Festival

‘होली’च्या नादात होतंय ‘होळी’चं विस्मरण

Aaditi Datar  |  Mar 24, 2021
‘होली’च्या नादात होतंय ‘होळी’चं विस्मरण

महाराष्ट्र हे असं राज्य आहे, जिथे विविध राज्यातील लोकं कामधंद्याच्या निमित्ताने येऊन स्थिरावली आहेत. त्यामुळे कोणताही सण असो किंवा तो कोणत्याही इतर राज्यातील रहिवाश्यांचा असो. इथे तो धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण त्यामुळे एक होत आहे की, महाराष्ट्रातील सण आणि विशेषतः मार्च महिन्यात येणारे तीन सण होळी, धुळवड आणि रंगपंचमी याची गल्लत होत आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो की, होळीला रंग खेळायचे की, रंगपंचमीला की, धुळवडीच्या दिवशी. बरं मुंबई आणि बऱ्याच प्रमाणात पुणेकरांनी यावर सरळसोट तोडगा काढला आहे, तो म्हणजे होळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी. तेही जसा बँक हॉलिडे किंवा वीकेंड त्याप्रमाणे सेलिब्रेशन ठरते. नाही का? इतर राज्यातील लोकांना सामावून घेता घेता महाराष्ट्रातील पारंपारिक गोष्टींचा ऱ्हास होत असल्याचं दिसत आहे. कारण होळी आणि होली या सारख्याच नावांमुळे होळीला ‘होली’ चे स्वरूप येऊ लागले आहे आणि मूळ होळी, धुळवड आणि रंगपंचमीचा मराठी भाषिकांना विसर पडत आहे.

मुंबई किंवा पुण्यात असं चित्र दिसत असलं तरी उर्वरित महाराष्ट्रात मुख्यतः नाशिककर मात्र ही परंपरा राखून आहेत. नाशिकमध्ये होलिकादहन, धुळवड आणि रंगपंचमी हे तिन्ही सण त्या त्या पद्धतीने साजरे केले जातात. त्यामध्ये होलिकादहनाला गोवऱ्या आणि लाकडं वापरून वाईटाचा नाश करून आनंदोत्सवाची होळी केली जाते. तर धुळवडीच्या दिवशी आदल्या दिवशीच्या होळीची राख फासून पारंपारिकता जपली जाते. तर रंगपंचमीच्या दिवशी रहाडीत रंग खेळला जातो. इथे आजही रहाडी, दाजिबा वीर, वीरांची मिरवणूक आणि होळीचा माहोल दिसून येतो.

Canva

पारंपारिक होलिकादहन, धुळवड आणि रंगपंचमी

मुख्यतः होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळी म्हणजेच होलिकादहनाला लाकडांची रास करून ती जाळली जातात. याच उत्सवाला शिमगा (कोकण), हुताशनी महोत्सव, दोलायात्रा, कामदहन (पौराणिक आख्यायिका) अशी विविध नावे आहेत. 

विष्णू पुराणातील एका कथेनुसार दैत्याचा राजा हिरण्यकश्यप यांनी देवाला प्रसन्न करुन असा वरदान मागून घेतला. त्या वरदानानुसार ना पृथ्वी- ना आकाश, ना  दिवसा ना रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने , ना मानवाकडून ना पशूकडून त्याला मृत्यू येईल. हा वरदान प्राप्त केल्यानंतर  हिरण्यकश्यप राजा हा नास्तिक होऊन गेला. त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. वडिलांनी बरेचदा सांगूनही त्याने विष्णू भक्ती सोडली नाही. मुलाला विष्णू भक्तीतून बाहेर काढण्यासाठी  हिरण्यकश्यपने बहीण होलिकेची मदत घेतली. होलिकेला असा आशीर्वाद होता की, आगीत ती कधीच भस्म होणार नाही. हिरण्यकश्यपू प्रल्हादाला घेऊन आगीत भस्म करायला सांगितले. पण भक्त प्रल्हादाची भक्ती इतकी होती. त्या आगीत होलिका जळून गेली आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिला. म्हणूनच वाईटाचा विनाश आणि चांगल्याची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. 

तर होळीच्या दुसऱ्या दिवशी शांत झालेल्या होलिकादहनाची राख एकमेंकाना लावली जाते. यामागील कारण म्हणजे येणारा कडक उन्हाळा सहन करण्याची आपल्याला ताकत मिळावी. म्हणूनच याला धुळवड असे संबोधले जाते. पण याचं मूळ स्वरूप बाजूला पडून या दिवशीच शहरांमध्ये रंग खेळले जाऊ लागले आणि रंगपंचमीऐवजी शहरांमध्ये धुळवडीला रंग उधळला जाऊ लागला. लोक याच दिवशी रंगपंचमीच्या शुभेच्छाही देऊ लागले

होळी करा, धुळवड आणि रंगपंचमीही खेळा पण जुन्या परंपरांना बगल देऊ नका. मूळ संकल्पनाचं जतन हे झालंच पाहिजे. ज्यामुळे पुढच्या पिढ्यांनाही आपल्या संस्कृतीचा वारसा मिळेल. नाहीतर फक्त होळीच्या शुभेच्छा देण्यापुरता हा सण उरेल.

Read More From Festival