आरोग्य

सतत येतात ढेकर, करा हे सोपे घरगुती उपाय

Leenal Gawade  |  Apr 20, 2022
burp_issue

 जेवण आवडले किंवा जेवण पूर्ण झाले की, तृप्तीचा ढेकर येतो. जेवणानंतरचा हा एक ढेकर येणे ठिक आहे. पण काही जणांना ढेकरांचा त्रास सतत होत राहतो. असे सतत ढेकर येणे आरोग्यासाठीच नाही तर चारचौघातही चांगले नाही. कधीकधी झालेल्या अन्नाचा करपट वासही ढेकरांमध्ये असतो. त्यामुळे तर अशा लोकांमध्ये बसणेही नको होते. खूप जणांना ढेकर देताना इतक्या अडचणी येतात की, ते ढेकर देताना उगाचच मोठा आवाज काढतात. वेगवेगळ्या कारणांमुळे तुम्हालाही असा सतत ढेकर येत असेल तर असा ढेकर घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करायला हवे. ज्यामुळे ढेकरांपासून तुम्हाला आराम मिळेल.

ढेकर का येतात?

ढेकर हे अन्य काही नसून आपल्या पोटात तयार झालेला गॅस आहे. गॅस गुद्वारातून बाहेर न पडता ज्यावेळी तोंडावाटे बाहेर पडतो. त्यावेळी त्याला आपण ढेकर असे म्हणतो. पोटात गॅस बाहेर जाण्यासाठी मार्ग मिळाला नाही की ढेकर येऊ लागतात. खूप जणांचा गॅस खालून न जाता वरुन जातो. त्यामुळे त्याचा त्रास होणे स्वाभाविक आहे.

ढेकरांपासून असा मिळवा आराम

ढेकर येण्याच्या त्रासापासून आराम मिळवायचा असेल तर असे करा सोपे घरगुती उपाय. करपट आणि अपचनाच्या ढेकरांचा त्रास देखील यामुळे कमी होऊ शकेल. 

  1.  लिंबू: एका चमचा घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये काहीही न घालता तसाच्या तसा लिंबाचा रस प्या त्यामुळे तुम्हाला ढेकरांपासून आराम मिळतो. 
  2.  आलं: आल्याचा रस हा देखील ढेकरांसाठी खूपच चांगला असतो. आल्याचा चहा किंवा मधामध्ये आल्याचा रस घेऊन त्याचे जेवणानंतर सेवन करा किंवा ढेकर येत असेल त्यावेळी सेवन करा त्यामुळे हा त्रास कमी होतो.
  3. कोथिंबीर : ढेकर सतत येत असेल तर कोथिंबीरची काडी घेऊन ती चावा. त्याचा रस पोटाक गेल्यामुळे ढेकर येणे बंद होते.
  4. वेलची: वेलची ही आपण मुखवास म्हणून वापरतो. शिवाय अनेक पदार्थांमध्येही त्याचा समावेश आपण करतो. पण ढेकरांचा त्रास होत असेल तर तुम्ही वेलची चावून खावी. जर चहा आवडत असेल तर वेलची चहामध्ये घालावी. त्यामुळे ढेकर कमी होतात. 
  5. बडीशेप: पोटाच्या सगळ्या विकारांवर रामबाण असा इलाज म्हणजे बडीशेप. जर तुम्ही बडीशेप खाल्ली तरी देखील तुम्हाला ढेकर येण्यापासून आराम मिळू शकतो. बडीशेप ही पाचक असते. बडीशेप छान भाजून तुम्ही तुमच्यासोबत ठेवा आणि ती चावून त्याचा रस घ्या. 
  6. सोडा: खूप जण पोटाचा त्रास होऊ लागल्यावर सोडा पितात. ढेकरांपासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही सोडा प्यायला तरी चालेल. घोट घोट सोडा प्या त्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळेल. 
  7. दूध: सतत ढेकर येत असेल तर तुम्ही छान थंडगार असे दूध घेऊन प्यावे. त्यामुळेही आराम मिळते. जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही त्याचे सेवन टाळा. 

आता ज्यांना सतत ढेकर येत असतील तर तुम्ही हे उपाय नक्की करा.

Read More From आरोग्य