DIY सौंदर्य

उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या हातांसाठी वापरा हे होममेड स्क्रब

Vaidehi Raje  |  Apr 4, 2022
homemade hand scrub

त्वचेची काळजी म्हणजे फक्त विविध प्रकारचे लोशन, सिरम, मास्क आणि क्रीम्सने केवळ चेहऱ्याची काळजी घेणे नव्हे. आपल्या संपूर्ण शरीराच्या त्वचेची काळजी घेणे खास करून आपल्या हातांच्या व पायांच्या त्वचेची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. परंतु बरेच लोक त्यांच्या हातांकडे दुर्लक्ष करतात. हातांची त्वचा कोरडी पडली की त्वचेवर सुरकुत्या पडतात. म्हणूनच हातांच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला जर फुलांसारखे मऊ हात हवे असतील तर त्यांना  नियमितपणे स्क्रब केले पाहिजे. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे हँड स्क्रब सहज मिळतील. परंतु ते बरेच महाग असतात. त्यापेक्षा जर तुम्ही घरीच स्क्रब तयार केले तर ते रसायनमुक्त असतील आणि नैसर्गिक पोषक घटकांनी युक्त असतील त्यामुळे तुमच्या त्वचेला चांगले पोषण मिळेल. हे हँड स्क्रब त्वचेच्या मृतपेशी काढून टाकतील आणि तुमचे हात अधिक मऊ बनवतील. या हॅन्ड स्क्रबमुळे कोलेजन उत्पादनाला चालना मिळेल आणि त्वचा एक्सफोलिएट होईल व अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी होतील. म्हणूनच स्क्रबिंग करायची योग्य वेळ काय आहे हे जाणून घेऊन मग स्किनकेअर रुटीन फॉलो करा.

शुगर स्क्रब

घरगुती हॅन्ड स्क्रब

हे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला ½ कप साखर, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, , 10-15 थेंब लव्हेंडर इसेन्शियल ऑइल यांची गरज पडेल. स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात हे सर्व साहित्य मिसळा आणि हलक्या हाताने 1 मिनिटासाठी दोन्हीही हातांवर याचा मसाज करा. कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हे स्क्रब तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा करू शकता. या स्क्रबमधील साखरेचे दाणे तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये असणारे  आवश्यक फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ आणि शांत करण्यास मदत करतात.

बदाम आणि मध स्क्रब

घरगुती हॅन्ड स्क्रब

या होममेड हॅन्ड स्क्रबसाठी तुम्हाला मूठभर बदाम, 1/2 चमचे मध व आवश्यकतेनुसार दूध हे साहित्य लागेल. मूठभर बदाम बारीक वाटून घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध व आवश्यकतेनुसार दूध घाला. हे सर्व साहित्य चांगले मिसळून त्यांची पेस्ट बनवून घ्या आणि त्याने दोन्ही हातांवर 2 मिनिटे मसाज करा. कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवा. हे स्क्रब तुम्ही आठवड्यातून 3 वेळा करू शकता. फक्त हे स्क्रब तयार केल्यावर ताबडतोब वापरावे कारण आपण यामध्ये दूध घालणार आहोत जे टिकणार नाही. यातील बदामाची पावडर उत्कृष्ट एक्सफोलिएटर म्हणून कार्य करते. आणि मधामुळे त्वचा मऊ होते तसेच त्वचेचा पोतही सुधारतो.

ब्राऊन शुगर आणि व्हिटॅमिन ई ऑइल स्क्रब

यासाठी तुम्हाला 2 चमचे ब्राऊन शुगर आणि व्हिटॅमिन ई तेलाचे 5-6 थेंब इतक्याच साहित्याची आवश्यकता पडेल. ब्राऊन शुगर व व्हिटॅमिन ई ऑइल एकत्र मिसळा आणि 2 मिनिटे हलक्या हाताने दोन्ही हातांवर मसाज करा.कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्या. हे स्क्रब तुम्ही आठवड्यातून 3 वेळा केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे स्क्रब तुम्ही हवाबंद डब्यात साठवून ठेवू शकता.व्हिटॅमिन ई हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे त्वचेच्या पेशींचे आरोग्य सुधारण्यास करण्यात मदत करू शकते व त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यातही मदत करते. 

एप्सम सॉल्ट हँड स्क्रब

घरगुती हॅन्ड स्क्रब

एप्सम सॉल्ट त्वचेच्या वेदना आणि दाह कमी करते. ते आपल्या हातावरील त्वचेला एक्सफोलिएट करते आणि ती मऊ बनवते. यासाठी तुम्हाला 1 कप एप्सम मीठ व 1 कप ऑलिव्ह ऑइल हे साहित्य लागेल. एका भांड्यात एप्सम सॉल्ट व ऑलिव्ह ऑइल घ्या आणि एकत्र मिसळा. हे मिश्रण घेऊन 1-2 मिनिटे हलक्या हाताने हातांना मसाज करा व नंतर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्या. हे स्क्रब तुम्ही आठवड्यातून 3 वेळा वापरू शकता.

कोमल व सुंदर हातांसाठी हे घरगुती हॅन्ड स्क्रब वापरा.

Photo Credit- istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य