारते आणि ते कमी होऊ देत नाही. नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याचा दुधाचा चहाही पचनाचे विकार आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोमच्या त्रासासाठी खूप फायदेशीर आहे.
कोकोनट टी कसा बनवायचा?
कोकोनट टी उर्फ नारळाच्या दुधाचा चहा घरी बनवणे अगदी सोपे आहे.त्यासाठी खालील साहित्याची आवश्यकता भासेल.
साहित्य – 4 कप पाणी, 3 ग्रीन टी बॅग्स/ साध्या चहाच्या टी बॅग्स, एक कप नारळाचे दूध, 2 चमचे दूध, 1 टीस्पून ब्राऊन शुगर
कृती – नारळाचा ग्रीन टी बनवण्यासाठी एका भांड्यात ४ कप पाणी उकळण्यासाठी ठेवा.त्यात तीन टी बॅग्स घाला.
मग त्यात पाव कप नारळाचे दूध आणि दोन चमचे दूध घाला. चांगले हलवा आणि टी बॅग्स काढून घ्या.
तुम्हाला चहाची गोड चव हवी असल्यास तुम्ही यात एक चमचा ब्राऊन शुगर घालू शकता.
तर मग उत्तम आरोग्यासाठी हा कोकोनट टी नक्की घेऊन बघा.
फोटो क्रेडिट – istockphoto , pinterest
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक